हिंदुस्थान आणि जग
प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण ३ रें.
हिंदु आणि जग.
हिंदुस्थान आणि जग यांचा परस्परसंबंध लक्षांत येण्यासाठीं ज्या गोष्टींची माहिती आपणास पाहिजे त्यांत (१) हिंदुस्थानचें जगापासून पृथक्त्व आणि त्याचा जगाशीं संबंध व (२) हिंदुसमाज आणि त्याचें पृथक्त्व आणि संबंध या दोन गोष्टी मोडतात. या दोन्ही गोष्टी समजण्यासाठीं हिंदुस्थान आणि हिंदु या शब्दांचे अर्थ समजले पाहिजेत. हिंदुस्थानाची आज ब्रिटिश हिंदुस्थान आणि ब्रिटिश छत्राखालील संस्थानें ही राजकीय व्याख्या घेऊन, हिंदुस्थान आणि जग यांचा राजकीय संबंध या विषयावर विवेचन केलेंच आहे. आतां हिंदुजनतेविषयीं विचार करूं.
हिंदू आणि हिंदू नसलेले इतर लोक :— यांतील भेद काढावयाचा हें शास्त्रीय दृष्ट्या बरेंच कठीण काम आहे. शास्त्रीयसंज्ञा असतात त्या एका शब्दांत अनेक अर्थ व्यक्त करण्यासाठीं असतात. जगांतील निरनिराळ्या लोकांतील सादृश्य आणि भेद यांचें ज्ञान हें ज्ञेय आहे. सादृश्य एका शब्दांत व्यक्त करण्यासाठीं संज्ञा बनतात. मनुष्यसमूहांत जें एकत्व उत्पन्न होतें तें कशामुळें होतें हें जाणणें अवश्य आहे. समाजाची स्थिती फार गुंतागुंतीची आहे तिचें सूक्ष्म ज्ञान फारच थोड्यांस आहे. यामुळें व्याख्या करणारांचा हट्टवाद हिंदु या शब्दाची व्याख्या करतांना जेथें तेथें दृष्टीस पडतो. ज्यास हिंदूच्या समाजांतून फुटून जावें असें वाटेल तो हिंदु या शब्दाची व्याख्या संकुचित आणि प्रसंगी अपमानकारक करितो, आणि ज्यास हिंदुसमाजांत आपला अंतर्भाव असावा असें वाटतें तो तीच व्याख्या विस्तृत करितो. शिवाय ज्यांस आपण हिंदु आहोंत याबद्दल अभिमान वाटतो आणि हिंदु हें नांव गौरवाचें वाटतें आणि तें अभिधान आपणांस अप्रिय असलेल्या भिन्नाचारयुक्त मनुष्यसमूहास लावावें असें वाटत नाहीं ते देखील हिंदु या शब्दाची व्याख्या फार संकुचित करितात. हिंदु शब्दाचा इतिहास पाहातां सिंधूच्या आसपासच्या लोकांखेरीज इतर ठिकाणच्या लोकांपैकीं कोणाचीच मालकी या शब्दावर नाहीं किंवा सिंधूपलीकडील सर्वच लोकांची आहे. आपलें सामाजिक स्थिति हें ज्ञेय आहे. जगांतील लोकांचें वर्गीकरण शास्त्रदृष्ट्या केवळ सादृश्यासादृश्यावर करावें या हेतूनें या शब्दाची व्याख्या करण्याचा प्रामाणिक प्रयत्न झाला नसल्यानें आणि व्याख्या करतांना समूहविषयक आकांक्षा आणि द्वेष हीं व्यक्त होत असल्यामुळें या शब्दास आम्हीं एक अर्थ देण्याचा प्रयत्न करणें म्हणजे विशिष्ट एका पक्षास जाऊन मिळणें होय. या अपवादाची अडचण व्याख्या करतानां उत्पन्न होते. एकानें एक व्याख्या करावी आणि वर्गीकरण त्या व्याख्येला जुळेल असें करावें आणि दुसर्यानें व्याख्या निराळी करावी आणि वर्गीकरण निराळें करावें या तर्हेची पद्धति शास्त्रीय विवेचनास पोषक नाहीं.
लोकांमध्यें व्याख्या करतांना ज्या भावना उत्पन्न होतात, त्या भावनांमुळें व्याख्येंत होणारे फरक दाखविण्यासाठीं काहीं उदाहरणें येथें देतों.
१ ज्या जैनांस आपण हिंदूंपेक्षां निराळें व्हावें असें वाटतें तें हिंदु या शब्दाची संकुचित व्याख्या करितात; आणि त्या व्याख्येंत आपण नाहीं असें भासवितात. हीच गोष्ट शीखांस लागू आहे. ज्यांस आपण हिंदू असावेसें वाटतें ते शीख व जैन निराळी व्याख्या करितात.
२ ज्या इंग्रजांस समाजांतील बहुजनसमाजापासून भिन्न अशा अल्पसंख्याकांनां आपणांकडे ओढावें आणि बहुजनसमाजावर राज्य करण्यास थोडासा खुलविलेला एक अल्पसंख्याकांचा पक्ष आपल्याकडे ओढला जावा असें वाटत असेल ते संकुचित व्याख्या करितात; आणि बर्याच लोकांनां हिंदुंच्या बाहेर काढतात. ही इंग्रजांची वृत्ति म्हणून जी सांगितली ती कांही विशिष्ट व्यक्तिसंबंधानें आहे. सरकारी वृत्ति यासंबंधानें पूर्णपणें निश्चयात्मक नाही; आणि या संबंधानें सरकारी धोरण बरेंचसें तटस्थपणाचें आहे असें म्हणण्यास हरकत नाहीं.
सेन्सस रिपोर्टांत ही अडचण भासून जैन, शीख, ब्रह्मो, आर्यसमाजी यांचे आंकडे पृथक मानण्यासाठीं पण हिंदूंपासून त्यांचें पृथक्त्व नाहीं असें दाखविण्यासाठीं इंडोआर्यन रिलिजन यामध्यें सर्वांचा समावेश केला आहे.
ज्या लोकांस विशेष आचारसंप्रदायाचा, ग्रंथाचा अगर तत्त्वांचा अभिमान असतो ती मंडळी आपलें मतवैशिष्ट्य हिंदुत्वाच्या लक्षणांत घालतात. महानुभाव, जैन इत्यादि हिंदु नाहींत असें म्हणणारे ग्रंथकार याच विशिष्ट भावनेनें प्रेरित होतात. असो. सध्यां आपण हिंदु हा शब्द सर्वांस समजतो असें धरून चालूं.
मानववंशविषयक आणि सांस्कृतिक संबंध :— भारतीयांचा इतर जगाशीं संबंध अनेक प्रकारचा आहे. कांहीं अशीं हा संबंध रक्ताचा आहे. म्हणजे वेद हे ज्या लोकांच्या पूर्वजांनीं लिहिले त्या लोकांचे पूर्वज इतर देशांतील लोकांच्या पूर्वजांचे भाईबंद होते. शिवाय आपल्या देशांतील लोकांचे परदेशगमन अनेक शतकें होत असून त्या इतरत्र गेलेल्या लोकांनीं तद्देशीयांत आपला अंतर्भाव करून घेतला. यूरोपांत आणि अमेरिकेंत जे जिप्सी म्हणून लोक आहेत ते तर याच देशांतीले. गेल्या पाऊणशें वर्षांत लाखों लोक परदेशीं जाऊन तेथें वसती करून राहिले. त्या सर्वांचा हिशोब घेतल्यास आपल्या रक्ताचा हिंदुस्थानाबाहेर संबंध काय आहे हें लक्षांत येतें.
आपल्या देशांतील संस्कृतीचा प्रसार देशाबाहेर पाहिला तर तो देखील पुष्कळच झाला आहे. हिंदुस्थानाबाहेर कांही देशच्या देश बौद्ध झाले आहेत, आणि कांही ठिकाणीं शैव संप्रदाय अजून चालू आहे. कांही ठिकाणीं ब्राह्मणहि आहेत. या सर्व गोष्टींचें वर्णन पुढें येईलच. संस्कृतीचा प्रसार माणसें गेल्याशिवाय होत नाहीं म्हणून जेथें आपली संस्कृति पसरली तेथें माणसांचीहि वसती झाली आणि पुढें तीं माणसें इतर जनतेंत मिसळून गेलीं असावींत असें धरण्यास हरकत नाहीं. यासाठीं आपला आणि इतर जगाचा संबंध शोधतांना आजचें परदेशगमन आणि पूर्वकाळीं झालेला संस्कृतीप्रसार या दोन्ही गोष्टी लक्षांत घेतल्या पाहिजेत.
भारतीय संस्कृतिप्रसाराचें सर्व जगांतील मनुष्यसमूहाच्या आयुष्यक्रमांत स्थान शोधण्यासांठीं प्रथम सर्व मनुष्यसमूहाच्या हालचालींची आपणांस स्थूल माहिती पाहिजे. ही आपणांस थोडी बहुत अनुमानानें अवगत आहे. जगांतील मनुष्यसमूहाचा एकंदर कार्यक्रम समजला म्हणजे भारतीयांचें जगाच्या इतिहासांत स्थान अधिक स्पष्ट होईल. या हालचाली शोधण्याचें काम मानवशास्त्रज्ञांचें आहे.
मानवशास्त्रज्ञांचा मुख्य विषय मानवेतिहास होय. त्यांनीं व इतर शास्त्रांच्या अभ्यासकांनीं आजपर्यंत जे परिश्रम केले त्यांवरून त्यांनां मानवेतिहासविषयक कांहीं गोष्टी समजल्या आहेत. निरनिराळ्या काळांच्या परिस्थितींची सर्व अंगें एकदम समजत नाहींत तथापि जी कांहीं माहिती मिळते तीवरून जगाचा एकंदर इतिहास कसा झाला असेल याविषयीं कांहीं कल्पना बसवितां येते. समाजशास्त्रज्ञ आणि मानवेतिहासज्ञ मनुष्यजातीच्या एकंदर इतिहासाविषयीं ज्या कांहीं गोष्टी मनांत वागवितात त्या येणेंप्रमाणे :—
मनुष्यजाति ही कोणत्या तरी मनुष्यकल्प प्राण्यांत बदल होत होत कोणत्या तरी काळीं आणि कोणत्या तरी स्थळीं तयार झाली.
मनुष्यप्राण्याची जगावर वसति जी कित्येक हजारों किंवा लाखों वर्षें असेल त्या अवधींत एकसारखी वाढत आहे. मूळचीं माणसें फार तर कांहीं हजार असतील आणि त्यांचा वंशविस्तार होत होत आज दीडशें कोटींवर वाढ झाली आहे.
मानवी संस्कृतीच्या जुन्या काळीं म्हणजे सांस्कृतिक प्रगति अल्प असतां मानवी जातीच्या व्यक्तीचें इतस्ततः भ्रमण होऊन मानवजातीच्या अनेक म्हणजे पुष्कळच लहान लहान जमाती तयार झाल्या. याप्रमाणें जे भ्रमण होऊन वियुक्त होत गेले ते बहुतेक एकटे पडले, त्यांचा व इतरांचा संबंध बराच कमी कमी राहात गेला.
संस्कृतीच्या इतिहासांत बर्याच उत्तरकालीं हे मानवी समुदाय जे एकाकी आणि एकमेकांकडून जवळ जवळ अस्पृष्ट अशा स्थितींत पडले होते ते आतां अधिक दळणवळण, अधिक परस्परसहवास, ज्ञातींचें संघीकरण आणि परस्परविवाह यांच्याकडे प्रवृत्ति दाखवित आहेत.
मनुष्य पोट भरण्याकरितां स्थलांतर करितो. तो केव्हां केव्हां एखाद्या ठिकाणीं बरींच वर्षें किंवा कायमचा राहतो. हें त्याचें विवक्षित ठिकाणीं राहणें त्याच्या त्या ठिकाणच्या सांपत्तिक स्थितीचा उपयोग करण्याच्या शक्तीवर अवलंबून असतें व ही शक्ति सामान्यतः तो ज्या सांस्कृतिक परिस्थितींत असेल तीवर अवलंबून असते, आणि हीच सृष्ट्युपभोगशक्ति त्याची भविष्यकालीन संस्कृति निश्चित करिते.
मनुष्यजातीचें ज्या वेळीं निरनिराळ्या दिशांनीं स्थलांतर होत होतें त्या वेळी त्यांच्यामध्यें शारीरिक व भाषाविषयक अनेक भेद उत्पन्न झाले; आणि यामुळें अनेक मानववंश निर्माण झाले. एकमेकांशी दळणवळण, अधिक परस्परसहवास, ज्ञातींचें संघीकरण आणि परस्परविवाह यांच्या कालांत स्थलांतराच्या कालांत उत्पन्न झालेले शारीरिक आणि भाषाविषयक भेद कमी कमी होत जात आहेत.
आर्य संस्कृति आणि भारतीय भाषा - ज्या आपल्या संस्कृतीचें सातत्य आपण गातों ती संस्कृति गीर्वाणवाणीचा आश्रय करून आहे. आम्हां भारतीयांचें आजचें वाङ्मय अनेक देश्य भाषा, तसेंच संस्कृत भाषा व पाश्चात्यांनीं आपणांस शिकविलेली इंग्रजी भाषा या सर्वात थोडें फार आहे. ही आजची अवस्था झाली. तथापि अत्यंत प्राचीन कालीं आपणास आपलें संस्कृतिसंवर्धन एकाच भाषेनें करावयास सांपडलें.
आपलें बरेचसें प्राचीन वाङ्मय संस्कृत भाषेंत सांपडतें हें जरी खरें आहे, तथापि संस्कृत वाङ्मय व भारतीय वाङ्मय सर्वथैव एकच नव्हत. भारतीय वाङ्मयाच्या इतिहासांत सर्व ठिकाणचे संस्कृत ग्रंथ येत नाहींत. उलटपक्षीं भारतवर्षांतील अनेक भाषांत लिहिलेले ग्रंथ भारतीय वाङ्मयाच्या इतिहासांत येतात. 'आर्यन् भाषा' म्हणून जो भाषांचा वंश भाषाशास्त्रज्ञांनीं कल्पिला आहे त्या वंशवृक्षाच्या भारतीय शाखेत अर्वाचीन हिंदुस्थानांतल्या ज्या भाषा व पोटभाषा येतात त्या मुख्यतः तीन अवस्थांतून आलेल्या आहेत. या भाषावस्था अशा :—
१ अत्यंत प्राचीन गीर्वाण भाषा. (वेदभाषा).
२ प्राचीन गीर्वाण भाषा. (संस्कृत).
३ प्राचीन अपसृष्ट भाषा. (अपसृष्ट म्हणजे पाणिनीय संस्कृत भाषेपासून दूर सरकलेल्या, प्राकृत).
वेदभाषा - वेदग्रंथातील स्तोत्रें, प्रार्थना, मंत्रतंत्र, वगैरे जे प्राचीनतम भारतीय वाङ्मयाचे अवशेष आज उपलब्ध आहेत, त्यांत वापरलेली भाषा ही या पहिल्या सदरांत येते. हिला वेदभाषा असेंहि म्हणतात. ही वेदभाषा जरी एकाकालीं आमच्या बोलण्याच्या भाषेचेंच उच्च स्वरूप होतें तरी हिचा हा दर्जा पूर्वींच नाहींसा झाला असून अलीकडे केवळ शास्त्री पंडित लोकांत वंशपरंपरेंनें वेदमंत्र वगैरे म्हणण्याच्या कामींच हिचा उपयोग होत आलेला आहे. या भाषेची जुनाट रचना अद्यापिहि बुद्धिपुरःसर कायम ठेवण्यांत आलेली आहे.
वेदभाषा व पर्शुभारतीय मूलभाषा-वेदभाषा एका काळीं सामान्य लोकभाषा होती आणि ती भरतखंडाच्या वायव्येकडील प्रदेशांत आलेल्या "आर्य" म्हणविणार्या लोकांत चालत होती. ही भाषा प्राचीन इराणी व बॅक्ट्री या भाषांशीं अगदीं सदृश असून वेदभाषा व प्राचीन अवेस्ती भाषा यांच्या तुलनेनें भाषाशास्त्रवेत्त्यांनीं कल्पिलेली जी 'पर्शुभारतीय' भाषा त्या मूलभाषेहून फारशी वेगळी नसावी. संस्कृत व पाली या भाषांत जितका फरक आहे तितका वेदभाषा व पर्शुभारतीय मूलभाषा यांमध्ये असेल असें दिसत नाहीं.
संस्कृत व वेदभाषा - य़ा दोहोंतील वर्णोच्चार बहुधा सारखेच आहेत. यांमध्यें जो फरक आहे, तो वेदभाषा संस्कृतपेक्षां फार जुनी असून तींत संस्कृतपेक्षां पुष्कळच अधिक रूपें व प्रयोग वगैरे आहेत, यामुळें आहे. उदाहरणार्थ या जुन्या वेदभाषेंत संकेतार्थ आहे तो संस्कृतांत नाहीं; जुन्या भाषेंत तुबन्ताचें रूप १०।१२ प्रकारांनीं साधीत असत, सध्यां एकच प्रकार आहे; इत्यादि.
वेदभाषेचीं दोन स्वरूपे-वेदभाषेचें जें स्वरूप ऋग्वेदाच्या प्रथम नऊ मंडळांत प्रामुख्यानें सांपडतें तें ऋग्वेदाचें दहावें मण्डळ व अथर्ववेदांतील आणि यजुर्वेदांतील कांही भाग यांमध्यें दृष्टीस पडत नाहीं.
वैदिक ग्रंथांत संस्कृत - ब्राह्मणें, आरण्यकें व उपनिषदें हे जे वैदिक गद्य ग्रंथ आहेत त्यांत जुनी वेदभाषा अगदीच थोडी असून ते बहुधा संस्कृत भाषेंतच आहेत असें म्हणतां येईल. वेदांगांतील सूत्रें कांहीं ठिकाणीं वैदिक स्वरूपाचीं दिसतात तरी मुख्यतः तीं शुद्ध संस्कृतांत आहेत.
वेदाचें व्याकरण - वेदभाषेच्या व्याकरणावर पाणिनीनें परिश्रम केले पण पाणिनीनंतर या विषयावर पुढें फारसा परिश्रम झाला नाहीं, आणि अर्वाचीन ऐतिहासिक दृष्टि पाणिनीनें व इतरांनीं क्वचितच वापरली आहे. यामुळें वेदविषयक अभ्यासाचे कामीं केवळ या वैयाकरणांवर विसंबून राहिल्यास अभ्यासांत बराच दोष राहतो. हा दोष अर्वाचीन ऐतिहासिक दृष्टीच्या वैयाकरणांच्या मदतीनें थोडाफार दूर करितां येतो. अर्वचीन पाश्चात्य पंडितांनीं वेदांतील निरनिराळ्या शब्दांचा, अव्ययांचा, प्रत्ययांचा वगैरे ऐतिहासिक अभ्यास केला असून त्या अभ्यासाचा उपयोग त्यांनीं वेदांतील सुक्तांचा कालानुक्रम ठरविण्याकडे केला आहे.
वेदकाल-वेदाचा रचनाकाल म्हणजे एक लहानसा काल नसून तो एक किंवा अनेक हजार वर्षांचा काल असावा असें दिसतें. या कालांतच य़ज्ञ लहानांचे मोठे बनले व जवळ जवळ नष्टही झाले. मूळ देवतांचीं स्वरुपें पालटून नवीन दैवतें उत्पन्न झालीं. वैदिक भाषा बोलणारांची प्रगति अफगाणिस्तानापासून बिहारपर्यंत झाली हें ऋग्वेदमंत्रांवरून दिसून येतें. तैत्तिरीय आरण्यक व ऐतरेय ब्राह्मण हे ग्रंथ घेतले तर आंध्र कर्नाटकादि दाक्षिणात्य राष्ट्रांचाहि उल्लेख त्यांत आढळतो. वेद कालाच्या दिर्घत्वाची कल्पना ज्या एका गोष्टीवरून बरीच चांगली येते ती ही कीं, वेदकालांत उत्तरार्धांतील लोकांस पूर्वांर्धांतील लोकांची भाषा समजेनाशी झाली होती. कुटण्याच्या क्रियेच्या वाचक शब्दाशीं एका शब्दाच्या ध्वनिसादृश्याखेरीज कांही एक संबंध नाहीं असा "कुक्कुटोसि मधुजिव्ह" हा कुटण्यासाठीं बेधडक योजलेला मंत्र वाजसनेय संहितेंत सांपडतो. मंत्रांचा अर्थ जनतेस कळत नसल्यामुळे क्रिया व मंत्र यांची जुळणी करतांना मंत्राच्या अर्थाच्या ऐवजीं मंत्रांतील शब्दांच्या ध्वनीवरून अडाणी श्रोत्यांमध्यें मंत्र क्रियावाचक आहे असा भाव उत्पन्न होईल या अपेक्षेनें वाटेल तो मंत्र दडपून द्यावयास जनता मंत्राची भाषा न समजण्या इतकी अपसृष्ट झाली असली पाहिजे हें स्पष्ट होतें. अशा तर्हेचीं मंत्रांच्या भाषेशीं जनतेच्या असलेल्या अपरिचयाचा फायदा घेतला जात आहे असें दाखविणारीं उदाहरणें उत्तरकालीन विधींच्या प्रयोगांत अनेक आढळतात. वेदकाल म्हणून उल्लेखिलेल्या या दीर्घ युगांत साखर, मीठ इत्यादि उपयुक्त जिनसांशीं व यवाखेरीज इतर धान्यांशीं आर्यांचा परिचय नव्हता त्या कालापासून तों तहत अनेक धान्यांशीं व इतर जिनसांशीं त्यांचा दृढ परिचय ज्या कालांत झाला त्या कालापर्यंतचा सर्व काल येतो.
राजकीय दृष्टीनें या युगाकडे पाहिलें तर सर्वत्र लहान लहान संस्थानें आणि तेथें राजांची निवडणूक अशाप्रकारचें शासनसंस्थाशैशव या युगाच्या एका भागांत दृष्टीस पडतें, तर त्याच्याच दुसर्या भागांत मरुत्ताच्या साम्राज्यासारखीं मोठमोठीं साम्राज्यें दृष्टीस पडतात. तसेंच, सामाजिकदृष्ट्या पाहतां अस्थिर स्त्रीपुरुषसंबंधापासून पूर्ण प्रगल्भ अशागृहस्थधर्माच्या स्थापनेपर्यंतचा दीर्घकाल या वेदरचनायुगांत मोडतो. या सर्व गोष्टींवरून वेदकालाचा दीर्घ विस्तार आपल्या लक्षांत येतो. असो.
संस्कृत भाषेचीं तीन स्वरूपें :- पाणिनीय, गद्यग्रांथिक, आर्षकाव्य :— ब्राह्मणें, आरण्यकें, व उपनिषदें हे उत्तर वेदकालांतील गद्यप्रचुर ग्रंथ व सूत्रग्रंथ यांची संस्कृत भाषा व पाणिनीनें उपदेशिलेली संस्कृत भाषा या दोहोंत फारसा फरक नाहीं. उपर्युक्त ग्रंथांच्या भाषेला 'प्राचीन संस्कृत' असें म्हणणें सोईचें होईल. या ग्रंथांच्या रचनाकालीं व तत्पूर्वीं कांहीं काल विद्वान् लोक व पुरोहीत वर्गांतील लोक बहुधा ही भाषा वापरीत असावेत. पाणिनी ख्रि. पू. ७५० व्या वर्षाच्या सुमारास किंवा त्याहूनहि पूर्वीं होऊन गेला असावा. कात्यायनानें जी भाषा प्रचलित म्हणून गृहीत धरलेली आहे त्या भाषेंत आणि पाणिनीकालीन भाषेंत जे फरक दृग्गोचर होतात त्या फरकांची भोंवतालच्या राजकीय घडामोडींशीं संगति लावून रा. राजवाडे यांनीं पाणिनीस ख्रि. पू. ७५० वर्षांच्या पलीकडे ढकललें आहे.* पंतजलीच्या कालींहि ही प्राचीन संस्कृत भाषा शिष्ट लोकांत रूढ होती. याच कालीं हिचें एक स्वरूप सामान्य लोकांत प्रचारांत होतें तें आपणास तत्कालीन आर्ष महाकाव्यांतून आढळतें. हे रामायणमहाभारतांतील संस्कृत व अभियुक्त (पाणिनिय) संस्कृत यांत फरक आहे तो एवढाच कीं, अभियुक्त संस्कृतांत नियमबद्धता अधिक असून लोक भाषेपासून तें बरेंच निराळें आहे व त्यांत रामायणमहाभारताच्या संस्कृताइतके जुने प्रयोग नाहींत. हे स्वरूपभिन्नतेचें कारण न समजल्यामुळें पंडितवर्गास मौज उत्पन्न करणारा असा एक गीतेंतील नाना प्रकारच्या 'चुका' दाखवूं पाहणारा लेख भांडारकरांच्या स्मारक ग्रंथांत एका सुशिक्षित ब्राह्मणानें लिहिला आहे. संस्कृत व प्राकृत गद्यग्रांथिक भाषा व आर्ष काव्यभाषा हीं समाजांतील निरनिराळ्या वर्गांच्या भाषांचीं स्वरूपें होतीं. यांचेंच पर्यवसान संस्कृत व प्राकृत या भेदांत झालें. संस्कृत व प्राकृत या भाषा एकाच कालीं समाजांतील निरनिराळे वर्ग वापरित होते.
राजा, ब्राह्मण, सरदार लोक व कांही सुशिक्षित स्त्रिया यांच्या तोंडी संस्कृत व इतरांच्या तोंडीं प्राकृत अशी जी व्यवस्था नाटकांतून आढळून येते, तीवरुन नाटकें लिहिली गेलीं त्याकाळाचे पूर्वीं म्हणजे ख्रिस्तशकापूर्वीं कित्येक शतकें सामान्य लोकांनां संस्कृत बोलतां येत नसलें तरी बोललेलें समजत असे असा सिद्धांत काढण्यांत आला आहे.
संस्कृत ही मृतभाषा नव्हे. – पाश्चात्य ग्रंथकारांस संस्कृत भाषेस मृत किंवा जिवंत यापैकीं कोणता शब्द लावावा याचीच मोठी फिकीर पडलेली दिसते. जिवंत हा शब्द लावण्यासाठीं किंवा निदान मृत शब्द न लावावा या हेतूनें विंटरनिट्झ म्हणतो :— "संस्कृत भाषा ही मृत भाषा आहे असें म्हणणें चुकीचें ठरेल. तिला फार तर बद्ध भाषा असें म्हणतां येईल. कारण, या भाषेला पाणिनीसारख्या व्याकरणकारांनीं व्याकरणनियमांनीं गच्च आंवळून टाकल्यामुळें कांहीं दिवसांनीं हिची वाढ खुंटली. पाणिनिय व्याकरणाप्रमाणें जें शुद्ध संस्कृत त्यासच अभियुक्त संस्कृत ही संज्ञा आहे. पाणिनीनंतर हजार एक वर्षेपर्यंत या भाषेंत अनेक नवीन काव्यें व शास्त्रग्रंथ निर्माण झाले व अद्यापिहि अशीं काव्यें व ग्रंथ होत आहेत. आजच्या घटकेला हिंदुस्थानांत अनेक संस्कृत पंडीत अनेक नियतकालिकें व ग्रंथ संस्कृतांत लिहून प्रसिद्ध करीत आहेत. महाभारत, रामायण वगैरे पुराणांचें अद्यापि श्रवण व वाचन चाललेलें आहे. संस्कृत काव्यें व लेख अजूनहि निर्माण होत आहेत व पुष्कळ विद्वान् लोक संस्कृत भाषेमध्यें शास्त्रीय विषयांवर अस्खलित भाषण करतांना दृष्टीस पडतात. तेव्हां या सर्व गोष्टी समोर दिसत असून संस्कृत भाषा ही मृतभाषा आहे असें कसें म्हणतां येईल ?" येणेंप्रमाणें विटर्निट्झची विचारसरणि आहे. असो. या प्रकारच्या वादाशीं आपणास कांही कर्तव्य नाहीं. लॅटिन भाषेचा यूरोपच्या इतिहासांतील मध्ययुगांत जितका प्रचार होता अगर हिब्र्यू भाषेचा यहुदी लोकांत जितका आज प्रचार आहे, तितकाच संस्कृत भाषेचा प्रचार आज भरतखंडांत आहे एवढें लक्षांत ठेवलें म्हणजे झालें.
प्राचीन भारतीय भाषांचे वर्गीकरण - वरील विवेचनावरून प्राचीन भारतीय भाषांचें वर्गीकरण थोडक्यांत पुढें दिल्याप्रमाणें मांडतां येईल. (१) वेदभाषा. (अ) पूर्वकालीन - विशेषतः ऋग्वेदांतील स्तोत्रमंत्रांची भाषा. (आ) उत्तरकालीन - ब्राह्मण, सुत्रें व फार पुरातन नव्हत अशा-विशेषतः ऋग्वेदाखेरीज इतर वेदांतील-स्तोत्रमंत्रांची भाषा. (२) संस्कृत. (अ) प्राचीन संस्कृत— वैदिक गद्य ग्रंथांची (त्यांतील मंत्र खेरीज करून) व पाणिनीची भाषा. (आ) ऱामायणमहाभारतांतील संस्कृत. (इ) पाणिनीय संस्कृत— पाणिनीच्या नियमानुसार संस्कृत साहित्यग्रंथांतून लिहिलेली संस्कृत भाषा. (३) प्राकृत उर्फ अपसृष्ट भाषा— संस्कृत भाषेच्या वाढीबरोबरच भारतीय आर्य लोकांमध्यें प्रचलित असलेल्या इतर भाषांची साहजिकपणें वाढ होत गेली. या भाषा व पोटभाषा प्रत्यक्ष संस्कृतवरून निघाल्या नसून, प्राचीन आर्ष भाषा व संस्कृत भाषा यांच्या मुळाशीं असलेल्या सामान्य जनतेच्या भाषांपासून जन्म पावल्या असल्या पाहिजेत. त्यांचें वेदभाषेशीं अगर पाणिनीय भाषेंशीं माता व कन्या हें निकटचें नातें नसून केवळ सामान्य आप्तसंबंधाचें नातें आहे. परदेशांतून हिंदुस्थांनांत आलेले आर्य लोक जसजसे पश्चिमेकडून पूर्वेकडे वसती करीत गेले, तसतसे पुष्कळ प्रांतिक भाषाभेद उत्पन्न होत गेले. (संहितेमध्यें जो भाषाभेद दृष्टीस पडतो त्यांचे कारणहि कांहीं अंशीं प्रांतिक भाषाभेद हेंच असावें). या भाषाभेदांतूनच उत्तरकालीन प्राकृत भाषा निघाल्या. सर्वांत जुने शिलालेख संस्कृत भाषेंत नसून प्राकृत अथवा अपसृष्ट म्हणजे पाणिनीय संस्कृत भाषेपासून दूर सरकलेल्या भाषांत आहेत. या लेखांवरून या लौकिक भाषांतील परस्परभेद दृष्टोत्पत्तीस येतो. अपसृष्ट भाषांपैकीं कांही थोड्या अभिजात भाषांच्या पदवीस पोंचल्या आहेत, त्या खालीं दिल्या आहेत.
(१) पाली भाषा व तिची उत्पत्ति :— या अपसृष्ट भाषांपैकीं सर्वांत जुनी पाली ही होय. ही सिलोन, ब्रह्मदेश, व सयाम येथील बौद्ध भिक्षुवर्गाची भाषा होय. बौद्ध संप्रदायाचे पूज्य व पवित्र असे धार्मिक ग्रंथ याच भाषेंत लिहिलेले आहेत. बुद्धास संस्कृत येत असो अगर नसो, तो संस्कृत भाषेंत उपदेश करीत नसून लोकभाषेंत करीत असे हें मात्र निःसंशय आहे. बुद्धाचें प्रथम कार्यक्षेत्र मगध असल्यामुळें त्याची 'पालीभासा' म्हणजे मागधीच होय, असें बौद्धांचें म्हणणें आहे. परंतु या म्हणण्यावर आपेक्ष घेण्यास जागा आहे. कारण मगधदेशीय भाषा जी आपणास इतर साधनांवरून उपलब्ध झाली आहे, ती पाली भाषेहून स्पष्टपणें निराळी दिसते. पाली भाषा ही उज्जयिनिच्या भाषेपासून निघाली असावी ही गोष्ट प्राकृत भाषांच्या अभ्यासकांस वरील बौद्धांच्या कल्पनेपेक्षां जास्त संभवनीय दिसते. तें कसेहि असो. पाली भाषेंत लिहिलेले जे ग्रंथ आहेत, तेच आपणाला प्राचीन व मूळच्या बौद्ध धर्माचें व संप्रदायाचें यथार्थ ज्ञान करून घेण्याच्या कामीं सर्वांत अधिक विश्वसनीय आहेत, एवढें मात्र खरें.
पाली या शब्दाची व्युत्पत्ति.— पाली या शब्दाचा मूळ अर्थ 'पाळी' (रांग) असा असून नंतर नियम, व्यवस्था वगैरे अर्थ याच्या अर्थकक्षेंत शिरला व पुढें सांप्रदायिक नियम असा त्याचा अर्थ होऊन शेवटीं या सांप्रदायिक ग्रंथांची भाषा या अर्थी त्याचा प्रयोग होऊं लागला. हा शेवटचा अर्थ या शब्दाला प्राप्त होण्याचें कारण सिंहली टीकाग्रंथांपासून मूलग्रंथांच्या भाषेंचें पृथकत्व स्थापित करण्याचा कांही ग्रंथकारांचा हेतु हें होय, असा विंटरनिट्झ व इतर पाश्चात्य ग्रंथकार तर्क करितात. प्रकट (म्ह. उघडी=सामान्य जनांची) या शब्दापासून 'पाली' शब्दाची व्युत्पत्ति रा. राजवाडे यांनीं आपल्या ज्ञानेश्वरीच्या प्रस्तावनेंत लाविली आहे. या पंडितांच्या वरील व्युत्पत्तींविषयीं येथें नमूद केलें पाहिजे कीं, 'प्रकट' किंवा 'पाली' हे दोन्ही शब्द किंवा यांचीं पूर्वरूपें वरील अर्थानें संहितांत अगर ब्राह्मणांत आढळत नाहींत.
(२) 'गाथाभाषा' अथवा 'मिश्रसंस्कृत' :— बौद्ध वाङ्मय पाली भाषेंत जसें आहे तसें संस्कृतांतहि आहे. या वाङ्मयग्रंथांतील गद्यभाग बहुधा संस्कृत आहे, व मधून मधून जो पद्यभाग अथवा गाथा आहेत त्या एका देश्य भाषेंत आहेत. हिला 'गाथाभाषा' असें नांव देतात. वरील ग्रंथांतील कांही गद्यभागहि या गाथाभाषेंत आहेत. तसेच केवळ या भाषेंत लिहिलेले असे कांहीं स्वतंत्र ग्रंथहि आहेत. या भाषेंत पुष्कळ संस्कृत प्रत्यय व इतर संस्कृतांतील प्रयोग मिसळले असल्यामुळें हिला सेनार्ट यानें 'मिश्र संस्कृत' असें नांव सुचविलें आहे.
मानववंशशास्त्र :— या शास्त्राचें ध्येय मनुष्यांच्या आज अस्तित्वांत असलेल्या अनेक जातींची पहणी करून त्यांचें वंशवृद्धिबोधक वर्गीकरण करणें. मनुष्यप्राणी विकास पावल्यानंतर आणि त्याचा कांहींसा मोठा जमाव झाल्यानंतर भक्ष्यशोधार्थ म्हणा कीं अन्य कारणार्थ म्हणा त्याच्या टोळ्या इतस्ततः भ्रमण करूं लागल्या. दोन टोळ्यांमध्यें जसजसें प्रादेशिक अंतर पडे, तसतसें त्यांच्यामध्यें भाषाविषयक, आचारविषयक, खाद्यपेयविषयक, वस्त्रविषयक, भूषणविषयक अंतर पडत जाई. यामुळेंच विविध संस्कृति जन्मास आल्या. मानववंशशास्त्राचें हें ध्येय आहे कीं, मनुष्यांच्या टोळ्या तपासून आणि उपर्युक्त दृष्टींनीं त्यांचें वर्गीकरण करून त्यांच्या प्रसाराचा व भिन्नीकरणाचा इतिहास लावणें. या मानववंशशास्त्रासंबंधानें पाश्चात्यांत दोन शब्द प्रचारांत आहेत, एक शब्द अनथ्रोपॉलॉजी (Anthropology) 'मानवशास्त्र' आणि दुसरा शब्द एथनॉलॉजी (Ethnology) 'वंशशास्त्र'. हे दोन शब्द शास्त्रज्ञांच्या स्थानभेदामुळें उत्पन्न झाले आहेत आणि दोन्ही शब्द कायम राखून प्रत्येकास कांहींतरी अभ्यासक्षेत्र वांटून देण्याची निरर्थक तडजोड सध्यां चालू आहे. आपण मानववंशशास्त्र हा एकच शब्द वापरूं आणि वर सांगितलेले दोन्ही शब्द गुंडाळून ठेवूं.
मानववंशशास्त्र व मानवेतिहास हें फार मोठें शास्त्र झालें. याला साहाय्यक अशीं अनेक शास्त्रें अस्तित्वांत आलीं आहेत. एक भाषाशास्त्र घ्या. निरनिराळ्या जाती व राष्ट्रें निरनिराळ्या भाषा बोलतात. त्यांपैकीं कांहीं भाषा इतर भाषांपेक्षां परस्परांशीं अधिक सदृश असतात. हें सादृश्य दोन तर्हेचें असतें. एक भाषान्तर्गत शब्दांचें सादृश्य आणि दुसरें भाषेच्या अन्तर्रचनेचें म्हणजे व्याकरणाचें सादृश्य. या दोन सादृश्यांनां यूरोपीयांनीं आज दोन निरनिराळीं नावें दिलीं आहेत. 'फिलालॉजी' (Philology) म्हणजे शब्दशास्त्र व 'लिंग्वस्टिक्स्' (Linguistics) म्हणजे भाषाशास्त्र अथवा निरनिराळ्या भाषांतील व्याकरणांचें शास्त्र. यास प्रसंगीं तौलनिक व्याकरण म्हणजे 'कंपॅरटिव्ह ग्रामर' (Comparative Grammar) असेंहि म्हणतात. वेदाच्या अभ्यासास हीं दोन्हीं शास्त्रें उपयोगिलीं गेलीं आहेत.
मानववंशशास्त्रामध्यें शोध करण्यासाठीं जें साहित्य जमा झालें त्याचें एक अंग म्हटलें म्हणजे मनुष्याचें शरीरस्वरूप होय. शरीरस्वरूपावरून मनुष्याचें वर्गीकरण करून त्यांतील मोठ्या फरकांवरून मोठे समुच्चय आणि लहान फरकांवरून लहान समुच्चय बसविले आहेत. मोठ्या फरकांवरून मनुष्यांचें आद्य दूरीकरण अनुमानावयाचें आणि लहान फरकांवरून उत्तरकालीन दूरूकरणें अनुमानावयाचीं अशी सामान्य कल्पना मनांत धरून मनुष्यांच्या शारीरिक फरकांच्या अभ्यासास आणि तज्जन्य वर्गीकरणास ऐतिहासिक अर्थ व महत्त्व दिलीं गेलीं आहेत. 'आर्यन' लोकांचा मूलगृहकाल आणि त्यांचें मूलगृहस्थान शोधण्यासाठीं जी खटपट चालू आहे, त्या खटपटीचा हेतू हाच कीं, मनुष्याच्या निरनिराळ्या जातींचें जें दूरीभवन झालें त्या दूरीभवनाचा इतिहास सांपडावा. हा इतिहास शोधण्यांत शारीरिक स्वरूप, भाषा, दैवतें, समजुती, आचार आणि पुराणकालीन कथा या सर्वांचा उपयोग केला आहे.
आर्यन् व आर्य :— आम्ही वर 'आर्यन्' शब्द वापरला आहे, तो मुद्दाम वापरला आहे. आर्य हा शब्द वापरला असतां वाचकांचा घोंटाळा होईल. आर्य या शब्दाचा अर्थ पाश्चात्यांनीं फिरविला आहे. ऋग्वेदकालीन लोक आपणांस आर्य म्हणवीत. जो शब्द वंशवाचक आहे पण राष्ट्रवाचक नाहीं आणि अशा प्रकारच्या शब्दांत जो फार जुना असून ज्यास गौरव प्राप्त झालें आहे असा शब्द हाच. या कारणानें यूरोपीयांनीं आर्य शब्दाची अर्थकक्षा वाढवून आर्य नांवानें संबोधिलेल्या जातींत अगर वर्गांत आपल्या पूर्वजांचा समावेश करून घेतला आहे. यूरोपीय लोकांचा आर्य (आर्यन्) शब्दाचा अर्थ, संस्कृत भाषेंशीं जिचें बहिणींचें अगर चुलत बहिणीचें अगर चुलतचुलत पुतणींचें किंवा चुलतचुलत चुलत नातवंडाचें किंवा पणतवंडाचें नातें जोडतां येईल अशा भाषा केवळ आनुवंशानें बोलणार्या जातींचा समुच्चय असा आहे. हा अर्थ व्यक्त करण्यासाठीं आम्ही त्यांनींच वापरलेला शब्द 'आर्यन्' हा योजीत आहों. आणि हा भेद पूर्वीं डॉ. केतकर यांच्या (Ketkar’s History of Caste in India) जातिभेदाच्या इतिहांसात वापरला आहे. आपल्याकडील आर्य शब्दाचा अर्थ निराळ आहे. वैदिक सूक्तें जे लोक बरोबर घेऊन आले ते लोक आपणांस आर्य म्हणवीत. आर्य हा शब्द जातिवाचक होता अशी अजून कोणाचीच खात्री नाहीं. शिवाय या शब्दाचा पुढें पुढें तर सभ्याचारयुक्त मनुष्य म्हणजे 'जंट्लमन्' असा अर्थ झाला आहे. तरी जेथें जेथें 'आर्यन' हा शब्द येईल तेथें त्याचा पाश्चात्यांनीं केलेला अर्थ म्हणजे भारतीय, इराणी व यूरोपीय यांचे पूर्वज एकत्र रहात होते तत्कालीन लोक किंवा त्यांचे सर्व वंशज असा समजावा व त्या शब्दाचा वास्तविक आर्य शब्दांशीं घोंटाळा करूं नयें.
'आर्यन्' लोकांचें मूल वसतिस्थान कोठें होतें हें 'आर्यन्' लोकांच्या एंकदर सांस्कृतिक परिस्थितीच्या ज्ञानाशिवाय समजणार नाहीं. आणि तो काल कोणता असावा हे ठरविणें ही तर अधिकच कठिण गोष्ट होय. म्हणून मूलगृहाचा व मूलकालाचा विचार प्राचीन परिस्थितीच्या सामान्य कल्पना दिल्यानंतर करावा लागेल.
तौलनिक दैवतशास्त्र व दैवतेतिहास :— वेदाभ्यासासाठीं उपयोगास आणलेलें दुसरें एक महत्त्वाचें शास्त्र म्हटलें म्हणजे 'तौलनिक दैवतशास्त्र व दैवतेतिहास' हें होय.
शास्त्र व इतिहास या दोन शब्दांची दुक्कल येथें ठेवण्याचें कारण हे दोन अभ्यास विशेष परस्परावलंबी व अन्योन्याश्रयी आहेत हें होय. पूर्वेतिहास केवळ तुलना करून काढावयाचा असतो म्हणजे दैवतेतिहासार्थ अत्यंत प्राचीन काळापर्यंत गेलें तर दैवतांच्या सादृश्याखेरीज अर्थांत् तौलनिक दैवतशास्त्राखेरीज दुसरें साधन नसतें; आणि दैवतांच्या तुलनेचा म्हणजे दैवतशास्त्राचा अंतिम हेतु दैवतेतिहास हाच असतो. परंतु या दोन परिश्रमांत स्वरूपाचें पृथक्त्व आहे व हें पृथक्त्व दाखविण्यासाठींच नामपृथक्त्व रक्षिलें आहे. आपणांस साधारणतः असें आढळून आलें आहे कीं, एक देवतेची उपासना अनेक लोकांत पसरते. आणि एका दैवतसमुच्चयांत दुसर्या लोकांचीं दैवतें चोरून मारून किंवा राजरोस शिरतात. या दैवतेतिहासासाठीं किंवा तौलनिक दैवतशास्त्रासाठीं ज्या दैवतांची तुलना करावयाची तीं दैवतें एका वंशांतील भिन्न झालेल्या राष्ट्रांचीं म्हणजे भाऊबंदांचींच केवळ घेऊन चालत नाहीं, तर भाऊबंदांचीं व शेजार्यांचीं अशीं दोघांचींहि दैवतें तपासावीं लागतात. प्राचीन असुरांच्या राष्ट्राचा अंतर्भाव 'इंडोजर्मानिक' समुच्चयांत करीत नाहींत, तथापि प्राचीन इराणांतील दैवतांचा अभ्यास करीत असतांना इराणच्या दैवतांची तुलना जशी भारतीय व यूरोपीय दैवतांशीं करावी लागते तशीच असुरांच्या दैवतांशींहि करावी लागते. असुर लोकांचीं दैवतें कांही वेदग्रंथांत शिरलीं आहेत असा संशय रा. बाळ गंगाधर टिळक यांनीं आपल्या भांडारकरांच्या स्मारक ग्रंथांतील लेखांत व्यक्त केला आहे.
दैवतशास्त्राचें एक महत्त्वाचें अंग आहे. त्या अंगास आपण 'अवस्त्वास्तिक्यशास्त्र' असें म्हणूं. अवस्त्वास्तिक्यशास्त्र हा शब्द (Mythology) मायथॉलॉजी या गचाळ शब्दानें जे क्षेत्र अंधुकपणें दर्शविलें जातें त्याची कक्षा निश्चित करून त्या निश्चित क्षेत्राच्या अभ्यासास लाविला आहे. भावरूप अगर क्रियारूप अशा अनेक गोष्टी कांहीं कालानें लोकांच्या कल्पनेंत भौतिक व्यक्तीचें स्वरूप पावतात. तसेंच विशिष्ट गुणांचा आणि क्रियांचा कल्पनानिर्मित व्यक्तीच्या ठिकाणीं आरोप करण्यांत येतो. हा भौतिकरूपाश्रय कधीं कधीं अज्ञानमूलक असतो आणि कधीं कधीं रुपकमूलक असतो. प्रत्येक क्रियेस अधिष्ठात्री कोणीतरी देवता आहे अशा समजुतीनें केव्हां केव्हां हा प्रकार घडतो. आणि कधीं कधीं कायद्याचा अधिकार आणि जबाबदारी यांचें आश्रयस्थान होऊं शकेल अशी व्यक्ति बुद्धिपुरःसर कल्पिली जाते. सूर्यतेज आणि उषःकाल यांचे ठिकाणीं देवताबुद्धि उत्पन्न झाली, हें परिवर्तन वरील एका नियमाचेंच बोधक आहे. एखाद्या क्रियाकलापांतर्गत एका भावमय वस्तूस आपण देवता आहे असें समजलों म्हणजे तो क्रियासमूह त्या देवतेचीं कार्यें आहेत असें वाटावयास लागतें. आणि त्या क्रियासमूहामध्यें भावरूप कल्पनांच्या ऐवजीं अनेक भौतिक वस्तू असल्या म्हणजे तेथें कथासूत्रहि सुरू होतें. उदाहरणार्थ, सूर्य हा प्रेम करणारा आहे आणि तो उषासुंदरीच्या पाठीस लागला आहे अशी कल्पना उत्पन्न होते. कालांतरानें या गोष्टींचा विकास होऊन लांबलचक कथा बनतात. त्या कथांमध्यें कधीं कधीं मानवी कोटींतील आणि कधीं कधीं अद्भुत कोटींतील क्रिया आणि अंगें निर्माण होतात; आणि कालांतरानें मूळची विस्मृति पडून त्या अद्भुत चमत्कार करणार्या ऐतिहासिक व्यक्तीच होत्या कीं काय असें लोकांस वाटूं लागतें. प्रस्तुत शास्त्राचा उद्देश हाच कीं आजच्या अद्भुत गोष्टी व कथानकें घेऊन त्यांचें अवस्तुरूप म्हणजे भावरूप अगर क्रियारूप मूळ शोधीत जावयाचें. या शास्त्राची तौलनिक शाखा वेदाभ्यासानें वृद्धिंगत झाली आहे, 'ज्युपिटर,' 'युरेनस' इ. देवतांचें व तत्संबंधी कथांचें आदिसूत्र शोधण्यासाठीं इराणी व भारतीय वाङ्मयाकडेच यावें लागेल. कारण आमच्या वाङ्मयाच्या प्राचीनतम भागांत अवस्तूंस आस्तिक्य पूर्णपणें आलेलें नाहीं. वेदकालीन दैवतविषयक कथानकांतील रूपकें द्राक्षात्वचेइतकीं पारदर्शक आहेत; आणि त्यांचा अभ्यास आपणास जितसा फलप्रद आहे तितकाच तो यूरोपीयांसहि आहे.
संस्कृतींचा तौलनिक अभ्यास :— हा एक महत्त्वाचा विषय आहे. कोणत्याहि संस्कतीच्या स्वरूपाचा निश्चय तिच्या प्राचीन कालींच झालेला असतो आणि यासाठीं तौलनिक अभ्यास करतांना निरनिराळ्या संस्कृतींचें प्राचीन स्वरूपच तुलणें अवश्य असतें. हें प्राथमिक स्वरूप फारसें गुंतागुंतींचें नसतें. ज्या अनेक संस्कृती एकमूल असतील त्यांचे सादृश्य त्यांच्या प्राथमिक रूपांत सांपडतें आणि एका सामान्य संस्कृतीपासून भिन्न संस्कृती कसकशा होत गेल्या यासंबंधींचे नियम या अभ्यासानें कळतात. भारतातींल आचारविचार, वेष, शासनसंस्था, कुटुंबघटना यांची प्राचीनतम इराण व यूरोप यांच्या प्राचीनतम अवशेषांशीं तुलना केली असतां आपणास एक बराच महत्त्वाचा इतिहास-भाग उपलब्ध होणार आहे. शब्द व आचार यांची तुल्यें जितकीं अधिक सांपडतील तितका हा अभ्यास अधिक परिपक्व होईल. या संबंधाचा परिश्रम जोरानें चालू आहे.
तुलनात्मक भाषाशास्त्राच्या दृष्टीनें प्राचीनतम गोष्टींची चिकित्सा करितेवेळीं नुसत्या शब्दसादृश्यावरच भर न देतां पूर्वकालीन वस्तूंचे, आचारांचे आणि कल्पनांचे जे अवशेष आजमितीस सांपडतात त्यांच्याकडेहि वेळोवेळीं लक्ष पुरविणें जरूर आहे हे वर सांगितलेंच आहे. असें लक्ष पुरविलें तरच भाषाशास्त्राचे ऐतिहासिक शोध टिकाऊ व उपयुक्त होतील. या दृष्टीनें पहातांना 'इंडोयूरोपीय' लोकांच्या प्राक्कालीन इतिहासाचें संशोधन करतेवेळीं तुलनात्मक भाषाशास्त्राबरोबरच पुराणवस्तुशास्त्राचाहि विचार चुकवितां येणार नाहीं. हे पुराणवास्तुशास्त्र अद्यापि बाल्यावस्थेंत आहे. या शास्त्राचा विषय म्हटला म्हणजे पूर्वींच्या काळच्या निरनिराळ्या राष्ट्रांच्या जुन्या संस्था, चालीरीती, इत्यादिकांचें तुलनात्मक परीक्षण करून त्या राष्ट्रांत सामान्य अशा चालीरीती कोणत्या आढळतात, कोणत्या चालीरीती प्राचीनतम माणसांपासून चालत आलेल्या आहेत याचा निर्णय करणें हा होय.
मूलगृहकाल म्हणजे प्राचीन 'इंडोयूरोपिअन पीरिअड' या शब्दसमूहाने 'इंडोयूरोपीय' राष्ट्रें ज्या वेळीं साधारणतः एकच भाषा बोलत होतीं, त्यांची संस्कृति ज्या कालांत साधारणातः एकच दर्जाची होती तो काळ हा अर्थ विवक्षित आहे. मूलगृहीं असतांना त्यांच्यामध्ये अंतःस्थ काय भेद होते, मूलगृहकक्षेंत असतां हे लोक एकाच शासनसंस्थेखालीं होते कीं अनेक शासनसंस्थांखालीं होते हें आज पुराव्यानें सिद्ध झालेलें नाहीं. मोठा मनुष्यसमूह असला तर तो अनेक शासनसंस्थांखालीं असतो आणि ठोकून ठोकून एकत्र केल्याखेरीज तो एकराष्ट्रांतर्गत होत नाहीं ही स्वाभाविक प्रवृत्ति असल्यामुळें एका प्रदेशावर लहानलहान टोळ्यांची, गांवांचीं अनेक स्वतंत्र राष्ट्रकें होतीं असें गृहीत धरलें पाहिजे. मूलगृहींचा 'आर्यन्' समाज हा एक राष्ट्र किंवा राष्ट्रसंघहि नसून एकमेकांशीं बद्ध नसलेल्या राष्ट्रांचा समुच्चय होता ही कल्पना तिजविरुद्ध भक्कम पुरावा सांपडेपर्यंत गच्च धरून बसलें पाहिजे.
सांस्कृतिक स्थिति शोधावयाची तर संस्कृतीचीं अनेक अंगें म्हणजे खाद्यपेय, वस्त्रें, विभूषणें, गृह आणि तदनुषंगानें वायव्य, आरण्य व ग्राम्य पशू, मनुष्यमनुष्यांचा संबंध आणि तदनुषंगानें विवाह, व्यापार व राज्यव्यवस्था आणि समाजव्यवस्था यांचा विचार केला पाहिजे. मानवी कार्यक्रमांत निश्चितता आणण्यासाठीं केलेल्या कालमानादि गोष्टींकडे पाहिलें पाहिजे. तसेंच मेलेले लोक उर्फ पितृगण, देव, दैवतें यांच्या विषयींच्या कल्पनांनीं त्यांचें आयुर्नियमन कितपत होत होतें हेंहि पाहिलें पाहिजे.
भारतेतिहासाभ्यासास साहित्य :— मूलगृहकालावर झालेलें संशोधन अल्पप्रमाणानें द्यावयाचें म्हटलें तरी त्याचें स्वतंत्रपणें विवेचन पाहिजे. असें विवेचन प्रारंभींच देणें अप्रस्तुत होईल म्हणून त्या खटाटोपांत आम्ही सध्यां पडत नाही. या अभ्यासाचीं जीं अनेक अंगे आहेत त्यांची सामान्य कल्पना आतांपर्यंत दिलेल्या माहितीवरून वाचकांच्या लक्षांत येईलच. आतां भारतीय इतिहासाचें अध्ययन करण्यासाठीं उपांगें म्हणून ज्या शास्त्रांची वृद्धि झाली आहे त्यांची सामान्य कल्पना येण्यासाठीं यादीच्या रूपानें कांहीं माहिती खालीं देतों. या यादीच्या योगानें आपली कल्पना विस्तृत होईल. तथापि ही यादी संपूर्ण आहे असें मात्र समजूं नये.
(१) भाषांचा तौलनिक अभ्यास. यांत वेदभाषा, संस्कृत, युरोपांतील जुन्या भाषा आणि इराणी जुन्या भाषा यांचा उपयोग वेदकालपूर्वस्थिति काढण्यासाठीं करावयाचा.
(२) संस्कृत भाषेचा ऐतिहासिक अभ्यास. वेदकालांत कोणते शब्द प्रचलित होते, पाणिनीस कोणते शब्द ठाऊक होते, वेदकालीं शब्दांचा अर्थ काय होता, पाणिनिकालीं काय होता, अर्थांत फरक झाला असल्यास त्यास सामाजिक कारणें काय झालीं, इत्यादि गोष्टींचा अभ्यास.
(३) वेदभाषा, संस्कृत, प्राचीन प्राकृत भाषा आणि अर्वाचीन भाषा यांचा तौलनिक अभ्यास. यावरून भाषांच्या अपभ्रंशांचे नियम, लोकांचें इतस्ततः भ्रमण, इत्यादि काढतां येईल.
(४) हिंदुस्थानांतील स्थावर आणि जंगम लिखाणांचा अभ्यास. हा अभ्यास अनेक तर्हांनीं करतां येईल. यांचा भाषेच्या दृष्टींनें अभ्यास केला तर वर सांगितलेल्या भाषांच्याच अभ्यासास कांही अंशी हा एक भाग होईल, तथापि लिखाणविषयक अभ्यासाची व्याप्ति तेवढीच नाहीं. हिंदुंचीं व हिंदुस्थानाचीं लिखाणें केवळ संस्कृतसंभव भाषांतच नाहींत. हिंदुस्थानांतील द्राविडी भाषांत व इतर बाहेरच्या भाषांत देखील लिखाणें आहेत. त्याप्रमाणेंच हिंदुस्थानाच्या बाहेर हिंदु संस्कृति जेथें गेली आहे तेथील लिखाणें संस्कृत किंवा स्थानिक भाषांतून आहेत. यामुळें लिखाणांचा अभ्यास करण्यासाठीं अनेक भाषांचा अभ्यास भारतीय इतिहासाच्या अभ्यासकास उपयुक्त आहे. याशिवाय लिखाणें एकाच लिपींत नसून अनेक प्रकारच्या लिपींत लिहिलीं किंवा कोरलीं गेलीं आहेत. आणि यामुळें लिपींत अभ्यास हाहि एक महत्त्वाचा अभ्यास होऊन बसला आहे.
(५) लिखाणांच्या अभ्यासाशीं संबद्ध असा दुसरा एक अभ्यास म्हटला म्हणजे "मुद्राविज्ञान" होय. आजपर्यंत निरनिराळीं राजघराणीं होऊन गेलीं. त्यांच्या मुद्रांचे उर्फ नाण्यांचे अवशेष आज शिल्लक आहेत, तेहि एक अभ्यासाचा मोठा विषय झाले आहेत.
(६) भारतीय अभ्यासाचा आणखी एक भाग म्हटला म्हणजे संस्कृत भाषेशीं असंबद्ध अशा भारतांतील आणि भारतीय संस्कृतीचा ज्यांवर परिणाम झाला त्या प्रदेशांतील भाषांचा अभ्यास होय. द्राविडी भाषांचा अभ्यास आणि पूर्वेकडील ज्या प्रदेशांत भारतीयांच्या वसाहती झाल्या तेथील भाषांचा अभ्यास या वर्गात मोडतो. नवीन शब्द संस्कृत भाषेंतून इतर भाषांत ज्याप्रमाणानें अधिक जातात त्या प्रमाणानें त्या देशांत भारतीय संस्कृतीचा विकास कितपत झाला याचें मोजमाप करतां येतें. शिवाय संस्कृत भाषेचा अपभ्रंश दाखविणारे शब्द तेथें आढळले तर त्यांचें हिंदुस्थानांतील अपभ्रंशांशीं नातें जोडतां येतें, आणि त्यामुळें हिंदुस्थानांतील कोणते लोक तिकडे गेले, कोणत्या प्रांतांतून गेले, कोणत्या काळीं गेले, कोणत्या मार्गानें गेले इत्यादि प्रश्न सोडविण्यास मदत होते. तसेंच भाषांतील वाङ्मयहि पाहिलें पाहिजे. कारण त्या वाङ्मयांत भारतीय वाङ्मयाचीं रूपांतरें किंवा अवस्थांतरें दृष्टीस पडतात.
ज्ञानसंचयाचा काल – आतां आपणापुढें जो नवा काल येत आहे त्यासाठीं जुनें ज्ञान गोळा होऊन त्याचें संवर्धन झालें पाहिजे. नवीन येणार्या मनूबरोबर ज्ञानाच्या संचयाचे प्रयत्न यापूर्वींहि झालेले दृष्टीस पडतात. आपल्या संस्कृतीच्या इतिहासांत आजच्यासारखे दोनच काल पूर्वीं होऊन गेले आहेत. एक काल म्हटला म्हणजे भारतीय युद्ध समाप्त झालें तो काल आणि दुसरा काल म्हणजे मुसुलमानी संस्कृतीच्या दडपणाखालीं मरून न जातां हिंदूंनीं आपलें स्वत्व रक्षण करण्यासाठीं केलेल्या प्रयत्नाचा म्हणजे विद्यारण्यांचा काल. आजचा काल हा आपण आपलें महत्त्व जगांत पूर्ववत् स्थापन करण्याचा काल आहे.
अर्वाचीन आणि प्राचीन कालांचें एकमेंकापासून पृथक्त्व दाखविण्यासाठीं जुन्या कालापासून एखादी गोष्ट प्रसिद्ध असेल तर ती कुरुयुद्ध होय. कुरुयुद्धाच्या शेवटीं किंवा हे युद्ध आटपण्यापूर्वी कांही वर्षे एक मोठा वाङ्मयविकासार्थ प्रयत्न झालेला दिसतो. त्या प्रयत्नाचें स्वरूप आज उपलब्ध नाहीं तथापि तें शोधतां येण्याजोगें आहे. तो प्रयत्न किती विस्तारानें झाला याची कल्पना येण्यासाठीं भगवान् वेदव्यासांच्या नांवावर कोणती कामें लादलीं गेलीं आहेत याचा विचार करूं.
१. वेदांच्या संहिता व्यासांनीं केल्या.
२. पुराणें व्यासांनीं लिहीलीं.
३. महाभारताचे कर्ते व्यासच होत.
४. बादरायण सूत्रें व्यासांचींच आहेत.
वैशंपायन, सुमंतु, जैमिनि, इत्यादि माणसें व्यासांचींच शिष्य होतीं, आणि याज्ञवल्क्य हा व्यासांचा शिष्यानुशिष्य होता. थोडक्यांत सांगावयाचें म्हटलें म्हणजे सर्व जुन्या विद्येचें एकत्रीकरण आणि विद्येच्या अभिवृद्धीसाठीं अवश्य होणारें विचारप्रवर्तन आणि शास्त्रप्रवर्तन, आणि त्या प्रमाणेंच जुन्या सर्व इतिहासांतील रक्षणीय भागाचें रक्षण हें व्यासांचेंच कार्य होय. प्राचीन ग्रंथकारांमध्यें व्यासांची थोरवी लोकांस वाटते ती अयथार्थ नाही. व्यासांनीं विद्येच्या संरक्षणासाठीं जो प्रयत्न केला त्याच्यावरच पुढील सर्व इमारत रचली गेली असें म्हणण्यास हरकत नाहीं. महाभारतानें लोकांपुढें श्रेष्ठ चरित्रें ठेवलीं, आणि पुढील बर्याच कवितेस तो ग्रंथ आधारभूत झाला. त्यानें व पुराणांनीं अत्यंत प्राचीन अशा इतिहासास जिवंत ठेवलें; आणि संहितांनीं पाठीमागची भाषा आणि कल्पना जशाच्या तशा जिवंत ठेवल्या. पूर्वींचीं पुराणें उत्तरकालीन लोकांच्या तावडींत सांपडून वाढत गेलीं. वेदांच्या संहिता व ब्राह्मणें देखील थोडींबहुत वाढलीं. पुढें वेदांचा प्रतिपाद्य विषय जो यज्ञ तो मागें पडत चालल्यामुळें त्यांचें वर्धन खुंटलें. 'व्यासोच्छिष्टं जगत्सर्वं' इत्यादि वाक्यें व्यासांचें महत्त्व दाखवितात.
व्यासानंतर विद्येच्या इतिहासांत व्यासासारखा थोर पुरुष झाला नाहीं असें म्हटल्यास अतिशयोक्ति होणार नाहीं. पुढील लोकांची कार्यें लहान व एकांगी होतीं आणि पूर्वींच्याच पायावर पूर्वींचीच बांधलेली इमारत एखादी खोली वाढवून किंवा एखादा मजला चढवून वाढवावी या स्वरूपाचीं होतीं. गौतमबुद्धाचें कार्य याहून भिन्न होतें. गौतमबुद्ध हा जरी नवीन प्रकारच्या वाङ्ममयाचा जनक झाला नसला तरी नवीन भाषेंतील वाङ्मयास जन्म देता झाला खास. त्याचे हातून विद्यांना चालना मिळालें असें मात्र म्हणतां येणार नाहीं. बौद्ध वाङ्मयाच्या इतिहासप्रसंगीं या संबंधानें विषेश विवेचन करतां येईल. असो. तेव्हां व्यासानंतर सर्व तर्हेनें विद्येस चालन देणारा मनुष्य शोधावयाचा झाल्यास आपणांस विद्यारण्यस्वामीपर्यंत आल्याखेरीज कोणी दिसत नाहीं. सायणमाधवांनीं (हे एक असोत किंवा दोन असोत) जे प्रयत्न केले त्यांचें स्वरूप व्यासांच्या प्रयत्नापेक्षां निराळें आहे. त्यांतील मुख्य भाग येणेंप्रमाणें-
१. वेद लोकांस समजत नव्हते म्हणून ते सुबोध करणे.
२. देशांतील निरनिराळीं मतें व संप्रदाय यांचें समुच्च्यानें लोकांस ज्ञान देणें.
३. धर्मशास्त्र संकुचित झालें होतें तें विस्तृत करणें.
४. भिन्नमतांपैकीं ज्ञानमार्गचा आणि वेदांतमताचा प्रसार करणें आणि त्याची ऐतिहासिक परंपरा दाखविणें.
५. वैद्यकासारख्या लोकोपयोगी शास्त्रांचें पुनरुज्जीवन करणें.
भगवान् वेदव्यास आणि अत्यंत विद्वान् विद्यारण्य यांच्या कार्यांत भेद आहे. हा भेद असा मांडता येईल कीं, माधवाचार्यांची उर्फ विद्यारण्यांची चळवळ संस्कृतीच्या उद्धारकाची होती व व्यासांची चळवळ संस्कृतीच्या संस्थापकाची होती. विद्येच्या इतिहासांतील हे दोन अत्यंत थोर आचार्य होत. तथापि ज्या विद्यांस व्यासांचा हातहि लागला नाहीं अशा कांही थोड्या प्राचीन विद्या आहेतच. असो.
हिंदुसमाजाचें जें एकत्व स्थापन झालें तें अनेक जाती एकत्र येऊन त्यांच्यामध्यें सामान्य वाङ्मयाचा प्रसार झाल्यानें अंशेकरून झालें; आणि तें कार्य करण्यासाठीं वाङ्मयास आपलें एकदेशीयत्व टाकून देऊन सर्वांगीणत्व साध्य करावें लागलें. हा सामाजिक इतिहास वाङ्मयाच्या इतिहासाबरोबरच अधिक स्पष्ट होईल.
आतां निरनिराळ्या जातींना एकत्र करणार्या हिंदुसमाजाचें एकत्व आज किती दृढ झालें आहे व निरनिराळ्या जातींत परस्परसंबंध काय आहे याच्याकडे लक्ष देऊं.
हिंदुसमाजसमीक्षण— हिंदुसमाज हा जातींचा समुच्चय आहे. जग अनेक जातींनीं भरलेलें आहे. आपणां हिंदूंच्या दृष्टीनें त्या जातींपैकीं कांही जाती आपल्या जवळच्या आहेत असें आपण समजतों आणि असेंहि समजतों कीं, पावित्र्य व शुद्धता या दृष्टींनीं कांहीं जाती वरच्या पायरीच्या, कांहीं कमी योग्यतेच्या आणि कांही कनिष्ठ अशा आहेत. या सर्व जातींमध्यें ब्राह्मणांची जात त्यांच्या पावित्र्यामुळें इतरांपेक्षां श्रेष्ठ आहे. ख्रिस्ती व मुसुलमान किंवा इतर बाह्य लोक हे पावित्र्याच्या दृष्टीनें सर्वांत शेवटच्या पायरीवरचे आहेत. सर्व जग हें पावित्र्याच्या दृष्टीनें किंवा अस्पृश्यत्वाच्या दृष्टीनें एका सोपानपरंपरेंत असून त्यांत ब्राह्मण श्रेष्ठ आणि म्लेच्छ, बाह्य किंवा व्रात्य हे कनिष्ठ होत या प्रकारची सामाजिक भावना आपल्या व्यवहारांत व्यक्त होते.
सामाजिक उच्चनीचतेच्या प्रश्नामध्यें मताचा किंवा उपास्याचा प्रश्न नाहीं. तो प्रश्न असता तर जैनांची पदवी वेदास मानणार्या अनेक जातींपेक्षां उच्च नसती; तथापि अनेक ब्राह्मणानुयायी जातींचा जितका विटाळ ब्राह्मण समजतात तितका जैनांचा समजत नाहींत. आपणांस उलट असें आढळून येतें कीं, वर्हाडांत पुष्कळ जुन्या चालीचे ब्राह्मण देखील जैनांच्या हातचें पाणी पंचवीस वर्षापूर्वीं पीत असत, आणि त्यांस कायस्थप्रभू शिवलेल्या पाण्याचा विटाळ होत असे. यावरून समाजामध्यें असलेली जातींची पदवी मतमूलक नसून आचारमूलक आहे. निवृत्तमांस ब्राह्मणांनां अनेक आचारांमध्यें मांसपराङ्मुख जैन हे जवळचे व व्यवहाराला योग्य असे वाटत यांत आश्चर्य नाहीं. ख्रिस्ती व मुसुलमान यांची पदवी आज समाजांत महारांच्या पेक्षां वर आहे याचें कारण विचारमूलक नसून आचारमूलकच आहे. बाह्यांची पदवी जवळजवळ कनिष्ठ ठरली याचें कारण देखील आचारमूलकच आहे. ज्या समाजामध्यें गोमांस अत्यंत निषिद्ध आहे त्या समाजांत त्याचें सेवन करणार्यास जवळजवळ सर्वांत कनिष्ठ पद प्राप्त व्हांवें यांत नवल तें कोणतें ? बाहेर दिसणारें स्वरूपच लक्षांत घेतां ख्रिस्ती व मुसुलमान यांचें आचरण महारांपेक्षां अधिक स्वच्छ दिसतें, त्यामुळें त्यांचा विटाळ महारांपेक्षां कमी मानण्यांत येतो.
मतमूलक भिन्नता किंवा उपास्यमूलक भिन्नता या गोष्टी हिंदुच्या दृष्टीनें फारच कमी महत्त्वाच्या आहेत तर ख्रिस्ती व मुसुलमान यांस हिंदुंनीं आपणांपेक्षां निराळें कां समजावें ? कारण एवढेंच कीं, हिंदुंपासून भिन्नत्व स्थापन करणार्या रेषा हिंदूंनीं ओढल्या नसून मुसुलमान, ख्रिस्ती, यांनींच ओढल्या आहेत. हिंदुंच्या दृष्टीनें परमार्थाविषयीं मत आणि तो साध्य करून घेण्यासाठीं उपयोगांत आणिलेलें साधन यामुळें मनुष्याचें सामाजिक पृथक्त्व स्थापन होत नाहीं, किंवा आपल्यासारखें परमार्थसाधन दुसर्यानें आचरिलें तर तेवढ्यानेंच त्याचा प्रवेश समाजांत फारसा होत नाहीं. जेव्हां विशिष्ट मतें मान्य करणारीं माणसें एकत्र जमून आपला समुच्चय बनवितील आणि त्यांचें पृथक्त्व स्थापन करण्याचा प्रयत्न करतील व जेव्हां त्या बनलेल्या समुच्चयाचा आचारहि एकस्वरूपाचा आणि हिंदू लोकांनीं जें आचरण कनिष्ठ म्हणून गणिलें आहे तें आचरण मान्य करणारा असा असेल तेव्हांच मात्र कोणी मनुष्य त्या संप्रदायाचा अनुयायी झाला असतां तो हिंदुसमाजापासून विभक्त होईल, म्हणजे तो आपल्या जातीला मुकून किंवा जातिबाह्य होऊन त्या जातीनें कनिष्ठ ठरविलेल्या जातींत प्रविष्ट होईल. मनुष्य ख्रिस्ती होतो याचा हिंदूंच्या दृष्टीनें अर्थ एवढाच कीं तो आपल्या जातींतून निघून ख्रिस्ती जातींत जातो.
हिंदु आणि अहिंदु यांमध्यें फरक तरी कोणता ? या प्रश्नाचें उत्तर देण्यास थोडीशी इतिहासाकडे नजर फेंकली पाहिजे. 'हिंदु' हा शब्द मुळींच परका. हा शब्द मुसुलमानी स्वारीपूर्वींच्या संस्कृत ग्रंथांत वापरण्यांत आलेला नाहीं. हिंदूंनां आपल्याशीं सदृश्य असा समुच्चय कोणता आहे हें ठरवून त्यास एक नांव देण्याचें कारणच कधीं पडलें नाहीं. जगांतील अनेक देश, राष्ट्रें आणि लोक यांच्या अस्तित्वाविषयीं प्राचीन भारतीय लोक पूर्णपणें अज्ञानी जरी नसले तरी उदासीन होते हें खास. परके जेव्हां त्यांच्या देशांत येत तेव्हां त्यांची परक्यांशी ओळख होई. परके येत ते व्यापारासाठीं, देश पहाण्यासाठीं किंवा देश जिंकण्याकरितां म्हणून येत. अशा काळीं येणारा परकीय त्याच्या राष्ट्राच्या किंवा जातीच्या नांवानेंच लोकांस माहीत होई आणि तो त्या जातीचा म्हणून समजांत वावरे. प्राचीनकालीं हिंदु आणि इतर यांमध्यें अंतर फारसें नव्हतें त्यामुळें परके आले आणि देश्य आचार घेतला म्हणजे ते नकळतच हिंदु होऊन जात. त्यांची एखादी स्वतंत्र जात बने एवढेंच. सारांश, प्राचीन काळच्या हिंदूंस असें वाटत नव्हतें कीं देशांत ज्या अनेक विविधाचारयुक्त जाती आहेत त्यांपेक्षां नवीन आलेले परकी लोक कांहीं निराळे आहेत. आपण व इतर जगांतील लोक यांमध्यें सामाजिक भिन्नता विशेष आहे अशी भावनाच नव्हती. जो मनुष्य मध्यदेशांत राही त्यास कंदाहार, अफगाणिस्तान, पंजाब किंवा सयाम या देशांतील लोक अशिष्ट किंवा संस्कृतीमध्यें कमी किंवा म्लेच्छहि वाटत, पण दक्षिणेंतील लोकहि त्यास तसेच वाटत. अनेक धर्मशास्त्रकारांनीं जे लोक दक्षिणेंत, बंगालमध्यें किंवा पंजाबांत जातील त्यांस प्रायश्चित्त सांगितलें आहे. जो मनुष्य आपला प्रांत सोडून दुसर्या प्रांतांत जाईल तेथें तो परका आणि त्याच्या लोकांच्या दृष्टीनें तो परत आल्यानंतर परदेशगमनाबद्दल प्रायश्चित्तार्ह होई. तो परदेश बंगाल, सयाम, यवद्वीप, चीन, तिबेट, पंजाब, इराण, किंवा हिंदुस्थानचा दक्षिणभाग यांपैकीं कोणता कां असेना ? थोडक्यांत सांगावयाचें म्हटलें म्हणजे भारतीयभावना किंवा हिंदुत्वभावना प्राचीनकाळीं लोकांस नव्हती. तेव्हां परकीयभावना ही तरी कोठून येणार ?
प्राचीन हिंदू परदेशगमनाचें पातक मानीत होते तथापि परदेशगमनानें समाजांतील स्थान नाहींसें होऊन मनुष्य परकीय समाजाचा अवयव बनतो अशी त्यांची भावना नव्हती. आलेली अशुद्धि दूर करावी एवढाच परदेशगमनप्रायश्चित्ताचा उद्देश असे. अग्निपुराणांत म्हटलें आहे कीं, "म्लेच्छैर्गतानां चोरैर्वा कान्तारे वा प्रवासिनाम् । भक्ष्याभक्ष्यविशुध्द्यर्थं तेषां वक्ष्यामि निष्कृतिम् ।। पुनः प्राप्य स्वदेशं च वर्णानामनुपूर्वशः। कृच्छ्रस्यान्ते ब्राह्मणस्तु पुनःसंस्कारमर्हति ।।" हे श्लोक अनेक दृष्टींनीं महत्त्वाचे आहेत. निष्कृति जी करावयाची ती केवळ परदेशगमनासाठीं नसून भक्ष्याभक्ष्यविशुद्धीसाठीं होती; आणि याकरितां जें प्रायश्चित म्लेच्छांच्या देशीं जाण्याबद्दल असे तेंच प्रायश्चित्त वानप्रस्थाश्रमाचे एकीकडे गोडवे गात असतां अरण्यांत जाऊन राहाण्याबद्दल असे. कारण दोन्ही ठिकाणीं भक्ष्याभक्ष्यविषयक शुद्धि राहणें सारखेंच अशक्य असे हें यांतील मूळ होतें. यावरून जगांतील जो जमिनीचा तुकडा आपला नव्हे अशा तुकड्याचा किंवा म्लेच्छांचाहि विटाळ प्राचीन भारतीयांनां नसून भक्ष्याभक्ष्याचा मात्र विटाळ होता ही गोष्ट बाहेर पडते आणि समाजांत उच्चनीच स्थान किंवा समाजाचा बहिष्कार यांच्याविषयींचा विचार ज्या काळीं वरील श्लोक तयार झाले त्या काळीं केवळ आचाराच्या शुद्धताशुद्धतेवरून ठरत असे हें उघड होतें.
भारतीय भावनेचा अभाव आणि भारतीय वैशिष्ट्याच्या जाणीवीचा अभाव प्राचीन भारतीयांत कां होता हें जाणण्यासाठीं एकत्वाची भावना व्यक्तींच्या समूहास येते तरी कशी याचा विचार केला पाहीजे. जर कांहीं लोकांस आपण एकवंशीय आहोंत अशी भावना असेल तर त्या लोकांस एकत्व आणण्यास आणि इतरांपासून पृथक्त्व भासविण्यास तेवढें कारण पुरेसें आहे. तथापि अशी एकवंशत्वाची भावना फार लहान वर्गांतच असावयाची. हिंदुस्थानांतील निरनिराळ्या जाती हीं या प्रकारची उदाहरणें होत. मोठ्या समूहांमध्यें एकत्वस्थापन आणि एकत्वभावना हीं निराळ्या क्रियेनें उत्पन्न होतात. एका शासनसंस्थेखालीं असल्यामुळें एकत्वाची भावना उत्पन्न होते. आचारांतलें आणि राहणींतलें सादृश्य याच्या योगानेंहि एकत्वाची भावना उत्पन्न होईल; पण ती अशा वेळेस उत्पन्न होऊं शकते कीं जेव्हां विसदृश समाज डोळ्यापुढें असतात, आणि सदृश व विसदृश यांचें पृथक्करण करणें लोकांस शक्य होतें.
जेव्हां कांही लोक एकच उपास्य अंगिकारितात किंवा एकच गुरु करितात तेव्हां उपास्यमूलक किंवा आचार्यमूलक एकत्व त्यांच्या मनावर ठसतें, आणि त्याबरोबर आपण इतरांपासून वेगळे आहोंत ही जाणीव त्यांच्यांत उत्पन्न होते. या तर्हेनें अनेक संप्रदाय उत्पन्न झाले आहेत. ख्रिस्ती, मुसुलमान, ब्रह्मो, आर्यसमाजी हे याच तर्हेचे संप्रदाय होत. ख्रिस्ती आणि मुसुलमान यांच्या बाबतींत असें म्हणतां येईल कीं, जेव्हां त्यांनीं आपले प्रचारक परदेशीं पाठविले तेव्हांच म्हणजे सुरवातीसच त्यांच्या ठिकाणीं, आपल्यापासून इतर जग भिन्न आहे ही कल्पना आणि तिजबरोबर आपण (ख्रस्ती किंवा मुसुलमान) तेवढे एक आहोंत ही कल्पना, या दोन्ही कल्पना एकसमयावच्छेदेंकरून वागत होत्या. कालांतरानें ख्रिस्त्यांच्या टोळीमध्यें जो समाज होता तो इतरांच्या म्हणजे टोळीबाहेरच्या लोकांच्या समावेशानें वाढत गेला. तथापि त्या विस्तारानें त्यांची एकत्वोत्पादक कल्पना विस्तृत झाली नाहीं. ती होती तशीच आकुंचित राहिली. मुसुलमानांचीहि गोष्ट अशीच झाली. यावरून असें दिसून येईल कीं, संप्रदायांचें किंवा यूरोपियन लोक ज्या मतसमुच्चयांनां 'रिलिजन' म्हणतात त्यांचें मूलस्वरूप भेदमूलक आहे. आपण आणि इतर यांमधील भेदची जाणीव कायम ठेवावयाची, आंत माणसें मात्र ज्यास्त ओढावयाचीं पण भेदकारक गोष्टी नाहींशा होऊं द्यावयाच्या नाहींत, अशी संप्रदयांची प्रवृत्ति असे. आपल्यासारखे ज्यांचे विचार नसतील त्यांस निराळें समजावयाचें, एकत्वभाव आपल्या समानोपास्य वर्गापुरताच ठेवावयाचा आणि आपल्या वर्गांत इतरांपासून भिन्नत्वाची आणि इतरांच्या शत्रुत्वाची जाणीव करून द्यावयाची, असें संप्रदायांचें सामान्य स्वरूप आहे. संप्रदायांचें हें स्वरूप जो ओळखतो त्यास या संप्रदयांचे प्रचारक आपल्या विश्वव्यापित्वाची आणि विश्वबंधुत्वाची बढाई मारतांत तेव्हां मोठी मौज वाटते.
हिंदुसमाजघटनेचा इतिहास :— हिंदुत्वाचा म्हणजे 'हिंदु' म्हणून आज जो समाज बनला आहे त्या समाजाचा आणि तदंतर्गत मानवसादृश्याचा इतिहास निराळा आहे. हें सादृश्य समाजांतील एका विशिष्ट वर्गानें मतें किंवा उपास्यें अथवा आचार्य या तत्त्वावर टोळी बनवून तींत माणसें ओढावयाचीं या प्रकारच्या चळवळीनें तयार झालें नाहीं. जेव्हां दोन जातींचा सन्निकर्ष उत्पन्न होतो तेव्हां त्या दोन जातींमधील माणसें एकमेकांचे कांहीं बाबतींत अनुकरण करितात. कालांतरानें त्यांचें मिश्रण होतें आणि असें मिश्रण जरी झालें नाहीं तरी अनुकरणाच्या देवघेवीनें दोघांमध्यें बरेंच सादृश्य उत्पन्न होतें. जेव्हां एकाच ठिकाणीं अनेक जाती येतात तेव्हां या सर्व जातींमध्यें हळू हळू रीतीभातींचें सादृश्य उत्पन्न होऊं लागतें. जी जात बलवान किंवा वरिष्ठ असेल तिचें अनुकरण इतरांकडून होऊं लागतें. संघट्टनामुळें कालांतरानें सर्वांच्या कल्पनाहि सारख्या होऊं लागतात. एखाद्या जातीमध्यें जर सुशिक्षित किंवा हुशार वर्ग निघाला तर कमी सुशिक्षित किंवा कमी बुद्धिवान अशा लोकांकडून त्याला मान मिळतो, त्याची संभावना होते किंवा त्याला अनुयायीहि मिळतात. जर अनेक कुळें, गोत्रें किंवा जाती एकाच ठिकाणीं राहत असतील आणि प्रत्येकाचीं दैवतें निरनिराळीं असतील तर कांही दैवतांचा लोप होईल व कांहीं टिकतील; किंवा तीं अनेक दैवतें एकाच दैवताचीं भिन्न स्वरूपें आहेत असें तत्ववेत्ते सांगूं लागतील; अगर त्या दैवतांपैकीं एका दैवताला प्रामुख्य मिळेल आणि इतर दैवतें विशिष्ट कर्मांचीं, प्रसंगांचीं, किंवा विशिष्ट इष्टफल देणारीं दैवतें होतील; आणि या रीतीनें दैवतें कुळविशिष्ट न राहतां सार्वजनिक होतील. केवळ संघट्टनानें, बरेच दिवस एकत्र राहिल्यानें, सर्वसामान्य आचार, सर्वसामान्य रीतीभाती, सर्वसामान्य विचारपरंपरा, सर्वसामान्य उपास्यें, सर्वसामान्य ईश्वरविषयक
कल्पना आणि सर्वसामान्य आचार्यवर्ग निर्माण होईल. एका वर्गांचें वाङ्मय तेंच सर्वांचें होईल आणि सर्व समूहास एक स्वरूप येऊन सर्वांसच हें वाङ्मय म्हणजे आपणां सर्वांची वडिलोपार्जित मिळकत आहे असें वाटूं लागेल. हिंदुसमाजाचा विस्तार या पद्धतीनें झाला, आणि हिंदूंचे विचार याच पद्धतीनें निश्चित आणि संवर्धित झाले. जगाच्या बर्याचशा भागास एकत्व उत्पन्न होण्यास या गोष्टी आणि विशेषेंकरून विद्वान ब्राह्मणांचा चोहोंकडे संचार कारण झाला.
वर सांगितलेली क्रिया आज हजारों वर्षें होत राहून आजचा हिंदुसमाज बनला आहे. या क्रियेचें स्वरुपच असें आहे कीं ती सहज दृष्टीस पडत नाहीं आणि यामुळें लोकांचा बराच गैरसमज झालेला आहे. पुष्कळांस असें वाटतें कीं हिंदु लोक हे परकी गोष्टी मुळींच न घेणारे आहेत. त्यांनीं जरी कांही परकीय गोष्टी घेतल्या असल्या तरी ते परकीय गोष्टींचा द्वेष करणारे आहेत आणि ते आपल्या समाजांत इतरांस घेत नाहींत असा पुष्कळांचा समज आहे. या दोन्ही कल्पना सत्यापासून अत्यंत दूर आहेत. खरें पाहिलें असतां आजचे हिंदूंचे आचारविचार हे अनेक जातींच्या अनेक चालीरीती व कल्पना यांचें मिश्रण आहे. सर ऑलफ्रेड लायल यांनीं हिंदुस्थानांतील वन्य जातींच्या अंतर्भावामुळें हिंदुसमाजाची कसीकशी वाढ होत आहे याचें सुंदर वर्णन आपल्या 'एशियाटिक स्टडीज्' (लंडन १८४४) या पुस्तकांतील 'मिशनरी अॅण्ड नॉनमिशनरी रिलिजन्स' या लेखांत दिलें आहे.
हिंदू इतरांस आपणांत घेत नाहींत ही कल्पना चुकीची आहे पण ती सार्वत्रिक आहे यांत संशय नाहीं. ती तशी कां असावी ? मुळांत कांहीं तरी सत्य असल्याशिवाय इतकी सार्वत्रिक कल्पना तरी कशी उत्पन्न होईल ? असे प्रश्न येथें उद्भवतात. या प्रश्नांचे उत्तर खालील विवरणावरून मिळेल. हिंदू हे ख्रिस्ती किंवा मुसुलमान होतांना दृष्टीस पडतात; पण कोणी मुसुलमान किंवा ख्रिस्ती हिंदू होतांना दृष्टीस पडत नाहींत. या अवलोकनावरून पुष्कळांस असें वाटतें कीं, हिंदुत्व परजनसंग्राहक नसून केवळ विशिष्ट जातीपुरतें किंवा राष्ट्रापुरतें आहे; आणि ख्रैस्त्य व मुसलमानी संप्रदाय हे सर्व जातिसंग्राहक आणि सार्वराष्ट्रीय आहेत. कित्येकांस असें वाटतें कीं सुशिक्षित व सुधारलेल्या लोकांनां किंवा निश्चित पारमार्थिक मतें असणार्यांनां आपल्यामध्यें ओढण्यास हिंदुत्व समर्थ नाहीं. प्रत्यक्ष ज्ञान यथार्थ होऊन अनुमान तेवढें अयथार्थ कां व्हावें ? लोकांची सर्वसामान्य कल्पना आणि आमचें म्हणणें यांत तफावत कां पडवी ?
या घोंटाळ्याच्या स्पष्टीकरणासाठीं हिंदुत्व व ख्रिस्ती संप्रदाय यासंबंधीं कांही सामान्य कल्पना येथें दिल्या पाहिजेत. हिंदूसमाज हा कांहीं ख्रिस्ती व मुसलमान यांसारखा संप्रदायमूलक संघ नाहीं. हिंदूसमाज व ख्रिस्तीआदि संप्रदायमुलक समाज या दोहोंमध्यें मुख्य फरक हा आहे कीं, संप्रदायाची स्थापना इतर लोक आपल्यासारखे करण्यासाठींच झालेली असते. संप्रदाय हे विवक्षित कल्पनांचा, आचारांचा आणि उपास्यांचा विशेष, खटपटींनीं इतरांमध्यें प्रसार करून त्या इतरांमध्यें आपणांशीं सादृश्य उत्पन्न करण्याकरितांच जन्मास आलेले असतात. हिंदुत्वाच्या प्रसाराची गोष्ट अशी नाहीं. आचार, सण, उत्सव, मतें, विचारपद्धती, या बाबतींत हिंदू व अहिंदू लोकांत ऐक्य उत्पन्न करण्याची भिस्त हिंदूंकडून केवळ संघट्टनावर व कालावर ठेवली जाते आणि संघट्टन प्रादेशिक सान्निध्यावर सोंपविलें जातें. संघट्टन असलें म्हणजे कालांतरानें आचारादिकांचें एकत्व सहजच उत्पन्न होतें. संप्रदायांची गोष्ट अशी नाहीं. त्यांची प्रवृत्ति अगदीं वेगळी असते. आपण जें मानतों तें मानणारा आणि आपण जें मानीत नाहीं तें न मानणारा असा जो कोणी असेल, असल्या तर्हेची ज्याची मनोवृत्ति बनली असेल, त्यासच आपल्या संप्रदायांत स्थान द्यावयाचें आणि आपल्या समाजाचें सभासद करावयाचें, अशी संप्रदायी समाजांची प्रवृत्ति असते.
भारतांतील संप्रदायांचें सामान्य स्वरूप.- आतां येथील संप्रदाय व त्यांचें सामान्यस्वरूप या प्रश्नाकडे वळूं. हिंदुस्थानामध्यें सामाजिक गोष्टी आणि पारमार्थिक विचार यांची भिन्नता ज्यांत ठेवली गेली नाहीं असें कांहीं संप्रदाय उत्पन्न झाले आणि ते संप्रदाय बर्याचशा सामाजिक चळवळीस कारण झाले. या चळवळीमुळें समाजाचें रूप विशेष बदललें असें नाहीं; तथापि कांहीं कालापर्यंत त्यांनीं बराच उपद्व्याप केला ही गोष्ट खरी आहे. आतां जे संप्रदाय हिंदुस्थानांतीलच अथवा देश्य आहेत त्या संप्रदायांपासून समाजघटनेस फारशी भीती नाहीं, पण मुसुलमानी आणि ख्रिस्ती हे जे परकीय संप्रदाय आहेत त्यांच्यापासून मात्र कांहीं दिवस तरी त्रास होईल. भारतीय समाजाचें ऐक्य बिघडविण्यास हे संप्रदाय जसे कारण झाले तसे ते आज जागतिक ऐक्य बिघडविण्यास कारण झालेले आहेत. हिंदुस्थानांतील सामाजिक परिस्थिति तर त्यांनी फारच बिकट केली आहे तरी या संप्रदायांचें अनिष्ट स्वरूप हिंदुस्थानांतच नाहींसें होऊन सर्व जगाचा प्रश्न त्यामुळें सुटेल असा भरवंसा वाटतो. याचें सविस्तर विवेचन पुढें येईल. तथापि तें समजणें सुकर व्हावें यासाठीं संप्रदायांच्या घटनेचें स्वरूप आणि घटनेच्या विशिष्टत्वामुळें स्वाभाविकपणें घडून येणारा त्यांचा इतिहास कांहीं सुत्रांत वर्णिला पाहिजे.
येथें हें पुनरुक्तीनें सांगितलें पाहिजे कीं, हिंदू, ख्रिस्ती आणि मुसुलमान हे सदृश समूह नाहींत; आणि ख्रिस्ती व मुसुलमान समाजांशीं सदृश असा जर मनुष्यवर्ग हिंदुसमाजांत असेल तर तो हिंदूंतील संप्रदाय होय. हिंदूसमाज आणि तदंतर्गत संप्रदाय यांमध्यें जें नातें आहे तेंच सर्व जग आणि ख्रिस्ती व मुसुलमान समाज यांमध्यें आहे. हिंदुस्थांनांतील संप्रदायांचें सामान्य स्वरूप असें आहे कीं एखादा गुरू विशिष्ट दैवत किंवा उपासनापद्धति प्रचांरात आंणू पाहतो आणि उपदेशितो व शिष्य गोळा करितो. त्यामुळें मतें आणि माणसें मिळून जें काहीं एक बनतें त्यास संप्रदाय असें म्हणतात. संप्रदायसंस्थापक गुरु परमेश्वराशीं इतर माणसांपेक्षां आपलें कांही विशेष सलगीचें नातें आहे असें भासवितो. निदान आपल्या अनुयायांची अशी समजूत करून देतो कीं, सामान्य जनांपेक्षां कांहीं बाबतींत ज्ञानानें म्हणजे अतींद्रिय ज्ञानानें आपण श्रेष्ठ आहों. हे संप्रदाय मतप्रसार आणि उपास्यप्रसार यांचे अभिमानी असतात. कां कीं त्यांस आपला अनुयायी वर्ग वाढवावयाचा असतो. ब्राम्हणांस प्रचारकार्याची फारशी फिकीर नसते याचें कारण त्यांचें उत्पन्न विधिसंस्कारासारख्या प्रत्येक मनुष्यास कर्तव्य अशा बाबतींवर अवलंबून असतें. संप्रदांयांच्या गुरूंची गोष्ट अशी नाहीं. त्यांचें उत्पन्न शिष्यवर्गाच्या संख्याधिक्यावरच अवलंबून असतें. या कारणानें अनेक प्रसंगीं हे संप्रदाय सामाजिक दृष्टीनें इतरांपासून आपलें भिन्नत्व स्थापूं पहातात,
आणि आपआपसांत अधिक बंधुभाव उत्पन्न व्हावा आणि संप्रदायांतर्गत व्यक्तीचा आपल्या जातीकडे ओढा कमी व्हावा यासाठीं प्रयत्न करितात. पुष्काळदां त्यांनीं बाहेरच्यांशीं लग्नव्यवहारहि बंद केले आहेत. मद्रासकडे वैष्णवांमध्यें वेदशाखेचें लग्नव्यवहारांत महत्त्व नसून हा वैष्णव आहे कीं नाहीं हें पहातात. जर संप्रदायामध्यें आणि संप्रदायाबाहेर असलेल्या लोकांमध्यें लग्नव्यवहार बंद पडला तर संप्रदाय ही स्वतंत्र जात होऊं पहाते. कित्येक संप्रदायांमध्यें संप्रदायांचें सामाजिक पृथक्त्व इतरांपेक्षां अधिक असतें आणि कित्येकांमध्यें कमी असतें. कांही संप्रदाय उपासनेपुरत्या एकत्र होणार्या निरनिराळ्या जातींच्या लोकांचे संघ आहेत. असे संप्रदाय लोकांस फारसे अप्रिय होत नाहींत आणि त्या संप्रदयांचीं तत्त्वें सर्वसामान्य समाजांत सहज प्रविष्ट होतात. पुष्कळशा संप्रदायांमध्यें ब्राह्मणांचें अस्तित्व फारच कमी असतें. कां कीं एका गुरूचें अचल शिष्यत्व आणि गुरूचें स्तोम आणि गुरूचें देवत्वधारण इत्यादि सोंगांनीं पुष्कळ संप्रदाय व्यापिले गेले आहेत व असल्या संप्रदायांमध्यें सुशिक्षितवर्ग फारसा शिरणें शक्य नाहीं. अजाण कुणबी, भोळ्या बायका, यांवर अशा संप्रदायांचें अस्तित्व अवलंबून असतें. हेंहि लक्षांत ठेविलें पाहिजे कीं, संप्रदाय स्थापून समाजांत कांहीं निराळी खळबळ उत्पन्न करणें हें काम बहुधा ब्राह्मणांनीच केलेलें आहे. बौद्ध व जैन संप्रदाय वगळतां बहुतेक संप्रदायांचें संस्थापक ब्राह्मणच आहेत. या संप्रदायांनीं हिंदुस्थानचें फारसें हित केलें असें म्हणतां येत नाहीं. ब्राह्मण समाजाची सर्वसाधारण प्रवृत्ति संप्रदायांच्या संवर्धनास उत्तेजक नसून विरुद्धच होती. याचें कारण असें आहे कीं, एखादें विशिष्ट तात्त्विक मत किंवा विशेष व्यक्तीवर असलेली श्रद्धा यासारख्या अनित्य व दुर्बल पायावर समाजांतील एखाद्या व्यक्तीनें (गुरूनें) अथवा वर्गानें एक जात बनविण्याचा प्रयत्न करावा आणि आपलें व्यक्तीपुरतें अगर वर्गापुरतें हित साध्य करून घेण्यासाठीं समाजामध्यें अराजक माजवावें हें समाजास हितावह नाहीं ही जाणीव ब्राह्मणसमाजास होती संप्रदायास विरोध आणि मतास विरोध या गोष्टींमधील पृथक्त्व लक्षांत आणिलें पाहिजे. ब्राह्मणांचीच केवळ नव्हे, तर सर्वसामान्य हिंदूंची अशी प्रवृत्ति असे कीं, वादविवादाच्या बाबतींत अत्यन्त मोकळेपणा रक्षावयाचा आणि नवीन मतें वगैरेंस उत्तेजन द्यावयाचें, तथापि जेव्हां मतसत्यत्वस्थापनेपलीकडे किंवा उपास्याच्या उपासनेपलीकडे सामाजिक खटपटी होऊं लागतील आणि लोकांपासून पृथक् राहणारा असा जनसमूह निर्माण होऊं लागेल तेव्हां त्याच्याविरुद्ध जावयाचें.
मोकळेपणानें वादविवादास उत्तेजन न देणारा असा वर्ग जर असेल तर तो वर्ग संप्रदायांचाच होय. कां कीं, संप्रदायांचें अस्तित्वच विशिष्टमतांवर अवलंबून असतें. उलटपक्षीं मनुष्याचें जातिरूपी समाजांतील स्थान कोणत्याहि विशिष्ट मतावर अवलंबून नसतें किंवा जातींचे अस्तित्वहि कोणत्याच मतावर अवलंबून नसतें आणि त्यामुळें कितीहि भिन्नभिन्न मतें निघालीं तरी जातींचे एकत्व हें राहतेंच. संप्रदायांचें असें नाहीं. विशिष्टमतांवर किंवा उपास्यांवर त्यांचें अस्तित्व अवलंबून असल्यामुळें तीं मतें किंवा उपास्यें दुर्बळ झालीं तर संप्रदायाचें अस्तित्वच नाहीसें होणार अशी संप्रदायवाल्यांस धास्ती वाटत असते आणि त्यामुळें संप्रदायांमध्यें विरुद्ध मतांविषयीं असहिष्णुता फारच वाढते. ख्रिस्ती आणि मुसुलमान संप्रदायांच्या इतिहासांत विचारविषयक असहिष्णुतेमुळें जे रक्तपात आणि भिन्नमतवाल्यांस जिंवत जाळणें इत्यादि प्रकार घडले त्यांचें बीज हेंच आहे. ख्रिस्त्यांनीं परमतासहिष्णुतेमुळें माणसें जाळलीं आणि आम्हीं हिंदूंनीं तसें कांहीं केले नाहीं म्हणून ख्रिस्त्यांस निंदावयास नको व हिंदूंस वंदावयास नको. दोघांची समाजघटना भिन्न असल्यामुळें हे भिन्न परिणाम झाले. ख्रिस्त्यांमध्यें अनेक पंथ आहेत, हिंदूंत अनेक संप्रदाय आहेत. एवढें या दोघांत साम्य आहे. पण या साम्याबरोबर एक महत्त्वाचा भेद आहे तो असा कीं, प्रत्येक ख्रिस्ती कोणत्या तरी पंथाचा असतो पण हिंदु कोणत्या तरी संप्रदांयात आहेच असें नाहीं. हिंदूंच्या बाबतींत असें होतें कीं, आज याचें हें मत आहे तर उद्यां निराळें आहे. आज हा एकादशी करील, उद्यां शिवरात्रहि करील. कोणत्याहि विशिष्ट मतास अगर संप्रदायास न बांधला गेल्यामुळें तो स्वतंत्र आहे. ख्रिस्त्याचें तसें नाहीं. तो कांहीं बर्यावाईट कल्पनांनां बांधला गेला आहे. येथें हेंहि लक्षांत ठेवलें पाहिजे किं, विशिष्ट विचारांनीं बद्ध रहाण्यावर संप्रदायांत स्थान असावयाचें या परिस्थितीनें सामान्य ख्रिस्त्याचे मोठे हाल होतात असें नाहीं; आणि पिढ्यान् पिढ्या विशिष्ट कल्पनांनां बांधलें जाणारें व नवीन कल्पनांशीं असंबद्ध असणारें ख्रिस्ती डोकें म्हणजे कांहीं विलक्षण बनावटीचें आहे अशांतला भाग नाहीं. नवीन मतें ग्रहण करणारा ख्रिस्ती कोणत्या तरी एका संप्रदायास चिकटून राहतो एवढेंच. संप्रदायाचें एक विशिष्ट मत असतें, तो त्या संप्रदायाचा सदस्य असतो; आणि लौकिक कारणासाठीं त्यास चिकटून असतो.
हिंदूंपैकीं प्रत्येकास मी अमुक पंथाचा असें जरी सांगतां येणार नाहीं तरी विशिष्ट संप्रदायांतर्गत मनुष्यास आपण कोणत्या पंथांत आहों हें सांगता येईल. मी निंबार्कपंथी आहें किंवा रामानुजपंथी आहें हें वैष्णव सांगूं शकेल, मी श्वेतांबर आहें कीं दिगंबर आहें हें जैन सांगूं शकेल आणि मी आदिब्रह्मो आहें कीं साधरण ब्रह्मो आहें हें कोणीहि ब्रह्मो सांगूं शकेल. संप्रदायांत जेव्हां फूट पडते तेव्हां कांहीं माणसें इकडे जातात व कांहीं तिकडे जातात. आणि त्यामुळें प्रत्येक व्यक्ति संप्रदायांर्गत कोणत्या तरी पंथांत जाऊन पडतेच. संप्रदायांतर्गत व्यक्ति कोणत्या तरी संप्रदायांर्गत पंथांत पडणें ही गोष्ट सहज शक्य होते तशी कोणत्याहि विशिष्ट संप्रदायाचा नव्यानें अंगीकार करणें ही गोष्ट होत नाहीं.
संप्रदाय अशिष्ट असतां संग्राहक असतात ते शिष्ट झाले असतां त्यांची संग्राहकता कमी होते. जे संप्रदाय आपलें पृथक् सामाजिक अस्तित्व स्थापूं पहातात त्या संप्रदायांवर मोठेपणाचा किंवा हलकेपणाचा शिक्का बसतो. अमेरिकेंत आपणास दिसतें कीं ज्या संप्रदायाच्या मंदिराच्या बाहेर जास्त मोटारगाड्या दिसतात त्या संप्रदायाचे अनुयायी व्हावें असें पुष्कळ लोकांस वाटतें. याप्रमाणें एकाच ख्रिस्ती जातींतील लोकांमध्यें केवळ सदस्यांच्या पैशाच्या थैलीवरून संप्रदायमहत्त्व किंवा संप्रदायनीचत्त्व जर कांहीं लोकांच्या दृष्टीनें स्थापन होतें तर ज्या भारतासारख्या देशांत निरनिराळ्या सामाजिक पायरीच्या अनेक जाती आहेत आणि जेथें एकदां आलेलें उच्चनीचत्व बरेंच वर्षें टिकणारें असतें तेथें लौकिक हेतूंचे परिणाम संप्रदायाच्या वृद्धीवर आणि क्षयावर आणि त्याचप्रमाणें संप्रदायाच्या कार्यकारी नीतिसूत्रांवर झाल्याशिवाय कसे राहतील ? येथें ज्या संप्रदायांमध्यें कनिष्ठ जातींचा भरणा होतो ते संप्रदाय खालची पदवी पावतात. तसेच अत्यन्त खालच्या पदवीचे लोक आपणास समाजांत कांहीं तरी स्थान मिळावें म्हणून कोणत्या तरी संप्रदायांत घुसूं पहातात. जेव्हां संप्रदायांस हा अनुभव येऊं लागतो तेव्हां आपली उच्चता कमी होऊं नये म्हणून ते आपणांत नवीन माणसें घेणें बंद करितात. जैन लोक, लिंगायत आणि महानुभाव या मंडळींनीं आपल्या संप्रदायाचा प्रचार करणें सोडून दिलें आहे. अलीकडे कांही जैन लोक कांसारांमध्यें आपला संप्रदाय वाढविण्याची खटपट करीत आहेत. ते आपला संप्रदाय वाढविण्याकरितां ज्या युक्त्या करीत आहेत त्यांतील एक अशी आहे कीं, ते कांसारांनां सांगतात कीं, तुम्ही कांसार पूर्वीं जैनच होतां, पण तुम्ही जैन धर्म सोडले आणि व्रतें विसरलां त्यामुळें हिंदू झालां. महाराष्ट्रांत ही मतप्रचारार्थ खटपट असण्याचें एक विशेष कारण असें आहे कीं या कांसारांपैकीं कांहीं वर्ग जैनच आहे आणि त्यांच्यांत व जैनेतर कासारांत लग्नव्यवहार चालू आहे.
पुष्कळदां युरोपांतील ज्यू हे ख्रिस्ती लोकांस ज्यू करून घेतात, तथापि ते वाटेल त्यास ज्यू करून घेतील असें वाटत नाहीं. यांनीं नीग्रोला कधीं ज्यू बनविल्याचें ऐकिवांत नाहीं.
पारशी लोकांनींहि भरतखंडांत आपल्या झरथुष्ट्र संप्रदायामध्यें कांहीं हिंदू लोकांस घेण्याचा प्रथम प्रयत्न केला, पण जेव्हां घरकाम करणारे नोकर किंवा अस्पृश्य जाती यांशिवाय कोणी हिंदु त्यांच्या संप्रदायांत शिरत नाहीं असें त्यांस आढळून आलें तेव्हां त्यांनीं हें संप्रदायसंवर्धनाचें काम बंद ठेवलें, असें पारशी आचार्य डॉ. ढालानें आपल्या ग्रंथांत म्हटलें आहे.
जाती आणि संप्रदाय यांच्यामध्यें सादृश्य आहे. संप्रदाय म्हणजे नवीन सदस्य घेणारी 'जात' असें म्हणतां येईल. जे संप्रदाय पूर्वीं आपला प्रचार करीत होते ते त्यावेळीं उघड्या तोंडाच्या जातीसारखेच होते. तथापि आतां त्यांची परजनसंग्राहकता बंद झाल्यामुळें ते खर्याखुर्या म्हणजे बंद तोंडाच्या जातीच बनले आहेत. ख्रिस्त्यांमध्यें देखील जातिस्वरूप थोडेंबहुत येऊं पहात आहे. उमरावती येथील एका सुशिक्षित महारानें डॉ. केतकर यांस असें सांगितलें कीं, ख्रिस्ती मिशनरी महार आणि ख्रिस्ती हे एकच आहेत असें अडाणी महारांस भासवितात आणि महारांची सहानभूति कमी न व्हावी म्हणून महार ज्यांस हलके समजतात त्या मांगांस ख्रिस्ती करीत नाहींत.
येथवर सांप्रतच्या भारतीय हिंदुसमाजाचें निरिक्षण करून तदंतर्गत संप्रदायांचें स्वरूप, ख्रिस्ती व मुसुलमान समाजांपासून हिंदुसमाजाची भिन्नता इत्यादि गोष्टींचें विवरण केलें. हिंदु समाजाची संस्कृति म्हणजे भारतीय संस्कृति. हिलाच आर्य संस्कृति असें नांव आहे. या आर्य संस्कृतीचा अथवा भारतीय संस्कृतीचा इतर संस्कृतींशीं संबंध येऊन ज्या घडामोडी झाल्या त्यांजकडे वळणें आतां इष्ट आहे.
आर्यसंस्कृतीचा वृद्धिसंकोच :— इतर संस्कृतींच्या स्पर्धेमुळें आर्यसंस्कृतीचा कसा काय वृद्धिसंकोच होत आहे याचा विचार करण्यासाठीं इतिहासांत शिरण्यापूर्वीं जगतांतील प्रकृत समाजाचें अवलोकन करूं. जगाच्या क्षेत्राचें अवलोकन ज्या तीन तर्हांनीं केलें पाहिजे त्या येणेंप्रमाणे :-
(१) अखिलभारतीय आर्यसंस्कृतीच्या क्षेत्रांत भारतीय व अभारतीय जाती धरून किती लोकसमुदाय आहे ?
(२) आर्यसंस्कृतीपासून अपसृष्ट परंतु जातीनें भारतीय अशांचा लोकसमुदाय किती आहे ?
(३) जातीनें आजच्या भारताबाहेरील परंतु आर्य संस्कृतीच्या आवेष्टनानें वेष्टित झालेला लोकसमुदाय किती आहे ?
या तिन्ही बाजूंनीं आतां विचार करूं.
वरील प्रश्नांत निर्दिष्ट झालेले तीन वर्ग एकमेकांपासून अत्यंत पृथक् करतां येणार नाहींत. भारत म्हणजे काय याची स्थानमूलक व्याख्या आपण प्रथम करूं. या ठिकाणीं हें लक्षांत ठेवलें पाहिजे कीं भारताच्या मर्यादा निश्चितपणें कधींच ठरल्या नव्हत्या. असो. सध्याचा ब्रिटिश छत्राखालीं असलेला हिंदुस्थानचा भाग घ्यावयाचा, त्यांत बलुचिस्तान, अंदमान व निकोबार बेटें व ब्रह्मदेश हे वजा करावयाचे आणि नेपाळ, भूतान आणि फ्रेंच व पोर्तुगीज अंमलाखालीं असलेला भारतीय भाग हा मिळवावयाचा; आणि इतकें करून जें क्षेत्र निर्माण होतें त्यास भारत हें नाव द्यावयाचें, ही कल्पना भारत किंवा भारतीय या स्थानविषयक शब्दांचा उपयोग करितांना आम्ही वापरली आहे. सामान्य हिंदूंच्या मनांत 'हिंदुस्थान' शब्द म्हणातांना एवढाच प्रदेश लक्षांत येतो.
(१) भारतीय संस्कृतीच्या लोकांचा व अपसृष्टांचा हिशोब :- भारतीय संस्कृतीच्या छत्राखालीं असलेल्या भागांतील बौद्धसंप्रदायी लोक, शैववैष्णवादि लोक आणि भारतीयांपैकींच जे निरनिराळ्या ठिकाणीं पसरले आहेत असे सर्व लोक आणि हिंदुस्थानांतील बाह्य जातींचे किंवा बाह्य संप्रदायांचे अनुयायी वगळून उरलेले सर्व लोक हे भारतीय संस्कृतीच्या छत्राखालील लोक समजावेत. जगांतील निम्याहून अधिक लोकसंख्या या वर्गांत येईल. भारतीय वंशाचे अथवा जातीचे असलेले परंतु भारतीय संस्कृतीपासून अपसृष्ट झालेले अशा लोकांचा हिशोब घेतां ब्रिटिश हिंदुस्थानांतील सहा कोटी सहासष्ट लक्ष मुसुलमान, व सुमारें छत्तिस लक्ष ख्रिस्ती आणि दहा लक्ष जिप्सी मिळून सुमारें सातकोटी बारालक्ष इतक्या लोकांचा या वर्गांत अंतर्भाव होतो. अफगाणिस्तान म्हणजे प्राचीन गांधार व वाहीक अगर बाल्हीक येथील लोक व तसेंच फ्रेंच आणि पोर्तुगीज सरकारच्या भारतीय प्रदेशांतील ख्रिस्ती हे वरील हिशोबांत मिळविले तर लोकसंख्या पन्नास लक्षांनीं अधिक वाढून एकंदर अपसृष्टांची संख्या सातकोटी बासष्ट लक्षांवर जाईल. ज्या जनतेंतून इतका वर्ग बाहेर पडला ती जनता म्हटली म्हणजे हिंदुस्थानांतील ब्रिटिश छत्राखालीं असलेले चोवीस कोटीहून अधिक हिंदू आणि ब्रिटिश छत्राखालीं नसलेले सुमारें पन्नास लक्ष हिंदू आणि हिंदुस्थानाबाहेर गेलेले सुमारें वीस लक्ष हिंदू मिळून सुमारे पंचवीस कोटी हिंदूंचे आणि सात कोटी अपसृष्टांचे पूर्वज होत. यावरून सरासरी दर बत्तीस माणसांतील सात लोक अपसृष्ट आहेत असें स्थूल प्रमाण निघतें.
हिंदुस्थानांतील एकंदर सुमारें ३१ कोट लोकसंख्येपैकीं चोवीस कोटींवर लोक हिंदू आहेत, साडेसहा कोटींपेक्षां अधिक मुसुलमान आहेत, आणि अडतीस लक्षांवर ख्रिस्ती आहेत, एक लाखाहून थोडेसे अधिक पारशी आहेत आणि एकवीस हजार यहुदी आहेत. ख्रिस्ती लोकांपैकीं सुमारें दोन लक्ष ख्रिस्ती यूरोपीय आहेत, एक लक्षावर मिश्र ख्रिस्ती आहेत आणि उरलेले ख्रिस्ती म्हणजे सुमारें छत्तीस लक्ष देश्य आहेत. अशा विविध लोकसंख्येमध्यें हिंदूंचें प्राबल्य अजूनहि आहे.
हिंदूंची संख्या कमी कमी होत जाऊन परकीय संप्रदायांची वाढ होण्याचा प्रकार व तदंतर्गत भवितव्यता टाळण्यासाठीं हिंदूंमध्यें अनेक चळवळी सुरू होऊन जे विविधजातिसंग्राहक समाज स्थापन झाले त्यांमध्यें आर्यसमाज हा प्रमुख होय. हिंदुसंस्कृतिसंकोचार्थ होणार्या प्रयत्नांशीं तुलना करण्याजोगा दिर्घ प्रयत्न हिंदुत्वरक्षणपरांकडून अजून झालेला नाहीं. ब्रह्मसमाज, हिंदु मिशनरी सोसायटी यांचें या बाबतींतील कार्य फारच अल्प आहे. मराठे जातींमध्यें ख्रिस्ती लोकांस मराठे करून घेण्याची चळवळ अहमदनगरचे सयाजी पाटील यांनीं सुरू केली आहे. तसेंच वर्धा येथील मराठ्यांच्या परिषदेंत इतरांस मराठे करावें याबद्दल ठरावहि पास झाला आहे. या प्रयत्नांकडे अभिमानी हिंदूंचें लक्ष लागलें आहे. २१ मार्च १९२० रोजीं ज्ञानकोशाच्या उपसंपादिका कुमारी ईडिथ कोहन यांस निरूढ व्राट्यस्तोम विधीनें हिंदु समाजांत घेतलें हा जुन्या संस्थेच्या पुनरुद्धाराचा निराळा एक प्रयत्न होय.
भारतीय संस्कृतीचें अतिभारतीयत्व :— हिंदूंच्या संस्कृतीचा आणि हिंदूंच्या संख्येचा विचार करितांना आपलें लक्ष केवळ हिंदुस्थानांतच अडकवून उपयोगी नाहीं. प्राचीन काळीं भारतीय संस्कृतीचा विस्तार होत असतां त्या संस्कृतीनें जेवढें क्षेत्र आक्रमण केलें त्या सर्व क्षेत्राचें स्थूल ज्ञान तरी आपणांस अवश्य आहे. अशा ज्ञानाखेरीज जगांत ज्या मोठमोठ्या उलाढाली होतात आणि ज्या अनेक शतकें चालतात त्यांचें ज्ञान आपणांस व्हावयाचें नाहीं. स्थानिक इतिहास जितके महत्त्वाचे आहेत त्यांहूनहि सांस्कृतिक इतिहास अधिक महत्त्वाचे होत. फार मोठ्या जनसंख्येवर परिणाम घडविणार्या आणि आपल्या विविध शक्तींचा उपयोग करणार्या अशा शक्ती राजकीय नसून सांस्कृतिक असतात. राष्ट्रांचे इतिहास हा संस्कृतीच्या इतिहासांतील एक अल्प भाग असतो. सर्व जगाचें निरिक्षण करतांना राष्ट्रांच्या लहानसान क्रियाच केवळ नव्हत तर राष्ट्रांची विस्तारसंकोचमूलक बनलेलीं साम्राज्यें हीं देखील संस्कृतीच्या इतिहासाच्या पोटांत येऊन जातात. यासाठीं राष्ट्रांचे आणि साम्राज्यांचे इतिहास संस्कृतींच्या इतिहासाचे अल्प घटक समजण्याचा इतिहासवेत्त्यांचा परिपाठ आहे. जगांतील सर्व प्रकारच्या स्पर्धांत सांस्कृतिक स्पर्धा सर्वांत अधिक महत्त्वाची आहे. ही स्पर्धा समजली म्हणजे जगदितिहासाचित्राच्या स्थूल रेषा समजल्या. राष्ट्रांच्या अंतर्गत ज्या निरनिराळ्या घडामोडी त्या वरील रेषांहून खालच्या नंबरच्या अशा रेषा होत. अशी ही महत्त्वपरंपरा आहे. हिंदु या दृष्टीनें जो आपणांस विचार करावयाचा त्याचें महत्त्व हिंदुस्थानीय विचारापेक्षां मोठें आहे; हिंदुस्थान आणि इंग्लंड यांच्यासंबंधाचा प्रश्न, जगांतील विविध संस्कृतींच्या भवितव्यासंबंधींच्या प्रश्नापेक्षां फारच लहान आहे; या गोष्टी वरील विवेचनावरून आपल्या लक्षांत येतात. असो.
संशोधनामध्यें प्रवेश करावयाचा म्हणजे आजच्या व म्हणून अधिक परिचित अशा परिस्थितीकडे प्रथम अवलोकन करावयाचें आणि तेथून मग कमी परिचित अशा पूर्वकालाकडे जावयाचें. या संशोधन तत्त्वाचा अवलंब करून हिंदूंची भारतबाह्य अथवा अभारतीय जगांतील आजची परिस्थिति प्रथम पाहूं आणि नंतर पूर्वकालाकडे म्हणजे हिंदुसंस्कृतीच्या आजवरच्या संगतवार इतिहासाकडे जाऊं.
Comments
Post a Comment