भारतीय संस्कृतीचे पूर्वेकडील व पश्चिमेकडील परिणाम.
प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग ) प्रकरण ५ वें. भारतीय संस्कृतीचे पूर्वेकडील व पश्चिमेकडील परिणाम. आतां आपण सिलोन व ब्रह्मदेश यांहून कमी परिचित अशा प्रदेशांकडे वळलें पाहिजे. अफगाणिस्तान, तार्तरी, सायबेरिया, बलुचिस्तान, कांबोजान्त पूर्वदेश, तसेंच जावा, बलि, सेलबिस, लाँबक, बोर्निओ इत्यादि आग्नेयीकडील द्वीपें आणि मादागास्कर हें नैऋत्येकडील द्वीप या संबंधानें आतां माहिती करून घेऊं. ज्या स्थलाविषयीं थोडीच माहिती उपलब्ध आहे तेथें भारतीय संस्कृतीचा पूर्वींचा विस्तार आणि आजकालचें त्या देशाकडे होणारें प्रयाण यांचें विवेचन करतांना विषयपृथक्त्व राखण्याची जरूर नाहीं. अशा स्थलांसंबंधानें भारतीय संस्कृतीच्या प्राचीन कार्यांचे व त्यांच्या परिणामांचें वर्णन करतांना अनुषंगानें तेथील अर्वाचीन भारतीयांची माहिती दिली आहे. या विषयास प्रारंभ करण्यापूर्वीं हिंदुस्थान सरकाराच्या सत्तेखालीं असलेल्या आणि त्यामुळें हिंदुस्थानांतीलज समजल्या जाणार्या एका भागाकडे त्या भागाच्या अल्प महत्त्वामुळें दुर्लक्ष होऊं नये म्हणून लक्ष दिलें पाहिजे. या भागांत हिंदूंची वस्ती हिंदूंस मोठी अभिमानास्पद नाहीं...