हिंदुस्थान, सिलोन आणि ब्रह्मदेश.
प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण ४ थें.
हिंदुस्थान, सिलोन आणि ब्रह्मदेश.
हिंदुस्थानाच्या जवळील भागांचा म्हणजे ब्रह्मदेश, सिंहलद्वीप, मलायीद्वीपकल्प इत्यादि भागांचा विचार करतांना आपणांस दोन थर लक्षांत घ्यावे लागतात. एक सांस्कृतिक दृष्ट्या जे भारतीय आहेत अशा तद्देशीयांचा आणि दुसरा आजच्या मुसुलमानांनीं आणि ख्रिस्त्यांनीं युक्त अशा अर्वाचीन भारतीयांचा. या दोन्ही प्रकारच्या लोकांसंबंधानें आज येथें स्थानबद्ध झालेल्या हिंदु जनतेंत निश्चयात्मक भावना नाहींत. संस्कृतिविस्ताराचें काम बंद पडलें असल्यामुळें वरील देशांत नवीन जाणार्यांचा आणि तेथील देश्यांचा संबंध जोडणार्या चळवळी मुळींच नाहींत. यासाठीं या दोन प्रकारच्या लोकांचें ज्ञान आज आपणांस पृथकपणें मांडलें पाहिजे. जे आपले लोक तिकडे नवीन गेले आहेत त्यांच्याशीं आपलें अधिक जिव्हाळ्याचें नातें असेल आणि आहेहि; आणि यामुळें त्यांच्या हिताहिताविषयीं थोडीबहुत जागृति आपणांस दिसते; पण तिकडील देश्य लोकांसंबंधानें आपण आज उदासीन आहों. तथापि हरवलेल्या कोंकराच्या भेटीविषयीं अधिक आतुरता दाखविणार्या ख्रिस्ती कथेंतील मेंढपाळाची वृत्ति आपणांत केव्हां तरी जागृत होऊन भारतीय संस्कृतीच्या निरनिराळ्या देशांतील देश्य प्रतिनिधींविषयीं आपणांस सहानुभूति उत्पन्न होईल अशी आशा आहे. सद्यःकालीन चळवळीकडे व स्पर्धेकडे थोडेंफार दुर्लक्ष करून ऊर्ध्वदृष्टि राहणार्या संशोधकांस जी जिज्ञासा या लोकांसंबंधानें उत्पन्न होते तेवढीच काय ती जिज्ञासा आज आहे. या संशोधकांखेरीज इतरांस आज जिज्ञासाच नाहीं.
ज्याविषयीं आधुनिकांस कमी जिज्ञासा आहे तो भाग अगोदर घेण्याचें पाप आम्ही करतों.
एखाद्या लढाईंत पराभव झाल्यानंतर ज्याप्रमाणें सेनापतीस आपलें गेलें काय आणि राहिलें काय याचा हिशोब घ्यावा लागतो, त्याप्रमाणें गेल्या आठशें नऊशें वर्षें चालू असलेल्या भारतीय संस्कृतीच्या उच्छेदांतून आज शिल्लक काय राहिलें आहे याचा विचार केला पाहिजे.
वरील हिशोब काढून करावयाचें काय ? असा प्रश्न कित्येक तत्त्ववेत्ते करतील. त्याला उत्तर एवढेंच कीं, देशी संस्कृतीपासून हिंदू लोक कधीं मुक्त व्हावयाचे नाहींत आणि त्यांच्या संस्कृतीची जोपासना जितकी चांगली होईल तितकें हिंदूंस जगांत महत्त्व येईल. यासाठीं हिंदु संस्कृतीची जी वाताहात झाली आहे ती नाहींशी करून तिचें एकीकरण केलें पाहिजे.
हिंदु संस्कृति एकसूत्री कधीं होती काय ? हिंदू लोक कधीं एकसूत्री होते काय ? याला उत्तर एवढेंच कीं, हिंदु संस्कृतीच्या सार्वभौमत्वाखालीं असलेल्या लोकांस एकत्र होऊन स्वसंरक्षणाचें काम, मुसुलमानी व ख्रिस्ती लोकांची संप्रदायरूपी राष्ट्रें आमच्या संस्कृतीच्या उच्छेदार्थ प्रयत्न करीपर्यंत पडलें नव्हतें. ज्या निरनिराळ्या राष्ट्रांची संस्कृति अल्प होती तीं राष्ट्रें ब्राह्मणांनीं आपल्या संस्कृतीच्या बाहुल्यामुळें सहज आपल्या कबजांत आणलीं, त्यामुळें हिंदूंस एकसूत्री होण्यांचे प्रयोजन नव्हतें. मुसुलमानी स्वार्यांनंतर आम्ही जरा कोठें डोकें वर काढतों तों पाश्चात्य संस्कृति येऊन आम्हांस कबजांत आणूं पहात आहे यामुळें हिंदु संस्कृतीखालीं असलेल्या लोकांचें एकीकरण करून तिचा विस्तार करण्याचें आमचें कार्य अजून तसेंच राहिलें आहे. या कार्याकडे विशेष कळकळीनें लक्ष देण्याचें आतां आम्ही मनावर घेतलें पाहिजे. उच्छेदक शक्तींच्या धुमाकुळांतून आमच्या संस्कृतीचें जें कांहीं कोठें शिल्लक राहिलें आहे त्याचा हिशोब घेणें हें आमच्या एकीकरणकार्याला अवश्यक असें प्रस्तावनारूप कार्य आहे तेव्हां आतां तिकडे वळूं.
सिंहलद्वीप आणि ब्रह्मदेश या दोन प्रदेशांचें सांस्कृतिक भवितव्य हिंदुस्थानच्या भवितव्याशीं फार निकट तर्हेनें संबद्ध असल्यामुळें या दोन भूभागांविषयीं प्रथम विचार करणें योग्य होईल. यांत अगोदर सिंहलद्वीपस्थांकडें वळूं.
सिंहलद्वीपास भारतीय संस्कृतीचा अवशेष म्हणण्यापेक्षां विभाग म्हटलें तर अधिक शोभेल. तेथें बौद्ध संप्रदायाचें जगांतील एक अत्यंत महत्त्वाचें ठाणें आहे. हीनयान पंथाचें शुद्ध स्वरूप सिलोनमध्यें जसें सांपडतें तसें तें इतरत्र सांपडत नाहीं. पालीग्रंथांचें आगर आज सिंहलद्वीपच आहे आणि भारतीय संस्कृतीच्या इतिहासास थोडी बहुत मदत करणारे महावंसो, दीपवंसो यांसारखे इतिहासग्रंथ सिंहलद्वीपांतच सांपडतात. आज अनुराधपुर येथें गेलें असतां प्राचीन सुसंस्कृत हिंदुकलेचें स्वरूप अवशेषांच्या रूपांत पहावयास मिळतें. खुद्द सिंहली लोक बौद्ध आहेत पण वेदभाषाजन्य वाणी बोलत आहेत आणि तेणेंकरून ते आपली पितृपरंपरा व्यक्त करितात. सिंहलद्वीपांतील दुसरा मोठा वर्ग म्हणजे तामिळ लोकांचा. हे लोक वेदभाषाजन्य भाषा बोलत नसले तरी ते आपणांस ब्राह्मणानुयायी हिंदू म्हणवितात. याप्रमाणें एका लोकसमूहांचें आपणांशीं जवळचें नातें एका कारणामुळें आहे तर दुसर्याचें दुसर्या कारणामुळें आहे. यासाठींच वर म्हटलें आहे कीं, सिंहलद्वीपास हिंदु संस्कृतीचा अवशेष म्हणण्यापेक्षां विभाग म्हटलेलेंच अधिक शोभेल. असो.
आतां या द्वीपांतील आजच्या सामाजिक स्थितीचें सूक्ष्मावलोकन करूं. आपलें सिंहली लोकांशीं नातें दाखविणार्या अनेक गोष्टी डॉं. केतकर यांनीं पूर्वीं लोकशिक्षणांत प्रसिद्ध केल्या आहेत त्याच कांही फरकानें येथें दिल्या आहेत. त्यांचें वर्णन करितांना जातिभेद, परस्परजातिविवाह, प्रीतिविवाह,
देश्य आणि परकीय संस्कृतीची स्पर्धा इत्यादि गोष्टी विशेष विचारासाठीं घेतल्या आहेत, आणि तदनंतर तेथें आज जाणार्या भारतीयांच्या स्थितीसंबंधानें प्रत्यक्ष अवलोकनमूलक माहिती सादर केली आहे.
सिंहलद्वीप येथील लोक हिंदुस्थानांतून तिकडे गेलेले आहेत. तथापि तेथें बौद्ध संप्रदायाचा प्रसार झाल्यामुळें आणि यूरोपीय लोकांचे प्राबल्य तेथें अगोदर झाल्यामुळें त्यांच्या समाजांत आणि आपल्या समाजांत कांहीं फरक उत्पन्न झाले आहेत. तेथें कांही अंशीं यूरोपीय संस्कृतीची प्रगति अधिक झाली आहे. असें असल्यानें आपल्यापुढें असे प्रश्न उपस्थित होतात कीं, हे लोक हिंदुस्थानच्या संस्कृतीस अगदींच पारखे होणार काय ? ते अगदींच पारखे झाल्यास हिंदुस्थानाविषयीं त्यांच्या मनांत प्रेम राहील काय ? ते जर आपणांपेक्षां अधिक पाश्चात्य बनले असले तर त्यांस "आपणासारिखें" करण्यास काय परिश्रम केले पाहीजेत ? आणि त्या परिश्रमांस चांगले फल येण्यास किती "काळ वेळ" लागेल ? तसेंच आपल्यामध्यें राष्ट्रीय आकांक्षा उत्पन्न होत आहेत त्याप्रमाणें त्यांच्यामध्येहि होत आहेत काय ? होत असल्यास त्यांचे स्वरूप कोणत्या प्रकारचें आहे ? आंग्लसंस्कृतीचा अधिकाधिक प्रसार करून म्हणजे आपण अधिकाधिक इंग्रज बनून आंग्लसंसर्गसंभव सादृश्यानें राष्ट्राचें एकीकरण करावें अशी जी आजच्या काँग्रेसमधील पुढर्यांची म्हणजे गेल्या पिढींतील्या शिष्टांची वृत्ति आहे त्याचप्रमाणें त्यांचीहि आहे काय ? असल्यास तिला अवरोधक कोणी पक्ष उत्पन्न झाला आहे काय ? झाला असल्यास त्या पक्षाचा जोर कितपत आहे ? राष्ट्रीय संस्कृतीच्या पायावर नवीन संस्कृति उत्पन्न करणें त्या लोकांस कितपत शक्य आहे ? इत्यादि प्रश्नांचें उत्तर देण्यासाठीं जें अवलोकन करावयाचें त्यास राष्ट्रीय दृष्टीचें अवलोकन असें डॉ. केतकर म्हणतात.
सिलोनची लोकसंख्या १९११ च्या खानेसुमारीप्रमाणें ४१ लक्ष आहे. या लोकसंख्येंपैकीं सातअष्टमांश स्थाईक आहे आणि एकअष्टमांश फिरती आहे. म्हणजे हिंदुस्थानांतील मजूर आणि त्यांच्या बरोबर आलेलीं आश्रित माणसें मिळून सुमारें पांच लक्ष तीस हजार लोक भरतील. या लोकांपैकीं बहुतेक लोक तामिळ असल्यामुळें यांची मोजणी हिंदी तामिळ या सदराखालीं करितात. सिंहली तामिळ लोकांची संख्या जवळजवळ इतकीच आहे. एकंदर तामिळ लोकांची संख्या येथें एकचतुर्थांशापेक्षां जराशी अधिक आहे.
सिंहली लोकांची संख्या सत्तावीस लक्षांहून अधिक आहे म्हणजे शंभर सिलोनी लोकांत पासंष्ट लोक सिंहली आहेत. या पांसष्टांत ४१ "पातराट" सिंहली आहेत आणि चोवीस "उदराट" सिंहली आहेत.
"उदराट" आणि "पातराट" हे सिंहली लोकांचे भेद आहेत. उदराट (उर्ध्वराष्ट्र ?) म्हणजे उच्च प्रदेशांत रहाणारे लोक आणि पातराट म्हणजे सखल प्रदेशांत म्हणजे समुद्रकिनार्याशीं रहाणारे लोक.
सध्यां आपण सिंहलद्वीपांत पाहूं लागलों तर जिकडे तिकडे पातराटच आपणांस दिसतात. पातराटांमध्यें जितकी पाश्चात्त्य संस्कृति शिरली आहे तितकी उदराटांत नाहीं. उदराट हा मागसलेला वर्ग आहे असें लोकांस वाटतें. क्यांडीशहर हें उदराटांचें केंद्र होय. पण तेथें देखील आज पातराटांचाच भरणा २७४५ या संख्येनें अधिक आहे.
उदराट जरी मागासलेले आहेत, तथापि स्वभावतः कर्तृत्वशक्तीनें ते कमी आहेत असें नाहीं. स्वातंत्र्याची-परंपरागत संस्कृतीची-जोपासना करण्याचा बोजा त्यांच्यावर पडला होता व परकीय संस्कृतीस विरोध करणें हेंच त्यांचें कांहीं काळपर्यंत कर्तव्यकर्म झालें होतें. यामुळें पुष्कळांस उदराट हे मागासलेले वाटतात. ज्या वेळेस सिलोन हें डच आणि पोर्तुगीज लोकांनीं काबीज केलें त्या वेळेस या उदराटांनीं आपलें स्वातंत्र्य कायम ठेवलें. परक्या सत्तेचा अनुभव इंग्रजांची सरशी होईपर्यंत यांस मिळाला नाहीं. सिंहली लोकांचें परंपरागत धर्मशास्त्र आणि कायदा हीं आज उदराटांस फक्त लागू पडतात. पातराटांस लागू पडत नाहींत. यूरोपीय सुधारणा ज्यांनीं अधिक स्वीकारली असेल त्यांसच आजकालच्या दिवसांत अधिक प्रामुख्य मिळतें. त्यामुळें उदराटांस आज प्रमुखता नाहीं.
आज लंकेंतील ज्या लोकांचीं नांवें आपणांस ऐकावयास मिळतात ते लोक एक तर सिलोनी तामिळ आहेत अगर पातराट आहेत. उदराटांचीं नांवें आपल्या कानीं क्वचितच येतात.
सिलोनमध्यें यूरोपियनांची लोकसंख्या साडेसात हजार आहे आणि बर्घेर आणि यूरेशिअन लोकांची संख्या साडेसव्वीस हजार आहे. तसेंच तेरा हजार मलायी लोक आहेत.
सिलोनमध्यें वेद्ध नांवाची एक जंगली जात आहे, तिचें नांव पुष्कळांनीं ऐकलें असेल. या जातीची लोकसंख्या गेल्या खानेसुमारीच्या वेळेस ५३३२ होती. या वेद्धांपैकीं तीन हजार म्हणजे शेंकडा सत्तावन लोक आपणांस हिंदू म्हणवितात. वेद्धांमध्यें एकोणनव्वद माणसें ख्रिस्ती झालीं आहेत.
सिंहलद्विपांतील जातिभेद - सिंहलद्वीपांतील जातिभेदाचें वर्णन करावयाचें झाल्यास या वर्णनाचे प्रथम दोन विभाग केले पाहिजेत ते येणेंप्रमाणे :— १ तामिळ लोकांतील जातिभेद, आणि २ सिंहली लोकांतील जातिभेद. या दोहोंच्या जातिभेदांमध्यें सामान्य स्वरूप कांहीं तरी आहेच. त्याचें नंतर वर्णन करूं.
सिंहलद्वीपांती तामिळ लोकांच्या जातिभेदांत आणि हिंदुस्थानांतील तामिळ लोकांच्या जातिभेदांत फारसा फरक नाहीं. ज्या जाती हिंदुस्थानी तामिळांत आहेत त्याच सिलोनी तामिळांत आहेत. कांही फरक आपणांस दृष्टीस पडतात, ते येणेंप्रमाणे :- सिंहलद्वीपांतील जातिभेदांत ब्रह्मद्वेषाचा अभाव, ख्रिस्ती पारमार्थिक संप्रदायाचें जातिभ्रंशकरणांत दौर्बल्य आणि दत्तविधान आणि विवाह यांच्या योगानें जात्यंतराची शक्यता या गोष्टी नजरेस येतात. याशिवाय दुसर्याहि महत्त्वाच्या गोष्टी आहेत. मद्रास इलाख्यांत ब्राह्मणांची जात शिक्षणांत फार पुढें गेली आहे; आणि सरकारी नोकरी, वकिली, वैद्यकी इत्यादि धंद्यांत ब्राह्मणच इतरांच्या पुढें आहेत. लंकेंतील परिस्थिती निराळी आहे. तेथें अर्वाचीन शिक्षणाचा संसर्ग ब्राह्मणांस झाला नाहीं. येथें जे ब्राह्मण आहेत त्यांचे धंदे मुख्यत्वेंकरून दोन आहेत. एक धंदा म्हटला म्हणजे उपाध्येगिरी आणि दुसरा धंदा म्हटला म्हणजे गणपति, सुब्रह्मण्य (कार्तिकेय), शिव आणि विष्णु इत्यादि उपास्यांच्या देवळांतून पुजारीपण करणें. जे सुशिक्षितांचे धंदे आपल्याकडे ब्राह्मण लोक करितात ते धंदे "वेल्लाल" ही जात करिते.
हिंदुस्थानांतील बरेचसे वेल्लाल अलीकडे निवृत्तमांस बनले आहेत; पण सिलोनी वेल्लाल मासांहार करितात.
पाश्चात्य संस्कृति आणि हिंदी संस्कृति यांचें एक विलक्षण मिश्रण तामिळ लोकांत झालें आहे. बूट, पाटलोण, साहेबी टोपी, कालर, नेकटाय इत्यादि सर्व प्रकारचा पाश्चात्य पोषाख करावायाचा आणि कपाळावर पुन्हा भस्माचे चार स्पष्ट दिसतील असे पट्टे ओढावयाचे हा प्रकार चोहोंकडे आढळून येतो ! टेबलावर जेवण जेवावयाचे; तथापि टेबलावर चिनीमातीची प्लेट न घेतां केळीचें पान घ्यावयाचें हा प्रकार तर पुष्कळच आहे !
वेल्लाल जातीच्या खालोखाल अर्वाचीन सुधातरणेंत पुढें आलेली जात म्हटली म्हणजे "करावा" (मच्छीमार) या लोकांची जात होय. ही जात श्रीमंत झाली आहे आणि वेल्लालांच्या बरोबर लग्नव्यवहार करण्याची आकांक्षा करीत आहे.*
ख्रिस्ती व हिंदु :- लंकेतील तामिळ लोकांच्या जातिभेदाचें वर्ण करतांना एका गोष्टीचा उल्लेख मुख्यत्वेंकरून केला पाहिजे. ती गोष्ट म्हटली म्हणजे, हिंदु आणि ख्रिस्ती यांची लग्नें होत. तेथें एखादा वेल्लाल हिंदु असला तर त्यास वेल्लाल जातीची ख्रिस्ती मुलगी करण्यास हरकत वाटत नाहीं. तो वेल्लाल जातीची ख्रिस्ती मुलगी करील; पण दुसर्या जातीची हिंदु मुलगी करणार नाहीं. ख्रिस्ती संप्रदायाच्या लोकांची हीच गोष्ट आहे. ते आपली मुलगी स्वजातीय हिंदूस देतील; तथापि दुसर्या जातीच्या ख्रिस्त्यास देणार नाहींत. तेथें ख्रिस्ती मनुष्यास हिंदु होणें देखील सोपें आहे, असें एका ख्रिस्ती वकिलानें डॉ. केतकर यांस सांगितलें. कपाळास भस्म लावून एखादा मनुष्य हिंडूं लागला म्हणजे तो ख्रिस्ती नसून हिंदु झाला आहे असें लोक समजावयास लागतात !
सिलोनमध्यें ख्रिस्त्याचा विटाळ हिंदु तामिळास होत नाहीं हें सांगावयास नकोच.
हिंदू व ख्रिस्ती या लोकांनीं लग्न करतांना परमार्थसाधन आणि उपास्य यांच्याकडे लक्ष न देतां जातीकडे लक्ष द्यावें ही गोष्ट प्रथमदर्शनीं विस्मायक वाटेल. पण विचार केला असतां यांत आश्चर्य मानण्यासारखें कांही नाहीं. गुजराथी वाण्यांमध्यें पन्नास भेद उर्फ जाती आहेत. प्रत्येक जातींतले कांहीं लोक वैष्णवसंप्रदायी आहेत आणि कांही जैन आहेत. दोघेहि एकमेकांशी लग्नें करितात. लग्न झाल्यानंतर बायको नवर्याचें उपास्य स्वीकारते.
जैन आणि वैष्णव या दोघांसहि हिंदूंचें धर्मशास्त्र लागू पडते. पंजाबमध्यें शीख आणि सनातनी (श्रुतिस्मृतींस पूज्य मानणारे हिंदू) लग्नव्यवहार करितात. एखादा शीख जर आरोरा जातीचा असला तर तो आरोरा जातीच्या शीख नसलेल्या लोकांशीं विवाहसंबंध करील; पण त्यास आपली मुलगी जाठ जातीच्या शिखास देण्याचें जिवावर येईल. लग्नव्यवहारांत कोणच्या गोष्टीकडे लक्ष द्यावें या प्रश्नासंबंधानें महाराष्ट्रीयांमध्येंच प्रकार किती आहेत पहा. कोंकणस्थांत ऋग्वेदी आणि यजुर्वेदी यांची लग्ने होतात. वेदशाखेनुसार देशस्थांत जाती आहेत. पण त्या इतरत्र नाहींत. उपास्य आणि परमार्थसाधन यांस लग्नव्यवहारांत महत्त्व किती द्यावायांचे हा प्रश्न सादृश्यावर अवलंबून आहे असें दिसतें. ख्रिस्ती लोक ही आपल्याकडे निराळी जात झाली आहे. "ख्रैस्त्य" * हें आपल्या देशांत केवळ परमार्थसाधन नाहीं तर तें भिन्न आचारविचारांचें संस्थापक आणि नवीन जात तयार करणारें करण आहे; पण सिंहलद्वीपांत तसें नाहीं. आपल्याकडे आपण थिआसफिस्टास जातीबाहेर कोठें काढतों ? लोकांची रीत बिघडविण्याच्या व बाह्यांस देव मानावयास लोकांना शिकविण्याच्या कामीं हें अर्वाचीन पाखंड ख्रिस्ती संप्रदायापेक्षां कमी नाहीं. * जानवें टाकून द्यावें म्हणून गप्पा मारणार्या, तथापि जानवें न टाकून देणार्या प्रार्थनासमाजिस्टांस आपण कोठें जातीबाहेर काढतों ? मिल्लमतानुयायी अगर स्पेन्सरमतानुयायी कोणी झाला तरी त्याला जातीबाहेर कोणी काढीत नाहींत; तथापि जर कोणी ख्रिस्ती झाला तर मात्र आपण त्यास बाह्य लेखितों. याचें मुख्य कारण, ख्रिस्ती झालेले आपले लोक आपल्या दृष्टीनें जें अयोग्य आचरण आहे तें करितात आणि परकीय समाजांत प्रवेश करितात हें होय.
सिंहलद्वीपांतील सर्व हिंदू निवृत्तमांस नाहींत आणि सर्वच ख्रिस्ती मांसाहारी नाहींत; शिवाय परजातीबरोबर ते लग्नव्यवहार करीत नाहींत. आणि तेथील सरकाराची वृत्ति ख्रिस्त्यांस अधिक चांगल्या तर्हेनें वागवावयाचें आणि हिंदूंस कमी चांगल्या तर्हेनें वागवावयाचे अशा प्रकारची नाहीं. त्यामुळें ख्रैस्त्य पत्करणार्या लोकांस हिंदूंपासून तुटून राहण्यांत फायदा दिसत नाहीं.
जैन लोकांस हिंदूंचेंच धर्मशास्त्र कायद्याच्या दृष्टीनें लागू पडतें. सिलोन तामिळ-ख्रिस्ती लोकांस तामिळ हिंदूंचांच धर्मशास्त्रीय कायदा लागू पडतो. उदाहरणार्थ, हिंदूंच्या लग्नांतील मुख्य भाग नवर्यानें मंगळसूत्र बांधणें हा धरला आहे; आणि इतर भाग कमी महत्त्वाचे धरले आहेत. ख्रिस्ती झालेल्या तामिळांत देखील मंगळसूत्राचें महत्त्व आहेच. (कोचीन येथील गोर्या ज्यू लोकांच्या लग्नास देखील मंगळसूत्र हें लागतेंच !) सिंहलद्वीपांतील कायद्याविषयीं विशेष विवेचन पुढें येईलच. जातिभेदाशीं संबंध असलेल्या एकदोन गोष्टींसंबंधानें येथें लिहातों.
"थेसावलामै" उर्फ जाफना येथील कायद्यांत असें लिहिलें आहे की :—
"रीतीप्रमाणें जर कोणी पुरुषानें उच्च अगर हलक्या जातीचा मुलगा दत्तक घेतला तर त्या मुलास बापाची मालमत्ता मिळते एवढेंच नव्हे, तर तो मुलगा बापाच्या जातीचा होतो. तथापि एखाद्या बाईनें जर मूल दत्तक घेतलें, तर त्या मुलास त्या बाईची मालमत्ता मिळेल एवढेंच. तें मूल दत्तक घेणार्या बाईच्या जातीचें नाहीं, तर तें आपल्या जन्मदात्या बापाच्याच जातींत रहातें."
जर एखाद्या मनुष्यानें अन्य जातीच्या मुलीस दत्तक घेतलें, तर ती दत्तक घेणार्या मनुष्याच्या जातींत प्रवेश करिते. तथापि तिच्या मुलांची आणि तिच्या (दत्तक) बापाची जात एक होत नाहीं. तिच्या मुलांची जात तिच्या नवर्याच्या जातीप्रमाणें ठरते. ("थेसावलामै" भाग दुसरा, कलम ७ वें).
जे तामिळ लोक "थेसावलामै" कायद्यास अनुसरतात त्यांपैकीं कोणा स्त्रीनें परजातीच्या पुरुषाबरोबर लग्न केलें तर ती लग्नानंतर, जोपर्यंत तें लग्न कायम आहे तोंपर्यंत म्हणजे ती दुसरे लग्न करीपर्यंत, नवर्याच्याच जातीची आहे असें कायद्याच्या दृष्टीनें समजलें जाईल. "वैवाहिक हक्क आणि वारसा या संबंधाचा कायदा (१८७६)."
तामिळ समाजाचें निरीक्षण करतां भिन्नत्वदर्शक गोष्टी यांपेक्षां अधिक दिसत नाहींत.
सिंहली लोकांतील जातिभेद आणि एकंदर समाजस्थिति समजण्यासाठीं त्यांच्या संस्कृतीच्या स्वरूपाचें आणि कायद्याचें ज्ञान पाहिजे आणि समाजस्वरूपाचा प्रचलित राजशासनस्वरूपी कायद्याशीं असलेला संबंध लक्षांत घेतला पाहिजे.
सिंहली कायदा आणि सिंहली संस्कृति :— सिंहली लोकरिवाज आणि सिंहली कायदा यांच्या परस्परसंबंधाविषयीं असें म्हटलें पाहिजे कीं हिंदुस्थानापेक्षां सिहलद्वीपांत कायद्याची लोकरीतीपासून फारकत अधिक झाली आहे.
कोणत्याहि समाजाची विशिष्टता त्या समाजाचें शासन ज्या पद्धतीनें होत असेल त्या पद्धतीच्या चिरकालिकत्वामुळें रहातें. समाजाचें खाणेंपिणें, जेवणाच्या वेळा, कपड्यांची पद्धत, या गोष्टी कालानुसार बदलतात; तथापि समाजाची शासनपद्धति बदलण्यास अधिक अवकाश लागतो; आणि समाजाची घटना बदलणें तर त्याहूनही कठिण आहे. समाजाच्या घटनेंत फेरफार सहज होत नाहींत. ते फेरफार करण्यासाठीं फारच मोठा प्रयत्न लागतो. एक तर समाजांत फारच मोठ्या जोराची खळबळ होऊन फेरफार घडून येतात; अगर परसत्तेचा वरवंटा येऊन मूल संस्कृति चिरडून टाकतो. या विधानाची सत्यता दाखविण्यासाठीं एकच उदाहरण घेतों. आफ्रिकेतील निग्रोंमध्यें शेकडों अगर हजारों जाती आहेत असें म्हटलें तरी चालेल. सूदानमध्येंच एक हजारांवर जाती होतील. कित्येक ठिकाणीं प्रत्येक गांव म्हणजे निराळी जात असें झालें आहे. तथापि तेथूनच अमेरिकेंत नेलेल्या निग्रोंमध्यें जाती राहिल्या नाहींत; आणि त्या रहातील तरी कशा ? निग्रो बायका म्हणजे गोर्या लोकांच्या रखेल्या होत्या; आणि त्यांच्यावर आणि निग्रो पुरूषांवर वाटेल ती सत्ता त्यांचे मालक चालवीत असत. "वाटेल त्या गाईवर वाटेल तो पोळ लावावयाचा" असा प्रकार देखील गुलामांचे मालक करीत. कारण, जितका भक्कम मुलगा तयार होईल तितकी त्यास जास्त किंमत येत असे. त्यांच्यामध्यें लग्नव्यवहारच नाहींसा झाला होता. अशा प्रसंगीं मूळ संस्कृति आणि मूळच्या आठवणी काय टिकणार ? आजच्या वृद्ध निग्रोंपैकीं बहुतेकांस आपला आजा कोण हें ठाऊक नाहीं; आणि बर्याचशा लोकांस आपला बाप कोण हें ठाऊक नाहीं ! आपण निग्रो आहों, याशिवाय इतर सर्व गोष्टींची त्यांस विस्मृति झाली आहे; आणि ते सर्व आज एकजात झाले आहेत. आफ्रिकेंतील निग्रोंस नवीन सुधारणा घेण्यास जी हरकत वाटते, ती अमेरिकन निग्रोंस वाटणार नाहीं. कारण त्यांचे परंपरागत संस्कार नष्ट झाले आहेत.
केवळ राजकीय पारतंत्र्यामुळें परकीयांची सत्ता पूर्णपणें स्थापित होत नाहीं. खाजगी व्यवहारावर व्यक्तींची सत्ता असलेली नष्ट होत नाहीं, आणि त्यामुळें सर्व तर्हेचा कायदा नष्ट होत नाहीं. राजव्यवहाराचा कायदा मात्र बदलतोच. हिंदुस्थानांत त्याप्रमाणें बदललाहि आहे.
पोर्तुगीज आणि डच सत्तेखालीं सिंहलद्वीपाचा जो भाग आला त्या भागांत ख्रिस्ती संप्रदाय फारच जोरानें वाढला. आणि बहुतेक सिंहली लोकांची नांवें देखील पोर्तुगीज अगर डच बनलीं. शिवाय सिंहली संस्कृतीचें मुख्य स्थान समुद्रकिनारा नव्हता, तर अनुराधपूर आणि क्यांडी हीं आंतील शहरें होतीं. समद्रकिनार्यावरील भागांत आणि सखल प्रदेशांत संस्कृति फारच मागसलेली होती. सिंहली लोकांचा पोषाख अगदींच अल्प होता. यामुळें नवीन संस्कृतीचा स्वीकार करण्यास त्यांस फारसें जड गेलें नाहीं. परंपरागत संस्कृतीविषयींचा अभिमान देश परक्या सत्तेखालीं गेला म्हणजे अधिक वाढतो, हें खरें. तथापि ज्या लोकांची संस्कृतीच अल्प असते त्यांस परकी संस्कृति घ्यावयास कमी हरकत वाटते. बंगाली लोकांस साहेबी टोपी डोक्यावर घालावयास मनाचा फारसा निर्धार करावा लागत नाहीं. तथापि महाराष्ट्रीयांस साहेबी टोपी घालण्यास अधिक शंका वाटते. परंपरागत संस्कृतीचा थर बंगाल्यांत फारसा जाड नसल्याकारणानें त्यांस कांहीं बाबतींत पाश्चात्य संस्कृतीचा अवलंब करणें फारसें जड गेलें नाहीं.
पोर्तुगीज लोकांनीं पोर्तुगीज कायदा सिलोनमध्यें सुरू केला; आणि डच लोक आल्यानंतर डच लोकांनीं रोमन-डच कायदा सुरू केला. जो भाग त्यांच्या अंमलाखालीं आला होता तेथें तो कायदा सुरू झाला; तथापि क्यांडी व आसपासचा भाग त्यांच्या अंमलाखालीं आला नसल्याकारणानें तेथें मूळ कायदा कायम राहिला.
आज पातराटांचे सर्व व्यवहार-म्हणजे देवघेव, दान, विक्री, वारशासंबंधाचा कायदा-हे सर्व रोमन-डच झाले आहेत. म्हणजे कायद्याच्या बाबतींत पातराटांची संस्कृति पाश्चात्य आहे. तथापि सिंहली जातिभेदास त्या कायद्याचा संपर्क फारसा झाला नाहीं. कारण, राष्ट्राच्या सर्वांगांचे नियमन करणारे धर्मशास्त्र तें नाहीं, आणि मूळ भाषा नष्ट झाली नाहीं. समाजघटनेच्या बाबतींत परकीय संस्कृतीचें देखील कांही चाललें नाहीं. रोमन-डच कायद्याप्रमाणें वाटेल त्याला वाटेल त्या जातीच्या बाईबरोबर लग्न करण्यास हरकत नाहीं. पण बाह्यांनीं परवानगी दिली म्हणजे अंतःस्थ फेरफार होतात अशांतला भाग मुळींच नाहीं. आज हिंदुस्थानांत इंग्रजांनीं कायदा करून वाटेल त्यास वाटेल त्याबरोबर लग्न करण्यास परवानगी दिली; आणि मनुष्याच्या मृत्यूनंतर त्याच्या मालमत्तेची वांटणी इंग्रजी कायद्यानें व्हावी असें जरी म्हटलें तरी समाजव्यवस्थेंत फेरफार होईल असें नाहीं.
आतां सिंहलदेशाच्या समाजशासनाकडे लक्ष देऊं. आपल्या देशाप्रमाणेंच तेथें देखील राष्ट्रीय जीवनाच्या केवळ अल्पांगाचें नियमन "कायद्या"नें होतें हें लक्षांत घेतलें पाहिजे. तथापि कायद्यांचा संग्रह तपासणें हें महत्त्वाचें नाहीं असें मात्र नव्हे. या द्वीपांत एकंदर पांच शासनसमूह चालू आहेत.
१. उदराटांचा कायदा- याला "क्यांडियन सिंहली कायदा" असें म्हणतात. हा कायदा लोकांच्या रीतीभाती पाहून मुख्यत्वेंकरून तयार केला आहे. "नीतिनिगंडुव" हा ग्रंथ या कायद्याचा आदर्श आहे. पुष्कळ लोक "नीतिनिगंडुवा"स लबाडीचें अर्वाचीन पुस्तक म्हणतात; तथापि तसें म्हणण्यास कोणीं यथासांग आधार दिला नाहीं. गोईगमांच्या जातींचें उच्चत्व आणि इतर जातींचें नीचत्व या ग्रंथांत सांगितलें असल्यामुळें या ग्रंथास उलथून पाडण्याची इच्छा इतर जातींस होणार यांत शंका नाहीं.
२. थेसावलामै- हा कायदा जाफना येथील तामिळ लोकांस मुख्यत्वेंकरून लागू आहे. हा कायदा केवळ रूढिमय होता. पुढें डच लोकांनीं हा लिहून काढला. या कायद्याच्या पूरणार्थ हिंदुस्थानांतील हिंदु कायद्याचें अवलंबन करितात.
३. मुसुलमानी कायदा- सिंहलद्वीपांतील मुसुलमानांचा जो कायदा आहे तो. त्याच्या पूरणार्थ हिंदुस्थानांतील मुसुलमानी कायद्याचा आश्रय केला जातो.
४. मुक्कुवा कायदा— बाटिकोला येथील तामिळ लोकांसंबंधाचा कायदा.
५. रोमन-डच कायदा- हा सर्व द्वीपाचा सामान्य कायदा होय.
एवंच, सिलोनचा कायदा जरी रोमन-डच आहे, आणि सिंहली लोकांस देखील जरी तो रोमन-डच कायदा अंगीकारावा लागतो, तरी देखील त्यांच्या समाजाची घटना पूर्वींचीच आहे, आणि ती फिरविणारा कायदा त्यांच्यावर दडपला गेला नाहीं.
समाजस्वरूप आणि परंपरा :— परंपरा सांगावयाची म्हणजे मूलगृह, मूलगृहाची प्रयाणकालीन संस्कृति, विभक्त झाल्यानंतरहि मूलगृहाशीं म्हणजे तेथील वाङ्मयाशीं व विचारपरंपरेशीं संबंध या दृष्टींनीं सांगितली पाहिजे. या दृष्टींनीं सिंहलांतील चातुर्वर्ण्य, श्रौतस्मार्त विद्येशीं संबंध अगर संबंधाभाव यांवर विचार व्यक्त करण्याचा प्रसंग येतो. सिंहली समाजाचें स्वरूप अर्वाचीन कायद्यावरून समजत नाहीं. त्यासाठीं इतिहासाकडे लक्ष दिले पाहिजे. या इतिहासांत लोकांचा प्रयाणविषयक आणि संप्रदायविषयक इतिहास लक्षांत घेतला पाहिजे.
सिंहली लोकांचीं संस्कृति पूर्णपणें हिंदूच आहे, असें म्हणण्यास हरकत नाहीं. आपल्या एखाद्या प्रांतांतील ब्राह्मण काढून टाकले व ब्राह्मणांचें ज्ञान ब्राह्मणेतरांस शिकविलें आणि त्या प्रांतावर यूरोपिअन संस्कृति आणून लादली तर त्या प्रांतास जें स्वरूप येईल तें स्वरूप आज सिंहली समाजास आलें आहे.
सिंहली लोकांमध्यें आपले पूर्वज ओरिसांतून आले अशी समजूत प्रचलित आहे आणि त्या समजूतीस "महावंसो" नांवाच्या लंकेच्या इतिहासांत नमूद केलेली दंतकथा कारण आहे. त्या दंतकथेंत, वंगदेशीय एका राजकन्येस एका सिंहापासून मुलगा झाला, आणि लोक त्याला सिंहल म्हणूं लागले, तो पुढें आपल्या अनुचरांसह लंकेंत आला आणि त्यानें लंका वसविली असें सांगितलें आहे.
सिंहली लोकांची भाषा संस्कृतजन्य आहे. त्यांच्या संस्कृतीचें साधारणपणें वर्णन करावयाचें म्हटलें म्हणजे येणेंप्रमाणें. त्यांची नित्य व्यवहाराची भाषा सिंहली आहे; पारमार्थिक ग्रंथांची भाषा पाली आहे; आणि शास्त्रग्रंथांची भाषा संस्कृत आहे. सिंहली लोक बौद्ध आहेत असें पाहून आपणांस असें वाटण्याचा संभव आहे कीं, यांच्या ग्रंथांत संस्कृतपेक्षां पालीचें मिश्रण अधिक असेल; पण तसें मुळींच नाहीं. कोणताहि चांगल्या प्रौढ भाषेंत लिहिलेला सिंहली उतार घेतला तर त्यांत पालीपेक्षां संस्कृत शब्दांचाच भरणा अधिक आढळतो. ते नवीन शब्द तयार करितात ते संस्कृत शब्द जोडून
तयार करितात. एवंच, पाली भाषा जरी त्यांची पारमार्थिक ज्ञान मिळविण्याची भाषा असली तरी ती त्यांच्या संस्कृतीची भाषा खास नाहीं.
सिंहलद्वीपांत सिंहली समाजांत ब्राह्मण कां नाहींत या प्रश्नाचें उत्तर येणेंप्रमाणें देता येईल. बुद्धाच्या कालीं वंगदेशांत ब्राह्मण नव्हते, तेथें भुतें काढणारें, मंत्र म्हणणारे लोक नसतील असें नाहीं; पण श्रौतस्मार्त विद्यांचें बृंहितस्वरूप जाणून त्यांची वंशपरंपरेनें जोपासना करणारा वर्ग तेथें नव्हता, असें वाटतें. * पंचगौड आणि पंचद्राविड हे ब्राह्मणांचे भेद ज्या वेळेस झाले त्या वेळेस ब्राह्मणजातीचें अस्तित्व बंगाल्यांत नसावेंसें दिसतें. सुमारें पंचवीस वर्षांपूर्वींपर्यंत बंगालच्या ब्राह्मणांचें ब्राह्मण्य काशीक्षेत्रांत पूर्णपणें मान्य झालें नव्हतें; कारण, काशी येथील इतर ब्राह्मण बंगाली ब्राह्मणांस पाण्यास शिवूं देत नसत. अद्यापि देखील कांशींतील अगदीं जुन्या प्रकारच्या लोकांत बंगाली ब्राह्मणांस पंचगौडांच्या दर्जाचे लेखीत नाहींत. वंगदेशांत ब्राह्मणांच्या अगोदरच बौद्ध भिक्षू गेले असावे असें वाटतें. ब्राह्मणजातीची संस्थापना होऊन तिचा बंगालपर्यंत प्रसार होण्यापूर्वींच म्हणजे अविकसित श्रौतस्मार्तधर्मकालींच कांही उत्कलदेशीय लोक सिंहलद्वीपांत गेले असावेत. जेव्हां अशोकानें धर्मप्रचारक पाठविले तेव्हां त्यांस मुळींच अडथळा झाला नाहीं, याचें बीज हेंच आहे. आर्यसंस्कृतिच्या इतिहासाचें अवलोकन केले असतां आपणांस असें दिसून येईल कीं, पुष्कळ ठिकाणीं बौद्ध संप्रदायाचा प्रसार अगोदर होई; आणि बौद्धांनंतर ब्राह्मण तेथें जाऊन आपलें बस्तान बसवीत. सयाममध्यें देखील ब्राह्मण म्हणविणारे लोक आहेत. जावा येथील हिंदू संस्कृति नष्ट झाली आहे; आणि त्यामुळें ब्राह्मणांचें अस्तित्व तेथें होतें काय यासंबंधाची कल्पना आज करीतां येत नाहीं. जावानजीकच्या बलिद्वीपांद "पादण्ड" या नांवानें तेथील ब्राह्मण संबोधिले जातात आणि ते तेथें अजूनहि सर्व वर्णांच्या स्त्रियांबरोबर लग्नव्यवहार करितात आणि त्या संततीस ब्राह्मण लेखिलें जातें. तेथें बौद्धहि आहेत. हिंदुस्थानच्या पूर्वभागाच्या सरहद्दीवर आणि हिमालयाच्या आसमंतात् ब्राह्मण अजूनहि प्रवेश करीत आहेत, आणि तेथील बौद्धसंप्रदायाची पिच्छेहाट होत आहे, हें त्या भागांवर हिंदुस्थान सरकारच्या अधिकार्यानें लिहिलेल्या ग्रंथावरून दिसून येतें. मलबारांत बौद्धांनीं प्रथम संस्कृतिप्रचारास सुरूवात केली व पुढें ब्राह्मणांनीं जाऊन तो भाग काबीज केला, असें तेथील पुराणेतिहास संशोधकांचें मत आहे. श्रौतविद्येचा विकास जेथें झाला तें स्थान सोडून देऊन भारतांत देखील पुष्कळ ठिकाणीं आणि भारतीय वस्ती जेथें गेली अशा ठिकाणीं धर्माच्या आवरणांचे तीन थर आहेत. पहिला थर आर्यांच्या अव्यवस्थित पैतृक धर्मांचा; दुसरा थर बुद्धाच्या धम्माचा आणि तिसरा ब्राह्मणांच्या श्रौत-स्मार्त धर्मांचा. जेथें अविकसित श्रौतस्मार्त धर्मांचा देखील मागमूस नाहीं आणि उत्तरकालीन ब्राह्मणांनीं पाय ठेवला नाहीं तेथें हिंदुत्वप्रसाराचें कार्य बौद्धांनींहि केलें आहे. हिंदुसमाज उर्फ हिंदुसंस्कृति हा सार्वभौम राजा होय; आणि हिंदुसमाजांत उत्पन्न झालेले संप्रदाय हे मांडलिक होत. मांडलिकांनीं प्रदेश काबीज केला म्हणजे कालांतरानें तेथें सार्वभौमाची सत्ता हळूहळू द्दष्टीस पडूं लागते. ब्राह्मण हे हिंदु संस्कृतीचे लढवय्ये होत. जो देश बौद्ध संप्रदायाखालीं आला तो हिंदुसमाजाचा अर्धामुर्धा भाग बने, आणि तेथें ब्राह्मणांनीं जाऊन आपले वर्चस्व स्थापन केलें म्हणजे तो पूर्णपणें हिंदु बने असें म्हणण्यास हरकत नाहीं. आपणांस बौद्धसमाजाकडे या दृष्टीनें अवलोकन केलें पाहिजे. बौद्धत्व आणि हिंदुत्व हीं एकमेकांपासून विभक्त नाहींत; आणि मनुष्य बौद्ध झाला म्हणजे तो हिंदुत्वापासून मुकला असेंहि नाही.
सिंहली संस्कृतीचें यथार्थ ज्ञान होण्यासाठीं सिंहली संस्कृतीचें हिंदुस्थानातील हिंदुत्वाशीं सादृश्य किती आहे हें पाहिलें पाहिजे.
प्रथमतः उपासना घेऊं. तामिळ हिंदू लोक बुद्धास विष्णूचा अवतार समजतात आणि बुद्धदर्शनास जातात. जेथें विष्णूचें अगर सुब्रह्मण्याचें देवालय नसेल तेथें बुद्धदर्शनानें वैष्णव आपली पारमार्थिक तृष्णा भागवितात. शिवाय आपण पुष्कळ विहारांचें अवलोकन केलें तर आपणांस असें आढळून येईल कीं, विहाराच्या आवारांत इतर हिंदू दैवतांची देवालयें देखील आहेत; आणि "कापुआ" नांवाच्या जातीचे गुरव त्या देवाचे पुजारी आहेत. मद्रास इलाख्यांत पुष्कळ ठिकाणीं देवाचें पुजारीपण या जातीकडेच आहे. पुष्कळ बौद्ध हिंदुदेवतांसहि नवस करितात; पण यांत आश्चर्य मानण्याजोगें कांही नाहीं. कारण, बौद्ध हे भुताखेतांसहि नवस करितात.
वेदांत वगैरे तत्त्वज्ञानाचा अंगीकार न करितां बौद्ध तत्त्वज्ञानाचा अंगीकार करणारा हिंदु तो बौद्ध अशी बौद्ध व्याख्या केली तर ती बरोबर होईल.
चातुर्वर्ण्याची कल्पना सिंहली बौद्धांतून नष्ट झाली नाहीं. सिंहली लोकांच्या धर्मशास्त्राप्रमाणें * (म्हणजे नीतिनिगंडुव ग्रंथाप्रमाणें) सर्व सिंहली शूद्र आहेत.
सिंहलद्वीपांत पाली भाषेचा जसा अभ्यास होतो, तसा संस्कृत भाषेचाहि होतो. कोलंबोच्या परिकरांत "मलिगाकंद" येथील विद्योदय कॉलेजांत संस्कृत भाषा शिकवली जाते, आणि कांहीं सिंहली काशीक्षेत्रांतहि संस्कृत भाषा आणि वाङ्मय शिकण्यास जातात. येथें सामान्यपणें वाचण्याचे ग्रंथ म्हटले म्हणजे, रघुवंश आणि भक्तिशतक हे होत. भक्तिशतक हा ग्रंथ श्रीचंद्रभारती नांवाच्या एका भिक्षूनें लिहिला. हा भिक्षु सुमारें पांचशें वर्षापूर्वीं होऊन गेला असें म्हणतात. हा पूर्वीं सारस्वत ब्राह्मण होता. लंकेत आल्यानंतर तो बौद्ध झाला, आणि त्यास "बौद्धगमचक्रवर्ती" असा किताब राजानें दिला असेंहि सांगतात.
येथें अजूनहि चांगले संस्कृत पंडित आहेत. त्यांत सी. ए. शीलस्कंध, एम्. ज्ञानेश्वर यांचीं नांवें देतां येतील. शीलस्कंधानें "जानकीहरण" नांवाचा एक जुना ग्रंथ प्रकाशित केला. हा ग्रंथ उपलब्ध नव्हता; या ग्रंथावर एक सिंहली टीका मात्र होती, त्या टीकेच्या साहाय्यानें त्यानें टीकेंतील शब्द घेऊन मूळ ग्रंथास पुनर्जन्म दिला. अजून देखील संस्कृतमध्यें थोडीबहुत श्लोकरचना येथें होते.
आतां सिंहली लोकांतील जातिभेदाकडे वळूं. सविस्तर वर्णन देण्यास येथें अवकाश नाहीं, तथापि मुख्य गोष्टी येथें देतों.
चातुर्वर्ण्याची कल्पना बौद्धस्वरूपांत सिंहलद्वीपांत आहे हें सांगितलेंच आहे. त्यांचा आचारविचार आपल्यापेक्षां भिन्न असल्यास, सर्व सिंहली शूद्र आहेत हें त्याचें धर्मशास्त्रीय स्पष्टीकरण होय. हिंदुस्थानांत ब्राह्मण आणि शूद्र हे दोनच वर्ण राहीले असें धर्मशास्त्रज्ञांचें मत आहे. सिंहलद्वीपांत ब्राह्मण नाहींतच त्यामुळें सर्व लोक धर्मशास्त्राच्या दृष्टीनें एक वर्णीय आहेत.
ज्या विविध जाती या समाजांत असतील त्या सर्व शूद्रांचे आणि अतिशूद्रांचे भेद आहेत, असें धर्मशास्त्रीय दृष्टीनें तेथील जातिभेदांचें स्पष्टीकरण होय. धर्मशास्त्रीय दृष्टी सोडून आतां प्रत्यक्ष वस्तुस्थितीकडे वळूं.
सिंहली लोकांतील जातिभेद — सिंहली लोकांत जातिभेद नाहीं असें मुळींच नाहीं. बुद्धाचा हेतु जातिभेद नष्ट करण्याचा नव्हता, याचें विवेचन प्रसंगानुसार येईलच. सिंहली लोकांत जातिभेद जवळजवळ आपल्याइतकाच तीव्र आहे असें म्हणण्यास हरकत नाहीं. ब्राह्मणांनीं आपल्या ग्रंथांनीं जातिभेद उत्पन्न केला हें विधान किती चुकीचें आहे हें पाहण्यास सिंहली लोकांच्या समाजस्थितींचें अवलोकन केलें म्हणजे पुरे आहे. धर्मशास्त्र तर त्या सर्वांस एकाच वर्णांत घालून त्यांची एकी अपेक्षितें. विशिष्ट जातींचें उच्चत्व आणि नीचत्व त्यांच्या अधिकारावर, संस्कृतीवर आणि त्यांनीं स्वतःच्या उद्धारार्थ केलेल्या प्रयत्नांवर अवलंबून असतें.
सिंहली लोकांत प्रामुख्यानें वागणारी व उच्च समजली जाणारी जात म्हटली म्हणजे "गोईगम" ही होय. ही जात वेल्लालांच्या बरोबरीची आहे हें तत्त्व वेल्लालांनीं आणि इतरांनीं मान्य केलें आहे. कोणत्याहि जातीला आपलें उच्चत्व स्थापन करावयाचें झालें म्हणजे त्याला कांहींतरी कारण हें शोधिलेंच पाहिजे. कारण देतांना आम्ही श्रीमंत आहों, आणि स्वच्छतेनें राहतों एवढ्याकरितां आम्हांस तुम्ही उच्च माना, एवढेंच कारण पुरत नाहीं. कांही जुन्या सर्वमान्य तत्त्वांची आणि आधुनिक परिस्थितीची सांगड घालावी लागते, काल्पनिक इतिहास उत्पन्न करावा लागतो आणि स्वतःचें उच्चत्व फार जुन्या कारणांनीं स्थापित झालें आहे असें भासवावें लागतें. "नीतिनिगंडुव" नांवाच्या सिंहली धर्मशास्त्रग्रंथांत पृथ्वीची उत्पत्ति आणि जातींची उत्पत्ति देतांना "गोवीय" उर्फ "गोईगम" जातीच्या श्रेष्ठतेचें कारण दिलें आहे तें येणेप्रमाणे :—
"सिंहलद्वीपांत ब्राह्मणादि तीन वर्ग नाहींत. गोवीय हीच उच्च जात आहे. गोवीय जातींत पूर्वीं येथें आलेल्या ब्राह्मणांनीं लग्नें केलीं आणि ब्राह्मण गोवीयांत मिसळून गेले तेणेंकरून गोवीय ही उच्च जात आहे."
आजचे गोईगम आपणांस उच्च शूद्र म्हणवून घ्यावयास तयार नाहींत हे मात्र लक्षांत ठेविलें पाहिजे.
निरनिराळ्या जातींनीं राजाबरोबर आणि उच्च जातीशीं कसें वागावें या संबंधानें जितके कठोर नियम लंकेंत होते तितके दुसरे कोठें नसतील. जातीच केवळ हलक्या होत्या असें नाहीं, तर जातींच्या अनुसार गांवांचाहि दर्जा ठरत असे. उदाहरणार्थ
गबदगाम=हें श्रेष्ठ प्रकारचें गांव होय. गबदगाम म्हणजे राजाचें गांव.
विहारगाम=विहाराच्या पोटगीसाठीं राखलेलें गांव.
गत्तुरगाम=उच्च जातीचे तथापि पतित झालेले लोक ज्या गांवांत रहातात तें गांव.
गहलगाम=नीच जातीनें वसलेलें गांव.
वेदिगाम=मृगया करणार्या लोकांचें गांव.
बतगाम=पादुआ नांवाच्या हलक्या जातीनें वसविलेले गांव.
(सिंहलद्वीपांतील वेद्ध नांवाचे लोक बहुतेक शिकार करुन उपजीविका करितात. वेद्ध, वेदिगाम, आणि व्याध शब्दांचा कांहींतरी संबंध असावा असें वाटतें.)
लंकेंत रोडिया म्हणून जात आहे. तिची स्थिती फारच वाईट आहे. ज्या कालांत रोडियांस उघडपणें रस्तावरून चालतां देखील येत नव्हतें तो काल आजच्या लोकांनीं लहानपणीं पाहिला आहे.
राजा तिसरा दापुलु यानें एक शासनग्रंथ तयार केला त्यांत रोडियाच्या सावलीनें पाणी विटाळतें असें दिलें आहें असें म्हणतात. हा ग्रंथ आमच्या अवलोकनांत आला नाहीं. सिंहली वाङ्मयाचा जर्मन इतिहासकार डॉ. गैजर याची तो नष्ट झाला असावा अशी समजूत आहे.
गोईगमांच्या खालोखाल महत्त्वाची जात म्हटली म्हणजे "करावा" म्हणजे कैवर्त उर्फ कोळ्यांची जात होय. ही जात देखील चांगली सुशिक्षित व श्रीमंत झाली आहे. गोईगमांच्यापेक्षां या जातीचें महत्व कमी असण्याचें कारण केवळ नीतिनिगंडुवांतील वाक्य नाहीं; जातींचें उच्चत्व अगर नीचत्व केवळ ग्रंथवाक्यांवर अवलंबून नसतें, तर ज्या कालांत ज्या गोष्टी अधिक सन्माननीय असतात त्या कालांत त्य़ा गोष्टी करणारांस महत्त्व प्राप्त होतें. स्पष्टीकरणार्थ एक भारतीय उदाहरण घेऊं. सारस्वत ब्राह्मण खरोखरच पाहिले असतां फार जुने ब्राह्मण आहेत. तथापि ते मत्स्याहारी असल्यामुळें महाराष्ट्रीय ब्राह्मण त्यांस स्वतःपेक्षां कमी समजतात. समुद्रमार्गानें प्रवास आपल्या देशांत कांहीं दिवस वाईट समजला जात होता, आणि तो सारस्वत ब्राह्मणांनीं स्वधर्मसंरक्षणार्थ केला. यामुळें कोचीन, त्रावणकोर इत्यादि संस्थानांत शूद्र नायर देखील त्यांस हलके लेखतात आणि त्यांस देवळांतून मज्जाव आहे. उलट उदाहरण पहावयाचें असल्यास तिनवेल्ली येथील "शेव" वेल्लालांचें पहावें. तिनवेल्ली जिल्ह्यांत कांही वेल्लालांनीं मांसाहाराचा त्याग करून अधिक उच्चपद मिळवलें आहे. लंकेत जमिनीवर ताबा असणें हें मोठ्या मानाचें आणि राजत्त्वाचें लक्षण समजलें जातें आणि त्याच्या योगानें 'गोईगम' हा शेतकरी वर्ग फार थोर समजला गेला.
लंकेंतील विवाहसंस्था :— सिंहली लोकांची आणि यूरोपियन व बर्घेर लोकांचीं लग्नें देखील होतात. निरनिराळ्या जातींच्या लग्नांचे आंकडे (खानेसुमारीच्या अहवालांवरून) येणेंप्रमाणेः-
| मिश्र लग्नांचे आंकडे | ||
| मिश्र विवाह करणार्या जाती. | १८९१ पासून १९०० | १९०१ पासून १९१० |
| यूरोपियन व बर्घेर | ११० | ९१ |
| यूरोपियन आणि सिंहली | २३ | २२ |
| यूरोपियन आणि तामिळ | ५ | १० |
| बर्घेर आणि सिंहली | २७० | ३१५ |
| बर्घेर आणि तामिळ | ५३ | ६६ |
| सिंहली आणि तामिळ | ५२७ | ६५३ |
वरील कोष्टकावरून कांहीं गोष्टी लक्षांत येतात, त्या येणेंप्रमाणेः-
यूरोपियन लोकांचीं देशी लोकांबरोबर लग्नें व त्याचप्रमाणें बर्घेर लोकांबरोबर लग्नें कमी झालीं आहेत. याला तामिळ आणि यूरोपियन हा अपवाद आहे; यांचें कारण हें कीं, कित्येक शिष्ट तामिळ मंडळींनीं यूरोपियन बायकांबरोबर लग्नें केलीं हें होय.
कोलंबोचे लग्नाचे रेजिस्ट्रार रा. विक्रमतिलक यांनां (विक्रमतिलक यांची बायको यूरेशियन आहे.) मिश्रविवाहाचें कारण विचारलें. त्यांनीं या प्रश्नाचें उत्तर येणेंप्रमाणें दिलें. गरीब यूरोपियन लोक, बर्घेर, सिंहली आणि तामिळ स्त्रियांस रखेल्या म्हणून ठेवतात आणि पुढें त्यांची लग्नें होतात. या मिश्रविवाहाची जी संतति होते त्यांपैकीं कांहीं आपल्या आयांच्या सल्ल्यानें व वजनामुळें सिंहली अगर तामिळ लोकांबरोबर लग्नें करितात. मिश्र लग्नांचें दुसरें कारण म्हटलें म्हणजे कोलंबोसारख्या बकाल वस्तीच्या शहरांत एका जातीच्या स्त्रिया आणि दुसर्या जातीचे पुरुष म्हणजे विशेषेंकरून तामिळ आणि सिंहली पुरुष आणि बर्घेर व यूरेशियन स्त्रिया यांच्या ओळखी होतात व पुढें लग्नें होतात. बर्घेर अगर सिंहली खाणावळींत तामिळ राहिल्यानें, त्या तामिळाचें, बर्घेर अगर सिंहली खाणावळवाल्याच्या मुलीशीं लग्न होतें. तामिळ मुलगा त्या मुलीशीं कांहीं गडबड करून मग पेंचांत सांपडतो व त्यास त्यामुळें लग्न करावें लागतें. अशी मिश्रविवाहांची उपपत्ति एक जाफना (यघनं) येथील तामिळ वकीलानें डॉ. केतकर यांस सांगितली. विक्रमतिलकांच्या मतें तामिळ वकिलाचें हें स्पष्टीकरण फारच थोड्या वर्गास अनुलक्षून आहे.
एका सिंहली तरुणाचें एका बर्घेर मुलीबरोबर प्रेमसंवर्घन चालल्याचें डॉ. केतकर यांस दिसून आलें. त्या तरूणास सिंहली लोक बर्घेर मुलीबरोबर लग्न कां करितात असा प्रश्न त्यांनीं विचारला असतां त्यांस त्यांने उत्तर दिलें कीं, वेडगळ सिंहली मुलीस "सोसायटी" मध्यें कसें वागावें हें समजत नाहीं. आम्ही गोर्या कातड्याला भुलून जातों असें मुळींच नाही !!! या तरुणाच्या शब्दांत सत्याता किती आहे याची येथें चर्चा नको. त्यानें सांगितलेली अडचण परजातीच्या स्त्रीशीं लग्न करण्यास कारण नसली तरी त्याच्या बोलण्यावरून तरुणांचें विजातीयांबरोबर लग्न होण्याचें निमित्त कांही अंशीं लक्षांत येईल.
सिंहलद्वीपांतील कांही बर्घेर जातीच्या सरकारी नोकरांस डॉ. केतकर यांनीं विचारलें कीं, सिंहली आणि तामिळ लोकांनीं तुमच्या मुलींबरोबर लग्न करावें हें तुम्हांस आवडतें काय ? त्यांनीं उत्तर केलें, काय हरकत आहे ? जर सिंहली मुलगा सुशिक्षित असेल, त्याला चांगली नोकरी असेल, तर त्याला मुलगी द्यायला काय हरकत आहे ? या उत्तरावरून बर्घेर लोकांची वैवाहिक नीति लक्षांत येईल.
सिंहलद्वीपांत बालविवाह फारसा नाहींच म्हटलें तरी चालेल. तामिळ व सिंहली या दोन्ही लोकांविषयीं हें विधान केलें आहे. खालील आंकड्यांवरून ही गोष्ट लक्षांत येईल.
| विसांपेक्षां कमी वयाच्या विवाहित स्त्रिया. | ||
| खानेसुमारी वर्ष १९०१ | खानेसुमारी वर्ष १९११ | |
| लग्न झालेल्या | लग्न झालेल्या | |
| १५ पेक्षां कमी वयाच्या एक हजार स्त्रियांपैकीं | १३ | ६ |
| १५ पेक्षां अधिक परंतु २० पेक्षां कमी वयाच्या एक हजार स्त्रियांपैकी. | ५०३ | ३२६ |
या आंकड्यांवरून असें दिसून येईल कीं, आज पंधरा पासून वीस वर्षांच्या वयाच्या स्त्रियांपैकी दोन तृतीयांश अविवाहीत आहेत.
स्त्रिया इतक्या वर्षांपर्यंत अविवाहित रहातात त्यावरून परंपरागत विवाहपद्धती म्हणजे पालकांनीं लग्नें जमवून द्यावयांची आणि लग्न करणारांनीं आपली नुसती संमति द्यावयाची ही पद्धति नष्ट झाली नाहीं. वर जे मिश्रविवाह सांगितले ते अर्थात् वधूवरांच्या स्वयंप्रेरणेनें आणि प्रसंगीं गुरूजनांच्या मताविरुद्धच होतात. लग्नांमध्यें पुरूष आपली इच्छा अधिक चालवूं शकतो. त्याला मुलीकरीतां तिच्या पालकाकडे मागणी करतां येते व क्वचित् प्रंसगीं तरुणीची आराधना स्वतः करण्याचा अनुभव त्याला मिळतो. तथापि अनुनयपद्धति या देशांत अजून विकास पावली नाहीं. पुष्कळ लग्नें अशीं होतात कीं लग्न ठरण्याच्या अगोदर वधूनें वरास पाहिलेलेंहि नसतें.
पुनरूज्जीवक चळवळ — परकीय संस्कृतीनें मनुष्य कितीहि पछाडला गेला असला तरी स्वकीयतेचें बीज त्याच्या अंतःकरणांतून जाणार नाहीं असें दिसतें. शासनविषयक नवीन परिस्थितीमुळें त्यानें बाह्यांसारखें कितीहि आचरण केलें तरी त्याच्या अंतःकरणांतील स्वकीय संस्कृतीनुसार आचरण करण्याची भूक नष्ट होत नाहीं. अमेरिकन इंडियन गोर्या लोकांच्या वस्तींत जाऊन राहतो, त्यांच्यांत वाढतो, कधीं गोर्यांचें उच्च शिक्षणहि त्यास मिळतें, पण फिरून काय ? त्यास नवीन घेतलेल्या संस्कृतीचें ओझें वाटूं लागतें आणि सुधारलेला पोषाख टाकून देऊन पुन्हा घोंगडीकडे, पिसांकडे आणि रंगाकडे त्याचें मन धांव घेतें अशीं उदाहरणें अमेरिकन लोकांच्या किती तरी प्रत्ययास येत आहेत. ज्याप्रमाणें व्यक्तीची ही गोष्ट आहे त्याप्रमाणें अनेक व्यक्तींचा समूह जें राष्ट्र त्याचीहि गोष्ट आहे. धर्मांतराचीं कराणें पुष्कळ प्रसंगीं कृत्रिमतेचा कंटाळा आणि साधेपणाची आवड हीं असतात. ही गोष्ट दुसर्या लोकांच्या संस्कतीच्या दडपणाखालीं ओरडणार्या जित लोकांसंबंधानेंच तेवढी खरी आहे असें नाहीं; ही वृत्ति अत्यंत स्वतंत्र आणि प्रबल लोकांमध्येंहि दृष्टीस पडते. पैतृक "साधेपणा" आणि अर्वाचीन "कृत्रिमता" यांचा झगडा चाललेला सर्व देशांत दृष्टीस पडतो. पुष्कळांस जुन्या चालींचा रानटीपणा भासूं लागतो आणि कांहीं तरी फरक केला पाहिजे असें वाटूं लागतें; आणि पूर्वींपेक्षां कांहीं तरी अधिक कृत्रिमता समाजास येते. पुढें कालांतरानें कृत्रिमतेचा कंटाळा येऊन मूळ स्थितीकडे धांव घ्यावी असें पुष्कळांस वाटूं लागतें, तथापि या आरोहावरोहामध्यें समाजाची प्रगतिच होते. नवीन कृत्रिमता घेतांना आवश्यक गोष्टींबरोबर कांहीं अनवश्यक गोष्टी देखील लोक घेतात; त्या अनवश्यक गोष्टी झाडून काढावयाच्या असतात. यूरोपांत व अमेरिकेंत "पैतृक साधेपणा"कडे कशी प्रवृत्ति होत चालली आहे हें दाखविण्यासाठीं कांही उदाहरणें घेतों. आजचा पुरूषांचा पोषाख शंभर वर्षांपूर्वींच्या पुरुषांच्या पोषाखापेक्षां पुष्कळच साधा झाला आहे. स्त्रियांनीं कारसेट * वापरूं नये म्हणून खटपट चालू आहे. यूरोपियन स्त्रीपुरुषें पोषाखांत अगदीं लहान वयापासून मढविलीं असतात ही गोष्ट फार वाईट आहे, नग्नता फारशी अयोग्य नाहीं, स्त्रीपुरुषांचें एकमेंकांच्या नग्नस्वरूपानें कामोद्दीपन होतें, ह्यासाठीं नग्नता निदान लहानपणीं लोकांस अधिक परिचित झाली पाहिजे, इत्यादी विचार स्त्रीपुरुषसंबंधशास्त्रज्ञ (sexual scientists) व्यक्त करीत आहेत.* परकीय आचारांच्या ग्रहणामध्यें आपण राज्यकर्त्यांशीं सदृश व्हावें ही एक बुद्धि असते आणि रानटीपणा टाकून आपण सुधारावें ही दुसरी बुद्धि असतें. त्याप्रमाणेंच जुन्या चालीकडे परत फिरा असा उपदेश करणार्यांमध्यें दोन तर्हेचे लोक असतात. एक तर परंपरेचे अभिमानी आणि दुसरे म्हटले म्हणजे साधेपणाचे चहाते. कोणत्याहि राष्ट्रांत परकीयांचें गुलामांसारखें अनुकरण करणें बंद व्हावयास एक गोष्ट अवश्य आहे, आणि ती म्हटली म्हणजे परकीयांशीं सादृश्य ठेवणाराला अधिक फायदा होण्याचा बंद झाला पाहीजे. जर हिंदु पोषाख करणार्याला सरकारी अधिकारी आणि रेल्वे इत्यादि सार्वजनिक सेवकसंस्था तुच्छतेनें वागवितील तर परकीय तर्हेचा पोषाख करण्याची प्रवृत्ति अबाधित राहिल. तथापि जनतेचा उत्कर्ष होऊं लागला आणि राज्यकर्त्याशीं सदृश्य अशा पोषाखाचें महत्त्व उरलें नाहीं म्हणजे आत्मभौम पोषाखास आणि रीतिरिवाजांस महत्त्व येऊं लागतें.
सिलोनमध्यें परंपरागत संस्कृतीचा अभिमान धरून तिचें पुनरुज्जीवन करणें हा ज्यांचा हेतु आहे ते लोक आपणास सुधारक म्हणवितात. त्यांनीं Social Reform S0ciety (समाजसुधारक संस्था) म्हणून एक संस्था काढली आहे. या सोशल रिफार्म सोसायटीमध्यें प्रमुख मंडळी म्हटली म्हणजे एल. डब्यू. ए. डी. सोयसा. डोनाल्ड ओभे (अभय) शेखर, आणि पाल पेरिस ही होत. या सोसायटीनें खालील गोष्टींकडे विशेष लक्ष दिलें आहे.
१. हिंदी पद्धतीच्या पोषाखाचा प्रसार करणें.
२. जुने सण आणि उत्सव यांचें पुनरुज्जीवन करणें.
३. सिंहलद्वीपाच्या इतिहासार्थ प्रयत्न करणें.
४. हिंदी तर्हेच्या वैद्यकाचा उद्धार करणे.
सोशल रिफार्म सोसायटीच्या कामास एक दोन बाबतींत यश आलें आहे. स्त्रियांनीं युरोपीय तर्हेचा पोषाख टाकून देऊन हिंदी तर्हेचा पोषाख करावयास सुरुवात केली आहे. या बाबतींत डॉन क्यारोलिस हेवावितारण या कुटुंबांतील प्रसिद्ध लेखक धर्मपाल यांनीं पुढाकार घेतला आहे. धर्मपाल हे बराच काल हिंदुस्थानांत घालवितात. धर्मपालांनीं यूरोप, अमेरिका येथें प्रवास केला आहे; आणि त्यांचें नांव बोस्टन येथें कांही वर्गांत ऐकूं येतें. धर्मपाल यांनीं हिंदुस्थानी पद्धतीचा पोषाख सिलोनमध्यें नेला असें म्हणण्यास हरकत नाहीं. या बाबतींत त्यांस साहाय्यकर्त्या दोन स्त्रिया होत्या. एक तर त्यांचीच आई मल्लिका हेवावितारण ही होय, आणि या कार्यास हातभार लावणारी त्यांच्या कुटुंबाबाहेरची मुख्य एक बाई म्हटली म्हणजे मिसेस वीरकोणहामिनी ही होय.
चळवळी आणि वाङ्मय :— धर्मपाल हे दांडगे लेखक आहेत. त्यांच्या घराण्यानें "सिंहलबौद्ध" नावांचें एक पत्र चालविलें आहे. या पत्राचा खप सुमारें साडेसहा हजार आहे. हें आठवड्यांतून दोनदा प्रसिद्ध होतें.
धर्मपालांच्या लेखांस आक्षेपक पुष्कळ आहेत. कांहीं आक्षेपकांनीं यांच्या लेखांचें येणेंप्रमाणें वर्णन केलें. "यांच्या लेखांत आवेशाची जोरदार भाषा असते, तथापि त्यांच्या लेखांत तार्किकता आणि युक्तिवाद नसतो. शिवाय एका विषयावर सुसंगतपणें न लिहितां एका विषयावरून दुसर्या विषयावर उड्डाण करण्याची धर्मपालांस फार खोड आहे. धर्मपालाच्या लेखांत कधीं विविधता आणि कधीं चर्वितचर्वण यांची एकच भेसळ सांपडेल."
पुरातन संस्कृतीचा अभिमान धरणार्या लोकांत जॉन डी. सिलव्हा यांची गणना केली पाहिजे. लोकप्रिय नाटककार म्हणून यांचा लौकिक चांगला आहे. यांच्या नाटकांतील पदांचे नादलेख (रेकार्डस्) जागोजाग आढळतात. सामाजिक सुधारणेसंबंधाचें यांचें कार्य म्हटलें म्हणजे "सिंहलपराभव नाटक" होय. या नाटकांत राष्ट्रीय संस्कृतीचा कसा नाश होत आहे हें दाखविलें आहे आणि तो नाश थांबविण्यासाठीं खटपट करण्याकरितां प्रेक्षकांचें मन वळविण्याचा यत्न केला आहे.
हिंदु तर्हेचा पोषाख करण्याची फ्याशन दिवसानुदिवस वाढत आहे; आणि तेथील सुधारक वर्गास याबद्दल बरेंच श्रेय दिलें पाहिजे. सिंहलद्वीपांतील सुधारक वर्गास आपल्याकडील सुधारक वर्गासंबंधानें फारशी माहिती नाहीं. आणि ज्यांनां ज्यांनां माहिती आहे त्यांनां आपल्या सुधारक वर्गाविषयीं आदरबुद्धि नाहीं. ब्रह्मसमाजासारख्या संस्थांवर लंकेंतील सुधारक मंडळी तडाके हाणण्यास कमी करीत नाहीं.
लंकेंतील सुधारक मंडळीचें आणखी एक कार्य म्हटलें म्हणजे, यूरोपियन नांवें टाकून देऊन संस्कृत नांवांचा प्रचार करण्याविषयीं खटपट करणें हें होय. तसेंच आणखी एक कार्य हिंदी कलेचें पुनरुज्जीवन करणें हें होय. पोर्तुगीज लोकांच्या सहवासाने यूरोपियन संगीत लंकेंत शिरलें. आतां हिंदी संगीताकडे लक्ष घालून त्याचा प्रसार करण्याकडे अतिशय जोराची प्रवृत्ति झाली आहे.
राष्ट्रीय पुनरुज्जीवनार्थ खटपट करणार्यांमध्यें बौद्ध व तसेच ख्रिस्ती लोकहि आहेत. दुसरी गोष्ट म्हटली म्हणजे यूरोपांत जाऊन परत आलेले लोक राष्ट्रीय संस्कृतीच्या उद्धारार्थ जितके उत्साही झाले आहेत तितके देशांतच अडकून राहिलेले जुन्या पिढीचे सिंहली झाले नाहींत.
पुनरुज्जीवन चळवळींत प्रामुख्यानें खटपट करणार्यांमध्यें डॉ. आनंदकुमारस्वामी यांचा उल्लेख केला पाहिजे. डॉ. कुमारस्वामी हें रक्तानें पूर्णपणें हिंदी देखील नाहींत. यांची आई इंग्रज आहे. तथापि हिंदी संस्कृतीचा अभिमान यांनां जितका आहे तितका थोडक्यांसच असेल.
सिंहली समाजांत बौद्ध, प्राटेस्टंट ख्रिस्ती, आणि क्याथोलिक ख्रिस्ती असें तीन मुख्यत्वानें भेद करितां येतील. या प्रत्येक संप्रदायानें आपापलीं वर्तमानपत्रें चालविलीं आहेत; आणि प्रत्येक पत्राचा हेतु आपल्या संप्रदायाचा प्रसार करण्याचा आहे असें दिसतें. सिंहली भाषांतून जीं पत्रें चालविलीं जातात त्यांचा देशाच्या शासनसूत्रावर परिणाम फारसा होत नाहीं. इंग्रजी पत्रें शासनावर परिणाम घडवितात; त्या पत्रांतून धार्मिक विषयाची चर्चा क्वचितच होते. ती चर्चा करणें देशी भाषांतील पत्रांचें प्रधान कर्तव्य झालें आहे. सिंहलद्वीपांत प्रौढविवाह, विधवाविवाह, स्त्रीशिक्षण इत्यादि गोष्टींवर चर्चा होणें शक्य नाहीं. कारण, तेथें या तिन्ही गोष्टी केव्हांच स्थापन झाल्या आहेत. स्त्रियांनीं जाकिटें कां वापरूं नयेत यासारख्या महत्त्वाच्या गोष्टींवरहि चर्चा होणें शक्य नाहीं. कारण, जाकिटेंच काय, पण सुधारक पक्षास न मिळालेल्या बायका कॉरसेट देखील वापरतात. मांसाहाराचा पक्ष घेऊन देखील भांडतां येणार नाहीं. कारण गाईचें, डुकरांचें आणि बोकडाचें मांस सर्वचजण खातात. ब्राह्मणांस शिव्या देण्यासहि तेथें अवकाश नाहीं. कारण तेथें ब्राह्मण मुळींच नाहींत.
सिंहल देशाची उपर्युक्त स्थिति असल्यामुळें तेथील पत्रकारांचे मोठे हाल होत असतील असें जर आपणांस वाटत असेल तर तो आपला गैरसमज आहे. तेथील देशी भाषांतील पत्रांचें एक मुख्य काम म्हटलें म्हणजे धार्मिक विषयांची चर्चा करणें हें होय.
निरनिराळ्या पक्षांचीं पत्रें आहेत त्यांची नांवें आणि पक्षवृत्ति दिल्यास वाचकांस समजण्यास सुलभ जाईल.
१. सिंहलबौद्ध :— हें आठवड्यांतून दोनदां प्रसिद्ध होतें. या पत्राची वृत्ति मूलसंस्कृतीची जोपासना करण्यास लोकांस प्रवृत्त करणें ही होय. बौद्धसंप्रदायाचा पक्ष घेऊन भांडणें व त्याचा प्रसार करणें हें या पत्राचें ध्येय आहे.
२. संदरेस :— (चंद्ररश्मि) हें पत्र थिआसाफिस्टांच्या प्रामुख्याखालीं अवतीर्ण झालें. या पत्राचे संपादक आपणांस बौद्धधर्माचे अभिमानी म्हणवितात, आणि "सध्यां थिआसफीच्या मताचा प्रसार करण्याचें काम आमचें नाहीं" असें सांगतात. "सिंहलबौद्धापेक्षां आमची पालिसी उर्फ व्यवहारनीति थोडीशी निराळी आहे" असेंहि बोलतात. सिंहलबौद्ध फारच एकांगी आहे असें या पत्राच्या संपादकांस वाटतें. हें पत्र आठवड्यांतून दोनदां प्रसिद्ध होतें.
३. सिंहलजातीय :— हें साप्ताहिक पत्र वारंवार संदरेस पत्रावर टीका करितें. संपादक आपणांस बौद्ध म्हणवितो. तो कादंबरीकार म्हणून प्रख्यात आहे.
४. ज्ञानप्रदीप :— हें क्याथोलिक संप्रदायाचें समर्थन करणारें पत्र आहे.
५. रविकिरण :— हें प्राटेस्टंट ख्रिस्त्याचें समर्थन करणारें आहे. सिंहली संस्कृतीवर हें पत्र तीक्ष्ण टीका करितें.
६. लकमिन् :— (लंकामाणिक्य) हें दैंनिक पत्र ख्रिस्ती मंडळी प्रसिद्ध करिते. पारमार्थिक संप्रदायांच्या बाबतींत याची तटस्थवृत्ति आहे असें त्या पत्राचे चालक सांगतात. तथापि बौद्धांचें असें मत आहे कीं, हें पत्र अंतःस्थपणें बौद्धांच्या विरुद्ध आहे.
७. दिनकरप्रकाश हीं दोन दैनिकें बौद्धानींच चालविलीं आहेत; तथापी धार्मिक विषयांत जितकें
८. दिनकरतापवृत्ति मन घालावें तितकें हीं घालीत नाहींत, असा या पत्रांविरुद्ध आक्षेप आहे.
९. दिनमिन :— ह्या पत्रानें दैनिक स्वरूप नुकतेंच स्वीकारलें आहे. संदरेस पत्राप्रमाणेंच याचें धोरण राहील असें दिसतें. कारण संदरेस पत्राच्या संपादकवर्गापैकीं कांहीं मंडळी तिकडे गेली आहे.
१०. सिंहलसमे (समय) :— हें बौद्ध पत्र आहे.
संस्कृतीचें वाग्युद्ध वर्तमानपत्रांतूनच होतें असें नाहीं; कांदबर्यांतून प्रत्येकास प्रिय असलेलीं मतें बाहेर पडतात.
कांदबरीकारांमध्यें एम्.सी.एफ्.परेरा, सायमन सिल्व्हा, पी.शिरीसेन, इत्यादिकांचीं नांवें सर्व लोकांस अवगत आहेत. परेराच्या कादंबर्यांत "मगे करुमि" (माझें कर्म) ही कांदबरी लोकप्रिय आहे. यांत सिंहली समाजाचे दोष दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. सायमन् सिल्व्हा याच्या कादंबर्यांत 'मीना,' 'तेरीझा,' आणि 'अपेआगम' या कादंबर्या प्रसिद्ध आहेत. 'तेरीझा' ही कादंबरी लोकांस बिघडविण्याकरितां आणि हलक्या लोकांचा आश्रय मिळविण्याकरीतां लिहिली आहे, असा त्या कांदबरीवर लोकांचा आक्षेप आहे. या कादंबरींत लग्ननिर्बंधच नसावा आणि वाटेल त्या मनुष्यानें वाटेल त्या स्त्रीवर प्रेम करावें हे मत उपदेशिलें आहे. 'अपेआगम' या कादंबरींत बौद्धभिक्षूंवर झोड उडविली आहे.
पी. शिरिसेन (सिंहलजातीपत्राचा संपादक) याच्या तीन कांदबर्या प्रसिद्ध आहेत. त्या (१) "रोसलिन्", (२) "सहजयतिस्स" आणि (३) "अपटवेच्चदि" या होत. "सहजयतिस्स" या कादंबरीवर पुष्कळ लोकांचा आक्षेप आहे, आणि याचें कारण त्या कादंबरींत तरुणी आपल्या प्रेमपात्राबरोबर चोरून पत्रव्यवहार कसा करीत आहेत हें दाखविलें आहे. या कादंबरींतील लिहिणें तरुणींस सूचक होईल असें कांहीं पत्रकारांस वाटल्यामुळें त्यांनीं त्या कादंबरीचा निषेध केला आहे.
शिरिसेन याच्या "अपटवेच्चदि" (आम्हांस काय झालें आहे ?) या कादंबरींत समाजावर व त्यांतील व्यंगांवर पुष्कळ टीका आली आहे असें म्हणतात. या कादंबरीचा गोषवारा आम्हांस मिळाला नाहीं.
या कादंबर्यांचा निर्देश करण्यांत आमचा हेतु एवढाच कीं, समाजविषयक मतांचा वारा कोणत्या दिशेनें वहात आहे हें दाखवावयाचें. बौद्ध संप्रदायाचे लोक आपल्या समाजाचें निरिक्षण करून त्यांतील दोषांचें कादंबरीरूपानें आविष्करण करावयास लागले आहेत, व त्याप्रमाणेंच नवीं मतें
कादंबर्यांच्या द्वारानें लोकांच्या दारावर आपटत आहेत हेंहि दिसून येईल.
देशाच्या संस्कृतींत दोन तर्हेनें फरक होत असतो. एक तर परकीय संस्कृति देशांतील लोकांस आपल्याकडे ओढावयास पहाते आणि मूळ समाजघटना हाणून पाडण्याचा प्रयत्न करिते; अगर एखाद्या विशिष्ट समाजाच्या अंतर्भागांतच खळबळ सुरू होऊन समाजाचे विचार आणि आचार बदलूं लागतात. निरनिराळे पारमार्थिक संप्रदाय एकमेकांशीं झगडत असतां एकमेकांचीं उणीं काढावयाचा प्रयत्न करितात. एक संप्रदाय दुसर्या संप्रदायाचीं उणीं बाहेर काढतो, तेव्हां त्याचा हेतु, स्पर्धा करणार्या संप्रदायास लोकांनीं सोडून जावें हा असतो. तथापि मनुष्य स्वसंप्रदायाचींच उणीं काढूं लागला तर त्याचा हेतु आपल्या संप्रदायांतील दोष नष्ट होऊन संप्रदाय बलाढ्य व्हावा हाच असतो. कधीं कधीं परकीय धक्क्यामुळेंच अंतःस्थ सुधारणेस प्रारंभ होतो. बौद्ध संप्रदायास आणि परंपरागत रीतीतस आंतून आणि बाहेरून कसे धक्के मिळत आहेत हें पूर्वोक्त विवेचनावरून लक्षांत येईल.
राजकीय चळवळी आणि तेथील पक्षभेद :— या देशांत राजकीच चळवळी होतात; आणि थोडाबहुत पक्षभेद देखील आहे. तथापि जो पक्षभेद आढळतो तो बहुतांशीं व्यक्तिविषयक आहे. येथें सिंहली, तामिळ आणि बर्घेर या तिन्ही जातींस सरकार अगदीं सारख्या तर्हेनें वागवितें; आणि त्यामुळें बर्घेर लोक तद्देशीय हे दोघेहि एकदिलानें कामें करितात. अलीकडे मात्र बर्घेर स्वजातीस सरकारनें अधिक पसंत करावें म्हणून खटपट करीत आहेत, असा कित्येकांचा आक्षेप आहे.
सिलोनमध्यें शिक्षण अधिक असल्यामुळें सार्वजनिक प्रश्नांसंबंधानें सिलोनमध्यें अधिक जागृति आहे. कोलंबोची लोकसंख्या थोडी आहे, तथापि तेथें पांच इंग्रजी भाषेंत चालविलेलीं दैनिकें आहेत. तीं येणेंप्रमाणे :—
(१) टाईम्स ऑफ सिलोन (आंग्लो सिलोनीज * )
(२) ऑबझरव्हर (आंग्लो सिलोनीज)
(३) इंडिपेंडट (बर्घेर)
(४) मार्निंग लीडर (देशी, संपादक हिंदुस्थानीय ख्रिस्ती आहे. हा गृहस्थ सिलोनचा टिळक बनला आहे. याचें नांव "आरमंड डिसोझा" हें होय. सिलोनमध्यें जे कांहीं अन्यायी न्यायाधीश होते त्यांच्यावर तो कडक टीका करी, आणि यामुळें यास कोर्टाच्या बेअदबीबद्दल तुरुंगांत जावें लागलें. हा तरुंगांत गेल्यानंतर याला सोडून द्यावें अशा आशयाचा अर्ज गव्हर्नरकडे प्रमुख मंडळींकडून गेला आणि गव्हर्नरनें त्याची मुक्तता केली. डिसोझा यांनीं "माझें कुल ब्राह्मणाचें आहे" असें डॉ. केतकर यांस सांगितलें).
(५) सिलोनीज (हें पत्र सिंहली मनुष्यानें चालविलें आहे. 'लोकांच्या अंतःकरणाचें प्रतिबिंब आमच्या पत्रांत जितकें पडतें तितकें मार्निंग लीडरमध्यें पडत नाहीं,' असा अभिमान या पत्राच्या संपादकामध्ये आहे असें दिसून आलें).
सिलोनमध्यें कांहीं वर्तमानपत्रकारांचीं गांठ पडली, म्हणजे त्यांनां कांहीं तत्त्वें उपदेशिण्याचा डॉ. केतकर प्रयत्न करीत असत तीं तत्त्वें येणेंप्रमाणे :—
(१) सिलोनजे भाषेनुसार राजकीय भाग पाडावेत.
(२) त्या प्रत्येक भागांत स्वभाषेमार्फत सर्व व्यवहार चालावा. सर्व सरकारी खात्यांनीं देशी भाषाच वापरावी.
(३) सर्व प्रकारचें उच्चशिक्षण देशी भाषेंतूनच द्यावें.
(४) देशाच्या उन्नतीसाठीं आणि देश हा राष्ट्र बनण्यासाठी देशांत राज्यतंत्रावर परिणाम घडविणारा अभिजातवर्ग (Aristocracy) उत्पन्न होणें अवश्य आहे. तसा वर्ग उत्पन्न झाल्याशिवाय राष्ट्रीकरण होणें शक्य नाहीं. हा अभिजातवर्ग देशांतूनच उत्पन्न झाला पाहिजे. इंग्रज हा सिंहलामध्यें अभिजात बनतां कामा नये; आणि देशी अभिजातवर्ग उत्पन्न करावयाचा असल्यास, देशी भाषांस महत्त्वास आणलें पाहिजे.
या कल्पनांचें स्वागत निरनिराळ्या पत्रांकडून कसें काय झालें हें लिहितों. त्यावरून पत्रांची वृत्ति कळून येईल.
जाफना येथील तामिळांचें अत्यंत प्रमुख पत्र म्हटलें म्हणजे "सिलोन पेट्रिअट". या पत्राचे संपादक कनकरत्न यांस या कल्पना फारच पसंत पडल्या आणि त्यांच्या मनांत जाफना येथें एक चांगलें तामिळ दैनिक काढावें असें आहे असें ते म्हणाले.
कोलंबो येथील सिंहली भाषेंत पत्र चालविणार्या पत्रकारांपैकीं "सिंहलबौद्ध" आणि "संदरेस" या पत्रकारांमध्यें या कल्पनांसंबंधानें अनुकूलता दिसली.
"दि सिलोनीज" या पत्राचे संपादक ओ. ई. मार्टिनस यांस या सर्व कल्पना पसंत पडल्या आणि "या कल्पनांचा प्रसार करण्यास मी शक्य तेवढा प्रयत्न करीन" असें त्यांनीं कबूल केलें.
"मॉर्निंग लीडर" या पत्राचे संपादक मि. डिसोझा यांचें मत "सिंहली भाषेस उत्तेजन देऊं नये, तसें उत्तेजन दिल्यास प्रगति मात्र बंद होईल; पण काय करावें ? अलीकडे सरकार सिलोनी भाषेस उत्तेजन देऊन देशाची प्रगति बंद करण्याचा यत्न करीत आहे" अशा प्रकारचें आहे.
या पूर्वगत विवेचनावरून सिलोनांतील सध्यांच्या पक्षांसंबंधानें आणि देशी संस्कृतीचा पुनरुद्धार करणें हा जो पुढें मोठा राजकीय प्रश्न होणार, त्याविषयीं सिलोनमध्यें वृत्ति कशा प्रकारची राहील, यासंबंधानें कांही कल्पना वाचकांस येईल.
सिंहली समाजाचें अवलोकन केलें असतां आपणांपेक्षां तो कोणत्या बाबतींत अधिक प्रगत दिसतो याचें मापन करूं.
१. एक गोष्ट म्हटली म्हणजे तेथील सांपत्तिक स्थिति. मजुरीचे दर सिंहलद्वीपांत हिंदुस्थानापेक्षां अधिक आहेत; आणि तेथील मजुरांचें खाणें देखील आपल्याकडील मजुरांपेक्षां अधिक किंमतीचें असतें.
२. तेथें शिक्षण आणि यूरोपियन सुधारणा अधिक आहे, आणि सार्वजनिक चळवळींत लोक अधिक मन घालतात.
३. ज्या सामाजिक सुधारणा हिंदुस्थानांतील सुधारक घडवून आणण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्या सुधारणा केव्हांच पार पाडल्या आहेत. प्रीतिविवाह तेथें अजून सुरू झाला नाहीं आणि त्याचें कारण राजकीय आहे. राजकीय प्रगति झाल्याशिवाय प्रीतिविवाह जोरानें सुरू होणार नाहीं, आणि झाल्यास त्याचे परिणाम योग्य होणार नाहींत.
४. तेथें शिक्षण अधिक झाल्यामुळें देशी भाषेंतील वाङ्मय आतां आपल्या देशापेक्षां अधिक जोरानें वाढूं लागलें आहे.
५. ख्रिस्ती आणि बौद्ध हा भेद फारच कमी आहे; आणि तेणेकरून देशांतील निरनिराळ्या वर्गांच्या ठायीं एकप्रकारचा सामान्य देशाभिमान, आणि सामान्य शासनविषयक वृत्ति उत्पन्न झाली आहे. सिंहली भाषेचे जे आग्रही प्रवर्तक आहेत त्यांत ख्रिस्ती लोकांची संख्या अधिक आहे. तामिळ हिंदू, आणि तामिळ ख्रिस्ती यासंबंधानें हेंच विधान लागू पडेल.
६. वर्तमानपत्रें वाचण्याची इच्छा लोकांत अधिक आहे. सत्तावीस लाख सिंहली लोकांचें नियतकालिक सारस्वत आणि आपल्या दोन कोटी महाराष्ट्रीयांचें नियतकालिक सारस्वत यांची तुलना केल्यास फरक सहजच दिसून येणार आहे.
७. ख्रिस्ती आणि इतर बाह्य लोकांस हिंदू बनविण्याची शक्ति हिंदू तामिळांत वाढली आहे.
खरोखर पहातां सिंहली लोकांची प्रगति आपणांपेक्षां अधिक झाली आहे. तथापि त्यांची प्रगति आपणांपेक्षां अधिक झाली असेल अशी आपणांस कल्पना नाहीं आणि त्यांसहि नाहीं. हिंदुस्थानाकडे पैतृकभूमि म्हणून, शिवाय आपल्या परंपरागत संस्कृतीचें आगर म्हणून आदरबुद्धीनें पहाण्याची त्यांस संवय झाली आहे. आपणांविषयीं आदरबुद्धि उत्पन्न करणारी आणखी एक गोष्ट म्हटली म्हणजे आपल्याकडील लोकांचीं नावें त्यांच्या कानीं जातात आणि "डोंगर दुरुनी दिसे साजरा" या न्यायानें आपल्यांतील शिष्ट लोक त्यांस फारच थोर वाटतात. शिवाय सिलोनमध्यें युनव्हर्सिटी नाहीं आणि आपल्याकडे युनुव्हर्सिट्या असल्यामुळें बी. ए., एम्. ए., पुष्कळ आहेत; आणि त्यांच्याकडे पदवीधरांचा भरणा कमी आहे. जे आहेत ते एक तर पूर्वकालीं शिकून गेल्यांपैकीं आहेत, अगर इंग्लंडांत जाऊन आल्यांपैकीं आहेत. यामुळें हिंदुस्थान हा विद्वानांचा देश आहे असा त्यांचा वृथा समज झाला आहे. शिवाय आपल्याकडे विद्वान् जरी थोडे आहेत तरी प्रत्येक ठिकाणचे कांहीं मिळून पुष्कळ होतात आणि ह्याचा त्यांच्या मनावर संयुक्त संस्कार होतो. शिवाय स्वदेशी चळवळीच्या बातम्यांमुळें आमच्या देशांतील लोक विलक्षण तर्हेनें जागृत झाले आहेत, कदाचित् हिंदुस्थानांत राज्यक्रांति देखील होईल आणि हिंदुस्थानी रक्तास अधिक महत्त्व येईल, अशा कल्पना देखील त्यांच्या मनांत चोरून मारून उद्भवतात. असो.
सिंहलविषयक ज्ञानाचें मोठें वैगुण्य म्हटलें म्हणजे उदराटांविषयीं असलेलें अज्ञान होय. तामिळ आणि सिंहली पातराट यांच्यामध्यें स्पर्धावृत्ति आहे हें दिसून येतें. तथापि उदराट आणि पातराट यांची परस्परांसंबंधीं वृत्ति कशी काय आहे याची कल्पना नाहीं. तामिळ आणि सिंहली लोकांच्या स्पर्धेंत एक गोष्ट दिसून आली. ती ही कीं, सध्यां नोकरीकरितां जी धडपड आहे त्या बाबतींतच केवळ स्पर्धा आहे असें नाहीं, तर ही स्पर्धा फार पूर्वकालापासून चालत आहे आणि आजची स्पर्धा पूर्वस्पर्धेची केवळ पुनरावृत्ति आहे. या गोष्टीमुळें पुष्कळ लोकांची अशी इच्छा आहे कीं, सिलोनचा इतिहास शाळांतून शिकवूंच नये; कारण, त्याच्या योगानें व्दैत अधिक होईल. पाठीमागच्या इतिहासासंबंधानें वादविवाद करितांना देखील गरमपणा दिसून येतो. उदाहरणार्थ, एकच गोष्ट देतोः अनुराधपूर हें सिलोनमध्यें प्राचीन संस्कृतीचें शहर होतें. येथें प्रचंड अवशेष सांपडतात आणि या शहरांस एका काळीं दीडदोन लाख वस्ती असावी असा अजमास होतो. या शहराचें नांव "अनुराधपूर" आहे असें सिंहली म्हणतात. तामिळ म्हणतात, येथें एका काळीं पन्नास तामिळ राजपुत्र राज्य करीत होते आणि म्हणून अनुराजपूर हें नांव पडलें आहे. सिंहली म्हणतात, "अनुराधा" नांवाच्या सिंहली महाराज्ञीच्या नावांवरून हें नांव या गांवास मिळालें. बौद्ध अवशेषांकडे नजर फेंकली असतां आणि सध्यां सिंहली लोक बौद्ध संप्रदायाचे आहेत ही गोष्ट लक्षांत घेतली असतां हें शहर सिंहली लोकांनीं वसविलें असावें असें मत होतें. तामिळ उत्तर करितात कीं, "ब्राह्मण लोक इकडे येण्यापूर्वीं आम्ही देखील बौद्धच होतों; तथापि ब्राह्मणांनीं "आगम" आणून आम्हांस नास्तिक्यांतून सोडविलें."
या सर्व वादविवादांत ऐतिहासिक अंश काय असेल तो असो. एवढी गोष्ट मात्र खरी कीं, तामिळ आणि सिंहली या दोन्ही राष्ट्रांत परस्परांविषयीं स्पर्धा आणि क्रोध हीं बरींच आहेत. उदराट आणि पातराट यांच्यामध्यें परस्परांविषयीं कांहीं निश्चित वृत्ति आहे कीं काय समजलें नाहीं.
सिलोनमधील मजूर :— यूरोपीय लोकांच्या मळ्यांवर काम करणारी हिंदु वस्ती जवळजवळ पांच लाख आहे. या वस्तीचें जीवनचरित्र चांगलें अभ्यासिलें गेलें नाहीं. या वस्तीपैकीं सिलोनमध्यें किती लोक कायमचे रहिवासी बनतात आणि त्यांचे पूर्वींच्या तामिळांशी कसे काय संबंध होतात याचें ज्ञान डॉ. केतकर यांस झालें नाहीं. या प्रश्नासंबंधानें डॉ. केतकर यांनीं लोकांस प्रश्न केले नाहींत असें नाहीं. तथापि प्रश्नाचें समर्पकपणें उत्तर देण्यासाठीं त्या प्रकारचें अवलोकन ज्यांनीं पूर्वीं केलें होतें असें सुशिक्षित तामिळ त्यांनां भेटले नाहींत. ज्याप्रमाणें आपल्या देशांतील सुशिक्षित वर्गांमध्यें अशिक्षित वर्ग आणि हलक्या जाती यांच्या जीवनचरित्रासंबंधानें पूर्णपणें अज्ञान आहे तसेंच त्यांच्यामध्येंहि आहे.
रा. रा. करुमुलु थिअगराज यांनीं तेथील भारतीय मजुरांविषयीं जी माहिती प्रत्यक्ष अवलोकन करून मिळविली व प्रसिद्ध केली (Ind. Rev. March 1917) ती येणेंप्रमाणेः-
घरेंदारें व आरोग्य — सिलोनमध्यें मजुरांस राहण्याकरितां पुष्कळ इमारती बांधलेल्या आहेत. त्यांचा नमुना म्हणजे इमारतीच्या मध्यभागीं एक लांबचलांब भिंत घालून दोन्ही बाजूंनां सारख्यासारख्या खोल्या पाडतात. ही प्रत्येक खोली १२ फूट लांब, दहा फूट रुंद आणि सुमारें ९ फूट उंच असून तीतून बाहेर पडवींत जाण्याकरीतां एक दरवाजा असतो; खिडकी मुळींच नसते. भिंती व जमीन चिखलमातीची असून वर ओंबणाला लोखंडी पत्रे असतात. कांही घरांवर कौलें असतात. सर्वत्र एकजात हाच नमुना असतो. प्रत्येक भागांत चार कामकरी मजूर रहावयाचे हा सामान्य नियम खरा; पुष्कळ मळ्यांत इमारती भरपूर नसल्यामुळें एकेका गाळ्यांत पांचपांच सहासहा मजूर मुलाबाळांसह कोंबलेले असतात. गटारें, मोर्या वगैरेंची व्यवस्था अगदीं असमाधानकारक. मुतर्या, शौचकूप क्वचितच ठिकाणीं असतात. सुदैवानें नवें आरोग्यखातें या गैरसोयी दूर करण्याच्या मार्गांत आहे.
प्रकृतिमान व औषधोपचार - मजुरांचें आरोग्य समाधानकारक नाहीं. ज्या ज्या मळ्यांत गेलों तेथें तेथें आजारी पडलेले मजूर होतेच. हिंवताप आणि संधिवात या व्याधी फार पसलेल्या आहेत. रत्नपुरांतील तपासणीवरील अधिकारी डॉ. लून (Lunn) यांनीं एका भागासंबंधानें खालील मजकूर लिहिला आहे :—
"ह्या चाळींत ज्याचे सांधे धरलेले नाहींत असा एकहि इसम नाहीं. कांहीं ठिकाणीं हिंवताप आहे. हगवण, अतिसार व त्वगरोग यांचा उपद्रवहि कांहीं कमी नाहीं. औषधोपचारार्थ ठेवलेल्या इसमांवर मजुरांचा बिलकुल भरंवसा नाहीं. अशा कांहीं इसमांची मीं गांठ घेतली. या योगानें मजुरांचा त्यांचेवर विश्वास नसण्याचीं कारणें मला बरोबर समजलीं. क्विनाइन हें या औषध देणार्यांचे अगदीं आवडींचें औषध; किंवा असें म्हटलें तर अधिक बरोबर होईल कीं तेवढें एकच औषध तेथें असे. डॉक्टरनें एक दिवसाआड मजुरांच्या खोल्यांत जाऊन तपासणी करवी असा नियम आहे खरा, पण वस्तुस्थिति अशी आहे कीं, डॉक्टरसाहेब आठवड्यांतून एकदां जात असतात ! बाकी एक दिवसाआड जाणें काय व आठवड्यांतून एकदां जाणें काय, दोहोंची किंमत सारखीच !!"
प्रत्येक आजारी माणसास तांदुळ द्यावे असा कायदा आहे; पण कायद्याची अम्मलबजावणी पहावी तर क्वचितच कोणा भाग्यवंताला तांदूळ मिळतात. सुपरिंटेडेंट साहेब म्हणतात : "तांदूळच काय, पण दूध, कांजी, साबुदाण्याची खीर, लागतील ते पदार्थ मजुरांनां देण्यांत येतात; इतकेंच नाहीं तर ते मळेवाल्यांच्या खर्चानें देण्यांत येतात." परंतु मला नमूद करण्यास फार वाईट वाटतें कीं, मी या मजुरांच्या तक्रारींची अगदीं निःपक्षपातीपणानें व बारकाईनें चौकशी केली असतां मला असें आढळून आलें कीं, साहेबमजुकरांच्या वरील विधानास वस्तुस्थितीचा बिलकूल आधार नाहीं. एखादा मजूर आजारी पडला आणि त्याचे कोणी नातेवाईक शुश्रूषा करण्यास नसले कीं त्यांनें खुशाल प्राणांची आशा सोडावी; तो मरावयाचा हें ठरलेलेंच ! मजूरस्त्रीला प्रसूतीनंतर अर्धा बुशेल (एक राकेलचा डबा) तांदूळ व दोन रूपये रोख देतात पण त्यांतहि ते दोन रुपये हिशोबांत त्या स्त्रीच्या नावांवर टाकतात !! मळ्यांमधून सुइणी नेहमींच्या नेमलेल्या नसतातच, पण तात्पुरत्याहि त्यांनां कामास ठेवीत नाहिंत !!
तसेंच मजूर आजारी पडला कीं त्याला दवाखान्यांत पाठविणें हें सुपरिंटेंडेंटचें कर्तव्य आहे असा कायदा आहे, तसें न करणें हा कायद्यांत गुन्हा आहे; पण कायद्यांतले कलम कायद्यांत. मजूर बेफाम आजारी असूनहि आपल्या खोलींतच पडलेले मी प्रत्यक्ष डोळ्यांनीं पाहिले आहेत.
कांहीं कांहीं मळ्यांतील मजुरांच्या मृत्यूचें प्रमाण पाहण्यासारखें आहे. निवितीगल येथील ९५० मजुरांपैकीं १९१३ या एका सालांतच २२७ मजूर मरण पावले ! डिकोया येथील गेल्या सालचा रिपोर्ट मला असा समजला कीं, जन्मास आलेल्या ६० नूतन अर्भकांपैकीं ४५ मृत्युमुखांत पडलीं !!
सिलोनचा इतिहास :— सिलोनबेट टॅप्रोबेन या नांवानें ग्रीक व रोमन लोकांनां माहीत होतें; व नंतर सेरेंदिप, सिरिंद्युइल व झेइलन या नांवांनीं पाश्चात्य व पौरस्त्य देशांतील लेखक त्याचा उल्लेख करीत असत. सेरेंदिप हें संस्कृत 'सिंहलद्वीप' याचें अपभ्रष्ट रूप आहे. भारतीय ग्रंथांत सिंहलद्वीप हा शब्द रत्नावली इत्यादि ग्रंथांत वापरला आहे आणि लंका हा शब्द पूर्वींपासून अधिक परिचित आहे. इतर पौरस्त्य देशांतल्याप्रमाणें सिलोनमध्यें जुन्या लेखांचा सांठा मोठा आहे; पण त्यांत खर्या गोष्टी व काल्पनिक गोष्टी यांचा गोंधळ केलेला असल्यामुळें त्यांतून ऐतिहासिक व काल्पनिक गोष्टींचा निर्णय करणें कठिण आहे. जार्ज टर्नरनें (१७९९-१८४३) परिश्रमपूर्वक हा गोंधळ दूर केलेला आहे, व त्याच्या महावंश या ग्रंथाच्या आवृत्तीमुळें सिंहली इतिहासाची सामान्य रूपरेषा ठरविण्यास चांगली मदत झाली आहे.
सिंहली शिलालेखांकडे प्रथम जार्ज टर्नरनें लोकांचे लक्ष वेधिलें. सर वुइल्यम ग्रेगरी यांच्या परिश्रमांमुळें या शिलालेखांच्या शुद्ध नकला होऊन भाषांतरहि होऊं लागले. यांत इ. पू. २ र्या शतकापासूनचे शिलालेख आहेत. यांत सर्वांत जुने लेख म्हणजे अनुराधपूर येथील वेस्सागिरी विहारांतील खडाकांतील गुहांतले होत; ते जुन्या ब्राह्मीलिपींत लिहिलेले आहेत. या लेखांवरुन सिंहलांत बौद्ध भिक्षू किती प्रबळ होते व राज्यकारभार व लोकांचा जीवनक्रम यांवर त्यांची केवढी छाप असे, हे स्पष्ट दिसतें. या लेखांतील राजांचे हुकुम बहुतेक या बौद्ध भिक्षूंचे हक्क अबाधित राखण्याकरतां सुटलेले आहेत. कांहीं थोडेसे राजकीय कारभाराबद्दलचे आहेत; उ., ५ वा कस्सप याचा शिलालेख (इ. स. ९२९-९३९). ४ था महिंद (इ. स. ९७५-९९१) याच्या एका शासनांत सिंहली रक्षादैवत असलेल्या बुद्धाच्या प्रसिद्ध दन्तावशेषाचा उल्लेख आहे. हा दन्तावशेष हल्लीं कँडी येथील देवालयांत आहे. सदरील आज्ञालेखावरून अनुराधपुरांतील थुपरामाच्या पूर्वेकडील एका सुंदर दगडी देवालयांत कीर्तिश्री मेघवर्ण याच्या कारकीर्दींत (इ. स. ३०४-३२४) कालिंगाहून हा दंतावशेष आणून ठेवला अशी जी परंपरागत जनकथा आहे तिला पुष्टी मिळते.
सिलोनमधील मूळचे रहिवासी म्हणजे पूर्वेकडील अरण्यांत राहणार्या आजच्या वेद्ध नांवाच्या वन्य लोकांचे पूर्वज असावे; आणि तेथील गुहांमध्यें सांपडलेल्या कित्येक प्राचीन दगडी हत्यारांवरुन असें दिसतें कीं, या जातीचे हे लोक या बेटांत फार प्राचीन कालापासून राहात असावे.
Comments
Post a Comment